संजय तिवारी, प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची कामगिरी लाजीरवाणी राहिली. काँग्रेसला तर अवघ्या 16 जागांवर समाधान मानवं लागले. काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीतील कामगिरीनंतर पक्षात भाकरी फिरणार आणि पक्षांतर्गत महत्त्वपूर्ण बदल केले जाणार अशी शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान काँग्रेसमधील तरुण नेतृत्वच प्रदेशाध्यक्षपदापासून दूर जात असल्याचं सांगितलं जात आहे. राजकारणात तरुण नेतृत्वाचा अभाव असल्याची बोंब ठोकली जात असताना प्रत्यक्षात सर्वच पक्षातील तरुणांनी मोठं पद घेऊ जबाबदारी घेण्याची गरज आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मात्र काँग्रेसमधील तरुण नेत्यांनी प्रदेश अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याची माहिती आहे. मात्र यामागेही अनेक कारणं असल्याचं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे. संघटनेचे अर्थकारण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे आव्हान ही दोन संभाव्य कारणं आहेत. सतेज बंटी पाटील, अमित देशमुख आणि विश्वजीत कदम यांनी आपल्याला प्रदेशाध्यक्ष पदात रस नसून आपल्याला सध्या हे पद नको असल्याचे स्पष्ट केल्याची माहिती आहे.
दोन मुख्य कारणे..
-संघटनेचा खर्च
-एक दोन महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे मोठे आव्हान.
पहिलं कारण : पहिलं म्हणजे संघटनेचे अर्थकारण. काँग्रेस संघटन चालविण्यासाठी जो खर्च अपेक्षित असतो तो दर महिन्याला सुमारे पाच कोटींच्या घरात असल्याची माहिती आहे. नेते स्वतःहून खर्च करण्यास पुढे येत तर नाहीतच शिवाय, जबाबदारी दिली तर टाळतात किंवा कारणे देतात. नाव न छापण्याच्या अटीवर जाणकार माजी पदाधिकारी सांगतात की, प्रदेशाच्या मुख्य नेत्याला ही तजवीज करावी लागते. अनुभव असाच आहे. याचे कारण, अन्य नेते हात वर करून मोकळे होतात. सत्ता नसताना तर सहसा कोणीच खिशात हात घालत नाही, असाच अनुभव असल्याचे ते सांगतात.
केंद्रात गेली अकरा वर्षे सत्तेपासून दूर असलेली काँग्रेस राज्यात देखील गेली अडीच वर्षे सत्तेबाहेर आहे. ज्या पक्षाने मोठे केले त्याच पक्षाचे मुखपत्र देखील विकत घेण्यास नेते कचरतात. प्रदेश काँग्रेस तर्फे गेल्या पंधरा वर्षांपासून जनमानसाची शिदोरी हे मुखपत्र प्रकाशित करण्यात येते. हे मासिक नियमित निघावे, या उद्देशाने त्याचा खर्च भागविण्यासाठी लहान मोठ्या नेत्यांकडून जबरदस्तीने वरागणी गोळा करावी लागते. ते निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना शिदोरीची वार्षिक वर्गणी जमा करणे अनिवार्य करावे लागले आहे.
नक्की वाचा - Political News : काँग्रेसच्या तरुण नेत्यांचा प्रदेशाध्यक्ष पदासाठी नकार; सूत्रांची माहिती
आता तर प्रत्येक कार्यकर्त्याने दहा रुपयांचा मासिक अंक घेतला पाहिजे असे बोलले जात आहे. यावर माजी पदाधिकारी उलट प्रश्न करतात की, 'ज्या कार्यकर्त्यांना पक्षाकडून काहीच मिळत नाही, फक्त सतरंजी उचलावी लागते किंवा घोषणा द्यावी लागते, वेळे प्रसंगी लाठ्या सहन कराव्या लागतात. त्यांनी पदरचा खर्च करून अंक घ्यावा अशी अपेक्षा करणेच गैर आहे. दुर्दैवाने, आज काँग्रेस हा कोट्यवधी रुपये जमविलेल्या नेत्यांचा गरीब पक्ष झाला आहे. त्यांनीच स्वतः पुढाकार घेऊन नियमितपणे अंक प्रकाशित करून जनतेपर्यंत निःशुल्क पोहचविण्याची व्यवस्था केली पाहिजे. म्हणजे, जनतेपर्यंत काँग्रेसचा विचार पोहोचेल. तीच आजची गरज देखील आहे. पण हे सर्व समोर दिसत असताना यासाठी कोणी पुढाकार घेत नाही. निवडणुकांमध्ये तिकीट मागताना अचानक कुठून पैसे येतात कुणास ठावूक हेच नेते वाट्टेल तो खर्च करण्यास तयार असतात.
विजय वडेट्टीवार यांचे नाव आघाडीवर...
पार्टी हायकमांडकडून विजय वडेट्टीवार यांच्या नावाचा प्रदेशाध्यक्ष पदाकरिता विचार केला जात असल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीत झालेली पिछेहाट आणि अशात आता स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याने वडेट्टीवार यांच्यासारखा आक्रमक नेता अध्यक्ष म्हणून हवा असा पक्षातल्या काही प्रादेशिक नेत्यांचा आग्रह आहे. नाना पटोले यांनी सार्वजनिकरित्या स्पष्ट केले आहे की, प्रदेशाध्यक्षपदावर कुणाचीही निवड झाली तर त्यांची हरकत नसेल. मात्र, वडेट्टीवार यांची प्रदेश अध्यक्षपदी निवड झाली, तर पटोले समर्थकांना ते पचनी पडणार नाही हे निश्चित.
नक्की वाचा - Exclusive : मुंडे, कराड, गुंडाराज अन् लाल डायरी... सुरेश धस एवढे आक्रमक का झाले?
यशोमती ठाकूर, नितीन राऊत यांची ही नावं चर्चेत...
दुसरीकडे प्रदेश काँग्रेसमधील एका गटाकडून यशोमती ठाकूर यांचं नाव वेगाने पुढे करण्यात येत आहे. त्या राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय गोटात सामील असून आक्रमक महिला नेत्या आहेत. प्रभा रावनंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष पदावर कोणतीही महिला नेत्रीची निवड झाली नाही. मात्र यशोमती ठाकूर या विधानसभा निवडणुकीत यशस्वी झाल्या नसल्याने त्यांच्या निवडीबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहेत. अलीकडेच यशोमती ठाकूर यांनी नाना पटोले यांची त्यांच्या गावी भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली होती. निवडणूक याचिका दाखल करण्यासंबंधी ही भेट होती असं नंतर सांगण्यात आलं होतं. विदर्भातील आणखी एक नाव नितीन राऊत सुद्धा अध्यक्षपदासाठी चर्चिले जात आहे. आंबेडकरी समाजाचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत हे ऐनवेळी सर्वांना मान्य होणारे अनुभवी नाव ठरू शकतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world