जाहिरात

Nashik Lok Sabha Elections 2024: नाशिकमध्ये गोडसेंची हॅटट्रिक वाजे रोखणार? विजयश्री कोण खेचून आणणार

Nashik Lok Sabha Elections 2024: कोण होणार नाशिकचा खासदार? नाशिक लोकसभा निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

Nashik Lok Sabha Elections 2024: नाशिकमध्ये गोडसेंची हॅटट्रिक वाजे रोखणार? विजयश्री कोण खेचून आणणार
- किशोर बेलसरे, नाशिक

Nashik Lok Sabha Elections 2024: नाशिक लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. नुकत्याच  झालेल्या नाशिक लोकसभा निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून माजी. आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली. दुसरीकडे अपक्ष उमेदवार म्हणून शांतिगिरी महाराज हे देखील निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्याने नाशिक लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळाली. परंतु जरी तिरंगी लढत असली तरी देखील खरी लढत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसेंविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे म्हणजेच शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच आहे. शांतिगिरी महाराज यांचा जय बाबाजी भक्त परिवार मोठा असून शांतिगिरी महाराजांच्या मत विभागणीवर नाशिकच्या विजयाचे गणित मांडले जात आहे. त्यामुळे आता वाजे गोडसेंची हॅटट्रिक रोखणार का? हे पाहणे रंजक ठरेल.

(नक्की वाचा: अमरावतीत नवनीत राणा विरूद्ध ऑल; मोदींचा वरदहस्त राणांना यश मिळवून देईल?)

नाराजी नाट्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंचे वारंवार नाशिक दौरे

सुरुवातीला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र शिवसेना शिंदे गटाने नाशिकच्या जागेसाठी आग्रह लावून धरल्याने ही जागा अखेर हेमंत गोडसे यांना देण्यात आली. तर आचारसंहिता लागू होताच शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली. पण हेमंत गोडसे यांना निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उमेदवारी देण्यात आल्यामुळे त्यांना प्रचाराचा अवधी कमी मिळाला. त्यातच निवडणुकीच्या अखेरपर्यंत महायुतीतील आमदारांचे नाराजी नाट्य देखील घडून आले. त्यामुळे या आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारंवार नाशिक दौरे करावे लागले. तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या उमेदवाराने प्रचारात चांगलीच आघाडी घेतली होती.

(नक्की वाचा: माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहरावांच्या रामटेक लोकसभा मतदारसंघात कोण उधळणार विजयाचा गुलाल?)

नाशिक लोकसभा मतदारसंघात महापालिका हद्दीतील साडेतीन तर ग्रामीण भागातील अडीच विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यामध्ये नाशिक मध्य, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम या तीनही विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे आमदार आहे. तर देवळाली शहर आणि ग्रामीण तसेच सिन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. तर इतर विधानसभेवर काँग्रेसचे वर्चस्व आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात मतदान करणारे मतदार हे 60% शहरी भागातील आहेत असे असले तरी शहरांपेक्षा ग्रामीण भागात झालेल्या मतदानाची टक्केवारी पाहता या भागातील मताधिक्यावर उमेदवाराचे विजयाचे गणित मांडले जात आहे. 

मतदारांनी कोणाला दिले प्राधान्य?

ठाकरे गटाचे उमेदवार वाजे हे सिन्नरचे आहेत. त्यामुळे येथील मतदारांनी स्थानिक उमेदवाराला प्राधान्य दिल्याचे बोलले जाते. तर दुसरीकडे गेली 10 वर्षे खासदार गोडसे यांनी या भागात केलेली कामे ही त्यांची जमेची बाजू मानली जात आहे. मतदारसंघातील इगतपुरी, त्र्यंबक  मतदारसंघात काँग्रेसचे आमदार असल्याने येथेही महाविकास आघाडीला मताधिक्य मिळण्याची आशा आहे. तसेच दोन्ही उमेदवारांचा जनसंपर्क आणि नातीगोती या जमेच्या बाजू आहेत. मागील दोन पंचवार्षिकमध्ये या मतदार संघातून गोडसेंना मताधिक्य मिळाल्याने यंदा गोडसे या मतदारसंघात वर्चस्व राखणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

तर नाशिक लोकसभा मतदारसंघात 2004 आणि 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विजय मिळाला होता.  

लोकसभा निवडणूक 2019ची परिस्थिती 

नाशिकमध्ये 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत सध्या एकनाथ शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे दुसऱ्यांदा विजय झाले. 2019च्या लोकसभेत हेमंत गोडसेंना  5 लाख 63 हजार 599 इतकी मतं मिळाली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ हे 2 लाख 71 हजार 395 मतांनी दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. विजयी उमेदवार हेमंत गोडसे हे 2 लाख 92 हजार 204च्या मताधिक्याने विजय ठरले.

(नक्की वाचा: Hatkanangale Lok Sabha 2024 : धैर्यशील माने की राजू शेट्टी, कोण बाजी मारणार?)

चर्चेत राहिलेले मुद्दे

नाशिकमध्ये 2024च्या निवडणुकीतील मुद्यांबाबत सांगायचे झाले तर मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन तसेच रखडलेल्या नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प आणि नवीन औद्योगिक वसाहत तसेच शहरातील रखडलेला आयटी पार्कचा प्रश्न हे मुद्दे चर्चेत राहिले आहेत. 

नाशिक लोकसभा मतदार संघातील एकूण सहा मतदार संघात यंदा झालेले मतदान (टक्केवारी)

  • नाशिक पूर्व - 55. 38 टक्के
  • नाशिक मध्य - 57. 15 टक्के 
  • नाशिक पश्चिम - 54. 35 टक्के 
  • देवळाली - 62. 05 टक्के 
  • इगतपुरी- त्र्यंबकेश्वर - 72.24 टक्के 
  • सिन्नर-  69.50 टक्के 
  • एकूण टक्केवारी - 60. 75 टक्के  

त्यामुळे आता लोकसभेत नाशिकमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे गोडसेंचा दिल्लीचा मार्ग रोखतात का? की हेमंत गोडसे हॅटट्रिक करणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

VIDEO: राज्यात मोदींची लाट कुठेही नाही, Exit Poll वर कराळे मास्तर थेटच बोलले

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
'मला एक खून माफ करा' राज ठाकरेंना कोणाचा करायचाय खून? ऐकून तुम्ही म्हणाल...
Nashik Lok Sabha Elections 2024: नाशिकमध्ये गोडसेंची हॅटट्रिक वाजे रोखणार? विजयश्री कोण खेचून आणणार
Live Update mumbai rain weather department Holiday announced for schools colleges pm narendra modi pune visit maharashtra political update
Next Article
Highlights : छगन भुजबळ हॉस्पिटलमध्ये दाखल, खासगी विमानानं मुंबईला आणलं