धुळे लोकसभा मतदारसंघातून कोण बाजी मारणार? सुभाष भामरे की शोभा बच्छाव

Dhule Lok Sabha Elections 2024: वाढलेल्या मतदानाचा फायदा महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांना होणार? की डॉ. शोभा बच्छाव यांच्या गळ्यात विजयाची माळ पडेल? याची उत्सुकता वाढली असून 4 जून जाहीर होणाऱ्या निकालात याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे.

Advertisement
Read Time: 3 mins

- नागिंद मोरे, धुळे 

Dhule Lok Sabha Elections 2024:  उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचा जिल्हा म्हणून धुळे जिल्ह्याकडे पाहिले जाते. धुळे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चांगलीच चुरशीची ठरली. महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होत्या. दोन्ही उमेदवार उच्चशिक्षित आणि राजकीय अनुभव असलेले असल्याने दोन्ही उमेदवारांच्या विजयाबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत, धुळे लोकसभा मतदारसंघातून कोण विजयी होणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

(युवा उच्च शिक्षित उमेदवार आमनेसामने, कमळ फुलणार की हाताची जादू चालणार?)

उत्तर महाराष्ट्रात आठपैकी धुळे लोकसभा मतदारसंघ देखील यंदाच्या निवडणुकीत चांगलाच चर्चेचा विषय ठरला. सुरुवातीला भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्याच यादीत डॉ. सुभाष भामरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यामुळे महायुतीकडून डॉ. सुभाष भामरे हे निवडणुकीच्या रिंगणात तिसऱ्यांदा उतरणार असल्याचे निश्चित झाले. मात्र महाविकास आघाडीकडून कोणाच्या नावाची घोषणा होणार, याबाबत अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. अखेर महाविकास आघाडीने काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांची उमेदवारी जाहीर केली.

Advertisement

(दिंडोरीत भारती पवारांची प्रतिष्ठा पणाला, केंद्रीय मंत्री खासदारकी वाचवणार?)

डॉ शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीनंतर काँग्रेसमधील नाराजीनाट्य समोर आले होते. धुळे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून श्याम सनेर, मालेगाव येथील तुषार शेवाळे यांच्यापैकी एकाला उमेदवारी जाहीर होते की अजून कोणाचे नाव समोर येते. याबाबत विविध चर्चा सुरू होत्या. मात्र त्यातच डॉ शोभा बच्छाव यांचे नाव निश्चित झाल्याने काँग्रेस मधून नाराजी पाहायला मिळाली होती, मात्र ही नाराजी दूर करण्यात काँग्रेसमधील वरिष्ठांना यश आल्यानंतर डॉ. शोभा बच्छाव यांचा प्रचार लोकसभा मतदारसंघात सुरू झाला.

Advertisement

(Nashik Lok Sabha Elections 2024: नाशिकमध्ये गोडसेंची हॅटट्रिक वाजे रोखणार? विजयश्री कोण खेचून आणणार)

धुळे लोकसभा मतदारसंघात डॉ. सुभाष भामरे हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने त्यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीकडून सक्षम उमेदवार देण्याची तयारी सुरू होती. अखेर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसानंतर झालेल्या अर्ज छाननी वेळेस हे दोन्ही उमेदवार आणि त्यांच्यासोबत इतर 16 अपक्ष उमेदवारनिवडणुकीच्या रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले होते. 

Advertisement

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार

धुळे लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने सनदी अधिकारी अब्दुल रहमान यांची उमेदवारी जाहीर केली होती. यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र त्यातच अर्ध छाननी वेळी अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने याचा फायदा नक्की कोणाला होणार याबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र सुरुवातीला त्यांच्या उमेदवारीमुळे मुस्लिम मतांचे मोठ्या प्रमाणावर विभाजन होणार असल्याचे देखील सांगण्यात येत होते. त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर मुस्लिम मतांचा फायदा काँग्रेसला होणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर झालेल्या मतदानावेळी मुस्लिम, दलित आणि आदिवासी या मतदारांचा कौल हा काँग्रेसच्या बाजूने असेल हे स्पष्ट झाले होते. 

उमेदवारांची धाकधूक वाढली

दुसरीकडे महायुतीकडून निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कलम 370 राम मंदिर यासह विविध मुद्दे चर्चेत आल्याने नाराज झालेल्या मुस्लिम मतदारांकडून काँग्रेसला पसंती मिळेल, असे देखील तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर धुळे लोकसभा मतदारसंघात 60 टक्के मतदान झाल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. यामुळे या वाढलेल्या मतदानाचा फायदा महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांना होणार? की डॉ. शोभा बच्छाव यांच्या गळ्यात विजयाची माळ पडेल? याची उत्सुकता वाढली असून 4 जून जाहीर होणाऱ्या निकालात याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले असून उमेदवारांसह कार्यकर्त्यांची देखील धाकधूक वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

VIDEO: पहिल्या दिवसापासून मला विजयाची खात्री आहे - शशिकांत शिंदे