
Election commission PC: विरोधी पक्षांच्या 'मत चोरी'च्या आरोपांदरम्यान, निवडणूक आयोगाने रविवारी एक पत्रकार परिषद घेतली. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Dyanesh Kumar) म्हणाले, "निवडणूक आयोग सर्व राजकीय पक्षांशी समान व्यवहार करतो, कारण प्रत्येक पक्ष आयोगाकडे नोंदणी करूनच जन्माला येतो. ते पुढे म्हणाले की आयोगासाठी कोणताही सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष नाही, सर्व पक्ष समान आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, "निवडणूक आयोगासाठी कोणताही सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष नाही हा विषय नाही. आमच्यासाठी सर्व समान आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाचा कोणीही असो, निवडणूक आयोग आपल्या घटनात्मक कर्तव्यापासून मागे हटणार नाही. असं ही त्यांनी स्पष्ट केलं.
'चुका सुधारण्यासाठी SIR ची सुरुवात'
(Election commission) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले, "गेल्या दोन दशकांपासून, जवळपास सर्वच राजकीय पक्ष मतदार यादीतील चुका सुधारण्याची मागणी करत आहेत. ही मागणी पूर्ण करण्यासाठी निवडणूक आयोगाने बिहारमधून 'विशेष गहन पुनरीक्षण' म्हणजेच SIR सुरू केले आहे. एसआयआरच्या प्रक्रियेत, सर्व मतदार, बूथ स्तरावरील अधिकारी आणि सर्व राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या 1.6 लाख बीएलएने म्हणजेच बूथ लेव्हल एजंट एकत्र येऊन एक मसुदा यादी तयार केली आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
'मतदारांची वैयक्तिक माहिती सार्वजनिक करू नये'
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले, "भारताच्या संविधानानुसार, 18 वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाने मतदार बनले पाहिजे आणि मतदानही केले पाहिजे. विरोधी पक्षांनी मतदारांचे फोटो माध्यमांमध्ये दाखवल्याचा उल्लेख करत ज्ञानेश कुमार म्हणाले, "आम्ही काही दिवसांपूर्वी पाहिले की अनेक मतदारांचे फोटो त्यांच्या परवानगीशिवाय माध्यमांसमोर सादर केले गेले. त्यांच्यावर आरोप केले गेले, त्यांचा वापर केला गेला. निवडणूक आयोगाने मतदारांचे, त्यांच्या मातांचे, सुनांचे किंवा मुलींचे सीसीटीव्ही फुटेज शेअर करावे का? ज्यांची नावे मतदार यादीत आहेत, तेच आपले उमेदवार निवडण्यासाठी मतदान करतात. तसं आपल्याला करता येणार नाही असं ही त्यांनी स्पष्ट केलं.
'चुकीच्या आरोपांना निवडणूक आयोग घाबरत नाही'
ते पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत एक कोटीहून अधिक कर्मचारी, 10 लाखाहून अधिक बूथ लेव्हल एजंट, 20 लाखाहून अधिक उमेदवारांचे पोलिंग एजंट काम करतात. इतक्या लोकांसमोर, इतक्या पारदर्शक प्रक्रियेत कोणताही मतदार मत चोरी करू शकतो का? काही मतदारांनी दुहेरी मतदानाचा आरोप केला, परंतु पुरावे मागितल्यावर उत्तर मिळाले नाही. अशा चुकीच्या आरोपांना निवडणूक आयोग किंवा कोणताही मतदार घाबरत नाही असं ही त्यांनी यावेळी ठाम पणे सांगितलं. त्याच बरोबर मत चोरी हा शब्द प्रयोग करणे अतिशय चुकीचे असलेल्याचं ही त्यांनी सांगितलं. शिवाय त्याबाबत नाराजी ही व्यक्त केली.
'निवडणूक आयोग भारताच्या जनतेसोबत आहे'
ज्ञानेश कुमार म्हणाले, निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारताच्या मतदारांना लक्ष्य करून राजकारण केले जात आहे, अशा परिस्थितीत निवडणूक आयोग आज सर्वांना स्पष्ट करू इच्छितो की, आम्ही कोणत्याही गरीब, श्रीमंत, वृद्ध, महिला आणि तरुण यांच्यासह सर्व वर्ग आणि सर्व धर्मांच्या मतदारांसोबत निर्भयपणे खंबीरपणे उभे होतो, उभे आहोत आणि उभे राहू. त्यातून त्यांनी निवडणूक आयोग कोणत्याही आरोपांना घाबरणार नाही. शिवाय तो स्वायत असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world