Burning Bus News: भाविकांनी भरलेल्या बसला आग लागून भीषण दुर्घटना घडली आहे. पोलीस अधीक्षक नरेंद्र बिजारणिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अग्नितांडवामध्ये आठ जणांचे होरपळून मृत्यू झाला आहे. तर 24 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. हरियाणातील कुंडली मानेसर पलवल एक्सप्रेस वेवरील ही घटना आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
(नक्की वाचा: एकाच कुटुंबातील 8 जण नदीत बुडाले, एकाला वाचवण्यात यश)
धावत्या बसला लागली अचानक आग
जखमींना शहरातील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये एकूण 60 भाविक होते. धावत्या बसला आग लागल्याचे पाहून स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि दुर्घटनेची माहिती त्यांनी तातडीने पोलिसांनाही दिली. यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मृत पावलेले सर्वजण पंजाब आणि चंदिगडमधील रहिवासी असल्याचे म्हटले जात आहे. हे सर्व मथुरा आणि वृंदावन येथून दर्शन घेऊन घराकडे परतत होते. दरम्यान पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
(नक्की वाचा: नॉन-स्टिक भांड्यांमध्ये अन्न शिजवणे आरोग्यासाठी धोकादायक, ICMR सांगितले मोठे कारण)
बसमधील सर्व प्रवासी एकमेकांचे नातेवाईक
दुर्घटनेतील जखमी सरोज पुंज आणि पूनम यांनी सांगितले की, "मागील शुक्रवारी एक प्रवासी बस भाडेतत्त्वांवर घेऊन वाराणसी आणि मथुरा-वृंदावनमध्ये दर्शनकरिता पोहोचलो होतो. बसमधील सर्वजण जवळचे नातेवाईक होते. आम्ही सर्व लुधियाणा, होशियारपूर आणि चंदिगडमधील रहिवासी आहोत. शुक्रवारी-शनिवारी रात्री आम्ही सर्वजण दर्शन घेऊन परतत होतो. तेव्हा उशीरा रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास बसला आग लागली. मी पुढील सीटवर बसले होते. कसेबसे स्थानिकांनी मदत करून मला बसबाहेर काढले".
बसमध्ये अग्नितांडव
घटनास्थळी मदतीसाठी पोहोचलेले ग्रामस्थ साबिर,नसीम, साजिद,एहसान यांनी सांगितले की, रात्री उशीरा 1.30 वाजण्याच्या सुमारास धावत्या बसला आग लागल्याचे आम्ही पाहिले. जोरजोरात ओरडून आम्ही चालकाना बस थांबवण्यास सांगितले पण बस थांबली नाही. यानंतर एका तरुणाने बाइकने बसचा पाठलाग केला आणि बसला आग लागल्याची माहिती चालकाला दिली. यानंतर बस थांबली पण तोपर्यंत बसमध्ये भीषण अग्नितांडव घडले होते.
स्थानिकांनी त्यांच्या परिने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. पण पोलीस आणि अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तोपर्यंत प्रवासी गंभीर स्वरुपात जखमी झाले होते आणि यामध्ये आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला.