जाहिरात
Story ProgressBack

दिंडोरीत भारती पवारांची प्रतिष्ठा पणाला, केंद्रीय मंत्री खासदारकी वाचवणार?

Dindori Lok Sabha Election 2024: केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांना दुसऱ्यांदा संधी मिळेल? नवखे भास्कर भगरे कमाल करतील का ?

Read Time: 6 mins
दिंडोरीत भारती पवारांची प्रतिष्ठा पणाला, केंद्रीय मंत्री खासदारकी वाचवणार?
- निलेश वाघ, नाशिक

Dindori Lok Sabha Elections 2024: मनमाड-नाशिकच्या आदिवासी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदार संघामध्ये महायुतीकडून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली. सकाळच्या सत्रात मतदारांनी उत्स्फूर्तपणे केलेले मतदान कोणाला फायदेशीर ठरेल? वंचित बहुजन आघाडीने किती मते घेतली? यावरच यंदाच्या निकालाची गणिते अवलंबून आहेत. अर्थात दिंडोरीमध्ये कोण बाजी मारणार? याचे चित्र 4 जूनला स्पष्ट होईलच. 

(Nashik Lok Sabha Elections 2024: नाशिकमध्ये गोडसेंची हॅटट्रिक वाजे रोखणार? विजयश्री कोण खेचून आणणार)

सभांच्या धडाक्यांचा कोणाला होणार फायदा?

केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांचा हा मतदार संघ असल्याने राज्यातील महत्त्वाच्या लढतींपैकी एक लढत म्हणून दिंडोरी मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले होते. डॉ.भारती पवार यांना दिंडोरीच्या प्रथम महिला खासदार होण्याचा बहुमान मिळाला. पाठोपाठ लगेच केंद्रीय मंत्रिपदाचा मान डॉ.भारती पवार यांच्या रूपाने दिंडोरीला मिळाला. त्यांच्यासमोर महाविकास आघाडीने पेशाने शिक्षक व माजी जि.प.सदस्य  भास्कर भगरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. सुरवातीला एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीत उत्तरार्थ चुरस वाढली. महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री पंकजा मुंडे या स्टार प्रचारकांनी सभा घेतल्या तर महाविकास आघाडीमध्ये खुद्द शरद पवार दोन दिवस दिंडोरीत तळ ठोकून  होते. त्यांनी वणी व मनमाडमध्ये सभा घेतल्या तर मतदार संघातील राजकीय दिग्गजाच्या भेटी घेतल्या. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे, डॉ.अमोल कोल्हे, माजी मंत्री अनिल देशमुख, त्यासोबत महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, प्रा.नितेश कराळे यांनी पाच दिवस दिंडीरीमध्ये मुक्काम करत सभांचा धुराळा उडाला. अर्थात महायुती व महाविकास आघाडीच्या सभांचा फायदा डॉ.भारती पवार की भास्कर भगरे यांना होता हे पाहावे लागेल.

(अमरावतीत नवनीत राणा विरूद्ध ऑल; मोदींचा वरदहस्त राणांना यश मिळवून देईल?)

लोकसभा निवडणूक 2024 - टक्केवारी

राज्याच्या  पाचव्या टप्यात  झालेल्या मतदानात दिंडोरी मतदार संघात यंदा उत्स्फूर्त मतदान पार पडले. दिंडोरीमध्ये 66.75 टक्के मतदान झाले. वर्ष 2019मध्ये 65.65 इतके मतदान झाले होते. गत पंचवार्षिकच्या तुलनेत दिंडोरीमध्ये मतदानाचा टक्का 1.01 टक्क्याने वाढला आहे. दिंडोरीमध्ये येणाऱ्या नांदगावमध्ये 58.24 टक्के, कळवणमध्ये 70.89 टक्के, चांदवडमध्ये 66.65 टक्के, येवल्यात 65.38 टक्के, निफाडमध्ये 64.31 टक्के, दिंडोरीमध्ये 75.42 टक्के मतदान झाले आहे.

