उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. नवऱ्याने आपल्या बायकोची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने तिचा मृतदेह घरामागील अंगणात खड्डा खणून पुरून टाकला. विशेष म्हणजे, पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता.
कशी घडली घटना?
21 डिसेंबर 2025 लुधियाना येथे मजुरी करणारा अर्जुन जेव्हा आपल्या गावी गोरखपूरला परतला, तेव्हा त्याला आपली पत्नी खुशबू मोबाईलवर कोणाशी तरी बोलताना दिसली. खुशबूने अर्जुनपासून मोबाईल लपवून ठेवला होता, असे त्याचे म्हणणे आहे. मोबाईलवरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. संतापलेल्या अर्जुनने खुशबूचा गळा दाबून खून केला.
(नक्की वाचा- Santosh Deshmukh Case: "मला बोलायचंय", कोर्टाने दोनच शब्दात वाल्मीक कराडचं तोंड केलं बंद, सुनावणीत काय घडलं?)
अर्जुनने घरामागे 6 फूट खोल खड्डा खणला आणि खुशबूचा मृतदेह एका फोल्डिंग खाटेसह त्यात पुरला. त्यानंतर त्याने सर्वांना सांगितले की ती कुणालाही न सांगता घर सोडून निघून गेली आहे.
पोलिसांची अशी केली दिशाभूल
काही दिवस शोध घेऊनही खुशबू सापडली नाही, तेव्हा तिच्या वडिलांनी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यांना आपल्या जावयावर संशय होता. पोलिसांनी अर्जुनला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने सुरुवातीला खोटे सांगितले. त्याने आधी सांगितले की खुशबूने आत्महत्या केली असून तिचा मृतदेह त्याने नदीत फेकला आहे. तो तासनतास पोलिसांना नदीकाठी फिरवून दिशाभूल करत होता. मात्र कडक चौकशीनंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला आणि घरामागील खड्डा दाखवला.
(नक्की वाचा- समृद्धी महामार्ग आजपासून 3 दिवस टप्प्याटप्प्याने बंद राहणार; कुठे-कुठे आणि कधी असणार ब्लॉक?)
गोरखपूर पोलिसांनी सांगितले की, आरोपीच्या कबुलीवरून मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. खुशबू आणि अर्जुनचे लग्न 2 वर्षांपूर्वी झाले होते. त्यांना मूलबाळ नव्हते. अनैतिक संबंधांच्या संशयातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.