
अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या शूटर्सचा एन्काउंटर झाल्यानंतर गँगस्टर रोहित गोदाराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यातून त्याने थेट पोलिसांना धमकी दिली आहे. यूपी एसटीएफ, दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल आणि हरियाणा एसटीएफच्या संयुक्त पथकाने या एन्काउंटरमध्ये रवींद्र आणि अरुण नावाच्या दोन शूटर्सना ठार केले. रोहित गोदाराने आपल्या पोस्टमध्ये या एन्काउंटरवर संताप व्यक्त केला आहे. शिवाय बदला घेण्याची थेट धमकी ही दिली आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
गँगस्टर रोहित गोदाराने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'हे शहीद झाले आहेत. एन्काउंटरमध्ये मारले गेले नाहीत.' त्याने पुढे लिहिले आहे की, 'या दोन्ही शूटरने धर्मासाठी बलिदान दिले आहे.' या घटनेमुळे सनातन धर्माची हार झाली असून, केवळ धर्माच्या नावाखाली धंदा सुरू असल्याचा आरोपही त्याने केला आहे. रोहित गोदाराने या प्रकरणातील दोषींना सोडणार नाही, अशी धमकीही दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एन्काउंटर झालेल्या दोन्ही आरोपींचा सोनीपतच्या दिशेने पाठलाग करण्यात आला. जेव्हा पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर देत एन्काउंटर केला. या प्रकरणी नकुल आणि विजय नावाचे आणखी दोन आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, गोल्डी बराड आणि रोहित गोदारा एकत्र येऊन आपला गँग चालवत असून, त्यांचे जाळे देशातील 8 पेक्षा जास्त राज्यांमध्ये पसरले आहे.
रोहित गोदाराने आपल्या पोस्टमध्ये या एन्काउंटरला 'धर्मासाठी दिलेले बलिदान' म्हटले आहे. त्याने म्हटले आहे की, 'न्यूज चॅनेलवाले त्यांना 'ढेर झाले' असे म्हणत आहेत, पण ते शहीद झाले आहेत.' त्याने सनातन धर्माच्या नावावर सुरू असलेल्या 'धंद्या'बद्दलही लिहिले आहे. हा एन्काउंटर म्हणजे 'सनातनची हार' आहे, असे म्हणत त्याने या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्वांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे. 'ज्यांनी हे कृत्य केले आहे, ते कितीही श्रीमंत किंवा शक्तिशाली असले, तरी त्यांना सोडणार नाही,' असेही त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world