उत्तर प्रदेशातील भरथना परिसरात वीज विभागाच्या एका चुकीमुळे एका हसत्याखेळत्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महावीर नगरमधील रहिवासी आणि चहाची टपरी चालवणारे शिवपाल यांचा वीज बिलाच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात वीज विभागाच्या कारभारावर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
नक्की काय आहे हे प्रकरण?
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवपाल यांचे वीज बिल पूर्वी सामान्यतः 1200 ते 1500 रुपयांच्या दरम्यान येत असे. मात्र, वीज विभागाने त्यांच्या घरी 'स्मार्ट मीटर' बसवल्यानंतर चित्र पूर्णपणे बदलले. स्मार्ट मीटर लागल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत त्यांना चक्क 1 लाख 60 हजार रुपयांचे बिल पाठवण्यात आले.
(नक्की वाचा- Ashok Kharat: अशोक खरातचा आणखी एक कारनामा उघड; मविआ सरकारही भोंदूबाबावर मेहेरबान असल्याचे समोर)
वीज बिल पाहून हॉर्ट अटॅक
एवढे मोठे बिल पाहून शिवपाल हादरले. ते बिल दुरुस्तीसाठी वारंवार वीज विभागाच्या कार्यालयात चकरा मारत होते. परंतु अधिकाऱ्यांकडून त्यांना कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. कुटुंबाचा आरोप आहे की, सततचा मानसिक तणाव आणि विभागाच्या दबावामुळे शिवपाल यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
कार्यालयात मृतदेह ठेवून आंदोलन
शिवपाल यांच्या मृत्यूनंतर संतापलेल्या नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह थेट वीज विभागाच्या कार्यालयात नेऊन ठेवला. संतप्त नातेवाईकांना पाहून कार्यालयातील कर्मचारी कार्यालयाला कुलूप लावून तिथून पसार झाले. तणाव वाढल्याचे पाहून ठाणे प्रभारी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. स्थानिक लोकप्रतिनिधींनी दोन्ही बाजूंमध्ये मध्यस्थी केली. बराच वेळ चाललेल्या चर्चेनंतर आणि समजावल्यानंतर नातेवाईकांनी शवविच्छेदन करण्यास नकार देत अंत्यसंस्कार केले.
(नक्की वाचा- Ashok Kharat Case: 'घोर अपराध...', भोंदूबाबाचा पोलिसांसमोर 'थयथयाट', मग थरकाप, पहिल्या दिवशी काय घडलं?)
या प्रकरणावर एसडीओ (SDO) दिलीप साहू यांनी सांगितले की, "बिल जास्त आल्याची तक्रार आम्हाला प्राप्त झाली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल." मात्र, मृत शिवपाल यांच्या मुलीने विभागावर अत्यंत गंभीर आरोप केले असून, वडिलांच्या मृत्यूला वीज विभागच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. या घटनेमुळे उत्तर प्रदेशातील स्मार्ट मीटरच्या अचूकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.