दिंडोरीमध्ये एकूण 18 लाख 53 हजार 387 मतदारांपैकी 12 लाख 37 हजार 180 मतदारांनी आपला मतदाना हक्क बजावला. डॉ.भारती पवार यांच्या कळवण तालुक्यात यंदाच्या निवडणुकीत 70.89 टक्के मतदान झाले होते. गतवेळी हाच आकडा 72.62 टक्के इतका होता. म्हणजे मागील वेळेच्या तुलनेत हा आकडा 1.75 टक्क्यांनी घसरला. तर भास्कर भगरे यांच्या दिंडोरी मतदार संघात गेल्या वेळेच्या तुलनेत 5.92 टक्क्यांनी मतदानाची टक्केवारी वाढल्याचे पाहायला मिळाले. यावेळी दिंडोरीमध्ये विक्रमी 75.42 टक्के मतदान झाले होते तर गतवेळी हाच आकडा 69.05 टक्के इतका होता. कळवणमध्ये घटलेली मतदानाची टक्केवारी व दिंडोरीमध्ये वाढलेला मतदानाचा टक्का दिंडोरीचा खासदार ठरवण्यासाठी निर्णयाक ठरेल यात शंका नाही.

(माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहरावांच्या रामटेक लोकसभा मतदारसंघात कोण उधळणार विजयाचा गुलाल?)

कोणाची सरशी होणार?

दिंडोरी मतदार संघात सध्या तरी महायुतीचे वर्चस्व पाहायला मिळते, दिंडोरीच्या सहाच्या सहा विधान सभेवर महायुतीचे एकहाती वर्चस्व आहे. दिंडोरी-पेठ मतदार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नरहरी झिरवळ, कळवण- सुरगाण्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नितीन पवार, निफाडमध्ये अजित पवार गटाचे दिलीप बनकर, येवल्यात अजित पवार गटाचे छगन भुजबळ, चांदवड - देवळ्यात भाजपचे डॉ. राहुल आहेर व नांदगावमध्ये शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे आमदार आहे. मतदार संघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चार तर भाजप व शिंदे गटाचा प्रत्येकी एक आमदार आहे. त्यामुळे सद्यस्थितीनुसार महायुतीच्या डॉ.भारती पवार यांची सरशी आहे. मात्र दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या भास्कर भगरे यांनी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची  मोट बांधित संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला व प्रचारात आघाडी घेत निवडणुकीत चुरस निर्माण केली. त्यामुळे दिंडोरीमध्येच काटे की टक्कर होणार हे स्पष्ट झाले. निवडून येणारा अत्यल्प मताधिक्याने विजयी होणार हे मात्र नक्की. मात्र विजयी होणारा उमेदवार महायुतीचा की महाविकास आघाडीचा? हे पाहण्यासाठी 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे.

काय होते प्रचाराचे मुद्दे?

आदिवासी बहुल मतदार संघ असलेल्या दिंडोरी मतदार संघात प्रमुख्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा भाग आहे. यंदाच्या निवडणुकीत सुरुवातीपासून कांद्याचा मुद्दा गाजला. केंद्र सरकारच्या निर्यात धोरणामुळे कांद्याच्या भावात सातत्याने झालेल्या घसरणीमुळे कांदा उत्पादकाच्या रोषाचा डॉ. भारती पवार व भाजपाला फटका बसला. खुद्द पंतप्रधानांच्या सभेतही एका तरुणाने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू असताना याकडे लक्ष वेधले. त्याच बरोबर द्राक्ष निर्यात न झाल्याने द्राक्ष कवडीमोल भावात विकावी लागली. शेतमालाचीही तिच स्थिती होती. मनमाड रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या प्रवाशी गाड्या इतरत्र पळवण्यात आल्या. 

