उत्तर प्रदेशातल्या आग्रामधल्या ताजमहाल परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. ताजमहालच्या पश्चिम गेटवरील पार्किंगमध्ये एक वयोवृद्ध व्यक्ती कारमध्ये बेशुद्धावस्थेत सापडला होता. या वृद्धाचे हातपाय बांधून ठेवण्यात आले होते. प्रचंड उकाडा आणि दमटपणामुळे अनेक तास गाडीत बंद राहिल्याने या आजोबांची प्रकृती खूपच गंभीर झाली आहे.
ताजमहालच्या पार्किंगमध्ये ड्युटीवर असलेल्या सुरक्षा रक्षकाला ही संशयास्पद कार दिसली होती. त्याने जवळ जाऊन पाहीले असता त्याला आतमध्ये हे आजोबा बेशुद्धावस्थेत दिसले होते. या सुरक्षा रक्षकाने सांगितलं की जेव्हा त्याने कारमध्ये डोकावून पाहीले तेव्हा त्याला हे आजोबा हातपाय बांधलेल्या अवस्थेत दिसून आले होते. सुरक्षा रक्षकाने इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने कारची काच तोडली आणि वृद्ध व्यक्तीला बाहेर काढले.
( नक्की वाचा: वडील IPS, स्वत: अभिनेत्री... सोन्याच्या तस्करीत अडकलेली रान्या राव कोण आहे? )
आजोबांची प्रकृती चिंताजनक
गाडीतून बाहेर काढल्यानंतर या आजोबांना पाणी देण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती इतकी खालावली होती की त्यांना पाणीही पिता येत नव्हते आणि ते काही बोलूदेखील शकत नव्हते. सुरक्षारक्षकाने इतरांच्या मदतीने ॲम्ब्युलन्स बोलावली आणि या आजोबांना रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी या आजोबांची तपासणी केली असता त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार या आजोबांना गाडीत बंद करून त्यांच्या घरची मंडळी ताजमहाल फिरायला गेली होती.
( नक्की वाचा:कारचा पाठलाग, अश्लील मेसेज, वकिलाकडून महिला अधिकाऱ्याचा विनयभंग )
गाडीवर 'महाराष्ट्र शासन' स्टिकर
ही घटना पाहणारे ताजमहाल परिसरातील गाईड मोहम्मद असलम यांनी आज तकशी बोलताना म्हटले की, ज्या कारमध्ये हे आजोबा सापडले, त्या कारवर 'महाराष्ट्र शासन' असा स्टिकर लावलेला होता. कारमधले आजोबा काहीही बोलू शकत नव्हते आणि त्यांची प्रकृती फारच चिंताजनक वाटत होती. ज्या कारमध्ये हे आजोबा सापडले त्या कारची नंबरप्लेट महाराष्ट्राची आहे. कारच्या टपावर सामान बांधलेले होते, त्यामुळे या आजोबांसोबतचे कुटुंब हे महाराष्ट्रातून आले असावे असा अंदाज बांधला जात आहे. सदर प्रकरण पोलिसांपर्यंत नेण्यात आले असून पोलीस या कारच्या मालकाचा आणि आजोबांच्या कुटुंबीयांचा शोध घेत आहेत.