
माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांनी सरकारी बंगला रिकामा न केल्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. पण त्यांनी हा बंगला का सोडला नाही याचे कारण आता समोर आले आहे. त्यांनी याबाबत NDTV शी सविस्तर चर्चा केली आहे. चंद्रचूड यांनी सरकारी बंगला रिकामा न करू शकण्याची आपली अडचण सांगितली आहे. ते म्हणाले त्यांच्या दोन्ही मुली असाध्य आजाराने ग्रस्त आहेत. एम्स (AIIMS) आणि पीजीआय चंदीगड (PGI Chandigarh) येथील डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. ते सध्या ज्या बंगल्यात राहातात तिथेच आयसीयू (ICU) तयार करण्यात आले आहे. त्यामुळे हा बंगला सोडण्यात अडचणी येत आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
प्रियंका आणि माही यांना 'नेमालाइन मायोपॅथी' नावाचा एक दुर्मिळ आनुवंशिक विकार आहे. जो शरीरातील स्नायूंना प्रभावित करतो. या विकारावर सध्या जगात कुठेही उपचार किंवा इलाज उपलब्ध नाही. या आजारावर भारत आणि परदेशात संशोधन सुरू आहे.चंद्रचूड त्यांनी सांगितले की, 'नेमालाइन मायोपॅथी'मुळे स्नायूची झिज होते. यामुळे श्वसन प्रणालीवर गंभीर परिणाम होतो. स्कोलियोसिसमुळे गिळणे, श्वास घेणे आणि बोलण्याशी संबंधित समस्या निर्माण होतात. त्यामुळे सर्व अवयवांचे नुकसान होते. त्यांना दररोज श्वसनाचे व्यायाम, डिस्फेगियासाठी थेरपी म्हणजेच गिळण्यास मदत करण्यासाठी आणि गुदमरणे टाळण्यासाठी थेरेपी दिली जाते. अन्ननलिकेतील अडथळे रोखण्यासाठी त्यांच्यावर उपचार सुरू आहे. न्यूरोलॉजिकल व्यायाम ही दिला जातो असं त्यांनी सांगितलं.
मुंलींच्या आजारानुसार बाथरूमसह घरात बदल करण्यात आले आहेत. त्यांना एका विशेष आहाराची आवश्यकता असते. शिवाय त्यांना थकवा येणार नाही याची काळजी घ्यावी लागते. कारण यामुळे स्नायू आणखी खराब होतात. माजी सरन्यायाधीशांनी सांगितले की, मुलींवर चांगले उपचार व्हावे यासाठी पल्मोनोलॉजिस्ट, आयसीयू विशेषज्ञ न्यूरोलॉजिस्ट, श्वसन चिकित्सक, व्यावसायिक थेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट आणि सल्लागारांसह आरोग्य सेवा व्यावसायिकांची एक टीम दररोज काम करते. शिवाय काही डॉक्टर्स आठवड्यातून मुलींची तपासणी करतात, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
त्यांनी सांगितले की, प्रियंका डिसेंबर 2021 पासून श्वसन प्रणालीवर म्हणजेच रेस्पिरेटरी सपोर्टवर आहे. तिची एक ट्रेकिओस्टोमी ट्यूब बिपॅप (BiPAP) मशीनशी जोडलेली आहे. तेरा वर्षांच्या असताना तिला पीजीआय चंदीगडमध्ये तीन वेळा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. ट्यूब महिन्यातून अनेक वेळा आणि कधीकधी आठवड्यातून दोनदा बदलावी लागते. तिची दैनंदिन काळजी घेणारे ट्यूब व्यवस्थापनात तज्ञ आहेत. घरी एक आयसीयू सेटिंग आहे, ज्याची देखरेख एक आयसीयू विशेषज्ञ नर्स करते.
आपल्या मुलींबद्दल सांगताना माजी सरन्यायाधीशांनी सांगितले की, प्रियंकाला इन्फेक्शन शक्यता जास्त आहे. तिला धूळ, ऍलर्जी आणि संसर्गापासून वाचवावे लागते. ट्यूब दररोज अनेक वेळा स्वच्छ करावी लागते. प्रियंका आणि माही पीजीआय चंदीगड आणि एम्स दिल्लीतील समर्पित आणि विशेषज्ञ डॉक्टरांच्या व्यवस्थापनाखाली आहेत असं त्यांनी सांगितलं. पालक म्हणून आम्ही मुलांशिवाय एकत्र प्रवास करणे टाळतो. आम्ही मुलींना चांगलं जगता यावं यासाठी प्रयत्नशिल आहोत असं ही त्यांनी सांगितलं. जेव्हा प्रियंका 44 दिवस आयसीयूमध्ये होती, त्यावेली ती कधी बरी होईल या कल्पनेनं आम्ही झोपलो नव्हतो असंही त्यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाने माजी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांना त्यांचे सरकारी निवासस्थान रिकामे करण्यास सांगितले आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला एक पत्रही लिहिले आहे. या पत्रात सरकारला माजी सरन्यायाधीशांना त्यांचे जुने निवासस्थान रिकामे करण्याची विनंती करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world