केंद्रीय मंत्री असताना मतदार संघात मोठे हॉस्पिटल उभारता आले नाही, आदिवासी भागात पर्यटन विकास करता आला नसल्याने मतदारांमध्ये डॉ.भारती पवारांबाबत मोठी नाराजी होती. नेमके हीच बाब हेरुन महाविकास आघाडीच्या उमेदवाराने मतदारांना या बाबी पटवून सांगत भारती पवारांना घेरले. काही अंशी ते यशस्वीही झाले. या मुद्यांना हात घालत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवाराने मते कॅश करण्याचा प्रयत्न केला.अशाही परिस्थितीत डॉ.भारती पवार यांनी अयोध्येतील राम मंदिर, पंतप्रधानांनी केलेला विकास व केंद्र सरकारच्या कामांची यादी सांगत मतदारांकडे मतांच्या जोगावा मागतांना दिसल्या. पण मतदार मताचे दान नेमके कोणाच्या पराड्यात टाकणार? हे पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. 

मतदार संघाचा इतिहास

पूर्वाश्रमी मालेगाव लोकसभा मतदार संघ असलेला हा मतदार संघ 2009मध्ये मतदार संघाच्या पुर्नरचनेत दिंडोरी मतदार संघ झाला. मालेगाव मतदार संघ असताना या मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. झागरू मंगळू कहांडोळ यांनी सर्वाधिक वेळा प्रतिनिधी केले आहे. जनता दलाचे हरिभाऊ महाले हे तीनदा येथून निवडून आले आहेत. भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण हे एकदा मालेगाव तर दोनदा दिंडोरीचे खासदार म्हणून विजयी झाले आहेत. दिंडोरी मतदार संघ झाल्यापासून भाजप दिंडोरीवर वर्चस्व आहे. वर्ष 2009 व वर्ष2014 मध्ये हरिश्चंद्र चव्हाण यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. तर वर्ष2019 मध्ये डॉ.भारती पवार यांना संधी मिळाली.

वंचित आणि माकपचा फायदा कोणाला?

दिंडोरी लोकसभेमध्ये वंचितने उमेदवार दिला. वंचितचा उमेदवार किती आघाडी घेतो, यावर निवडणुकीचे गणित अवलंबून आहे. वंचित कोणाचे गणित बिघडवते आणि कोणाचे गणित सुकर करते? याची उत्सुकता आहे. दिंडोरीमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. कॉ. जे. पी.गावित सातत्याने दिंडोरीचे प्रतिनिधित्व करतात, पण त्यांच्या पदरी कायम निराशा आली आहे. यंदा त्यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी मागितली  होती. पण उमेदवारी नाकारल्याने नाराज असलेल्या गावित यांनी निवडणूक लढवण्याच्या तयारी सुरू केल्याने महाविकास आघाडीच्या तंबूत काहीशी घबराट पसरली होती. पण ऐनवेळी गावित यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या भास्कर भगरे यांना पाठिंबा दिला. माकपच्या पाठिंबा राष्ट्रवादीला लाभदायक ठरेल का? हे पाहणे  गरजेचे आहे.

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये काय होती परिस्थिती?

लोकसभा निवडणूक 2019मध्ये दिंडोरी लोकसभेला एकूण 17 लाख 28 हजार 651 इतकी मतदार संख्या होती. यापैकी 11 लाख 34 हजार 754 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. भाजपच्या डॉक्टर भारती पवार 5 लाख 62 हजार 452 मते मिळवून विजय मिळवला होता. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनराज महाले यांना 3 लाख 68 हजार 111 मते पडली होती. माकपच्या जे.पी. गावित यांना 1 लाख 94 हजार 95 आणि वंचितच्या बापू बर्डे यांना 58 हजार 847 मते मिळाली होती.

सेनाभवनातील पत्रकार परिषद भोवली, उद्धव ठाकरेंवर निवडणूक आयोगाची कारवाई

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
Maharashtra Legislative Council Results : विधान परिषदेच्या चार जागांसाठी आज निकाल
दिंडोरीत भारती पवारांची प्रतिष्ठा पणाला, केंद्रीय मंत्री खासदारकी वाचवणार?
wife teaches lesson to husband who were living with her girlfriend chhatrapati sambhaji nagar
Next Article
पतीला मैत्रिणीसोबत रोमान्स करताना रंगेहाथ पकडलं, पत्नीचा पारा चढला अन् पुढे जे घडलं...
;