
Goa Tourism : आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या पहिल्या पसंतीचे राज्य अशी गोवाची ओळख होती. शांत, रमणीय समुद्र किनारे आणि निसर्ग सौंदर्यानं नटलेली गोव्याच्या सुशेगाद संस्कृतीच्या ओढीनं परदेशी पर्यटक नियमितपणे गोव्यात येतात. गोव्याचं अर्थकारण देखील पर्यटनावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. पण, गेल्या काही दिवसात गोव्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे, असा दावा केला जात आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या घसरण्यास इडली सांबार जबाबदार आहे, असा अजब दावा गोव्यातील भाजपा आमदार मायकल लोबो यांनी केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय लावला संबंध?
गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर इडली-सांबारची विक्री होत असल्यानं राज्यात आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या कमी झाली आहे, असा दावा लोबो यांनी केला आहे. उत्तर गोव्यातील कलंगुटमधील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा दावा केला, गोव्यात विदेशी नागरिक कमी येत असतील तर त्याला फक्त सरकारला दोषी ठरवता येणार नाही. कारण, यासाठी सर्व हितधारक समान जबाबदार आहेत, असं लोबो म्हणाले.
गोवेकरांनी समुद्रकिनाऱ्यावरील तसंच इतर ठिकाणची जागा व्यावसायिकांना भाड्यानं दिली आहे, यावर लोबो यांनी नाराजी व्यक्त केली.
त्यांनी सांगितलं की, बेंगळुरुमधील काही जण झोपडीमध्ये वडा पाव देत आहेत. काही जण इडली -सांबार विकत आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटकांमध्ये घसरण झाली आहे. पण, लोकप्रिय दक्षिण भारतीय पदार्थांमुळे राज्यातील पर्यटनावर कसा परिणाम झालाय हे लोबो यांनी सांगितलं नाही.
( नक्की वाचा : Tamil Nadu : भाषेच्या वादात अभिनेता Vijay ची एन्ट्री, अण्णामलाईंनी सांगितला सुपरस्टारचा इतिहास! )
लोबो म्हणाले की, पर्यटकांची संख्या घसरल्यानं मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला आहे. उत्तर आणि दक्षिण गोव्यामध्ये तसंच किनाऱ्यावर परदेशी पर्यटकांच्या संख्येत घसरण झाली आहे. त्यासाठी खूप घटक जबाबदार आहेत.
काही विदेशी पर्यटक गोव्यात दरवर्षी येतात. पण, परदेशातील तरुण पर्यटक इतर राज्यात जात आहेत, असं लोबो म्हणाले.
पर्यटन मंत्रालय आणि इतर सर्व जबाबदार मंडळींनी एकत्र येऊन बैठक घ्यावी. त्यामध्ये विदेशी पर्यटकांची संख्या रोडावण्याची कारणं काय आहेत? याचा अभ्यास करावा असा सल्ला त्यांनी दिला.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे पर्यटक गोव्यात येणे बंद झाले आहे. यापूर्वीच्या सोव्हिएट रशियातील पर्यटक गोव्यात येणं थांबले आहेत, असा दावा त्यांनी केला. आपण जर योग्य व्यवस्था निर्माण केली नाही तर पर्यटन क्षेत्राला काळे दिवस येतील असा इशारा त्यांनी दिला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world