जाहिरात
This Article is From Mar 16, 2024

तुम्हाला वीज बील वाचवायचं आहे का? 'या' सरकारी योजनेसाठी लगेच करा अर्ज

तुम्हाला वीज बील वाचवायचं आहे का? 'या' सरकारी योजनेसाठी लगेच करा अर्ज
प्रातिनिधीक फोटो


देशातील सध्याचा वीज पुरवठा वाढत्या लोकसंख्येची गरज भागवण्यासाठी किती काळापर्यंत उपयोगी पडेल याबाबत तज्ज्ञांना शंका आहे. वीजेची वाढती गरज भागवण्यासाठी सौर ऊर्जा हा सर्वात उपयोगी स्रोत आहे. आपल्या देशातील बहुतेक भागात सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळेचा वापर करुन आपल्या घराच्या वीजेची बचत करणे सहज शक्य आहे. त्याचबरोबर सौर ऊर्जेतून पैशांचीही बचत होते. त्यामुळे सामन्यांचा वीज बील भरण्यासाठी आर्थिक चटकाही कमी होईल. सौर ऊर्जेचं हे महत्त्व लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून 'सूर्य घर मोफत योजना' सुरु करण्यात आलीय. ठाणे जिल्ह्यातही या योजनेला सुरुवात झाली असून त्याचा लाभ तुम्ही कसा घ्यावा हे आम्ही सांगणार आहोत. 

ग्राहकांना मिळणार अनुदान...


 

रुफ टॉप सोलर सिस्टीमसाठी केंद्र सरकारकडून वीज ग्राहकाला 1 किलोवॅटसाठी 30 हजार रुपये, 2 किलो वॅटसाठी 60 हजार रुपये आणि 3 किलो वॅटसाठी 78 हजार रुपये अनुदान मिळणार आहे.  एक किलोवॅटच्या क्षमतेच्या रुफ टॉप सिस्टीमधून  दररोज सुमारे 4 युनिट अर्थात दरमहा सुमारे 120 युनिट वीज तयार होते. महिना 150 युनिट पर्यंत वीज वापर करणा-या कुटुंबाला 2 किलोवॅटपर्यंतच्या क्षमतेची रुफ टॉप सिस्टीम पुरेशी आहे. 

दरमहा 150 ते 300 युनिट वीज वापर असणा-यां कुटुंबासाठी 2 ते  3 किलोवॅट क्षमतेची सिस्टीम पुरेशी ठरते. घराच्या छतावर रुफ टॉप सोलर वीजनिर्मिती प्रकल्प बसवून सौर ऊर्जेचा वापर करावा आणि तीच वीज घरी वापरून वीजेचा अतिरीक्त ताण कमी करावा यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. 

या पोर्टलवर करा अर्ज...

ही सिस्टीम बसविण्यासाठी ग्राहकांना महावितरण कंपनीकडून मदत केली जाते. त्यासाठी http:/pmsuryaghar.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे पीएम सूर्यघर नावाचे मोबाईल अॅपही यासाठी उपलब्ध आहे. देशभरात एक कोटी घरासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असं आवाहन महावितरणनं केलंय.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com