
Himachal 'Jodidar' Brothers : हिमाचल प्रदेशातील दोन भावांनी एकाच मुलीशी काही दिवसांपूर्वी लग्न केलं. या लग्नाची संपूर्ण देशभर जोरदार चर्चा झाली. याबाबत सोशल मीडियावर वेगवेगळी मतं व्यक्त झाली आहेत. त्यांनी हा निर्णय का घेतला? हा प्रश्न अनेकांना पडला होता. अखेर सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. या 'जोडीदार बंधूंनी' याबाबत एक व्हिडिओ पोस्ट केलाय. त्या माध्यमाधून त्यांनी या लग्नावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
काय सांगितलं कारण?
हिमाचल प्रदेशातील शिलाईच्या थिंदो कुटुंबातील नेगी बंधूंनी पारंपारिक बहुपतित्व पद्धत अर्थात 'जोडीदार प्रथा'नुसार कुन्हाट गावातील सुनीता चौहान हिच्याशी विवाह केला. त्यांनी या निर्णयाचे जोरदार समर्थन केलं आहे. र्वजनिक टीका-टिप्पणीचा आपल्यावर कोणताही परिणाम झाला नाही असे ते म्हणाले, तसेच, शेकडो वर्षांच्या हाट्टी जमातीच्या या परंपरेचा आपल्याला अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले.
फेसबुकवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये, प्रदीप नेगी यांनी सांगितले की ही परंपरा अनेक पिढ्यांपासून चालत आलेली आहे आणि ती यापुढेही सुरूच राहील. "काही लोक सोशल मीडियावर आम्हाला शिवीगाळ करत आहेत, पण मला त्याची पर्वा नाही. ''
ते पुढे म्हणाले की 'जोडीदार प्रथा' केवळ त्यांच्याच प्रदेशात नाही; तर उत्तराखंडमधील जौनसार-बावरमध्येही ती अस्तित्वात आहे, जिथे अशा विवाहामध्ये दोन्ही वर एकाच महिलेसोबत एकमेकांना हार घालतात.
( नक्की वाचा : Akola News : लग्नानंतर दोन महिन्यांनी नवविवाहित तरुणाला प्रेयसीनं पळवलं! धक्कादायक प्रकरणानं जिल्ह्यात खळबळ )
स्वेच्छेनं झालं लग्न
प्रदीप यांचा भाऊ कपिल नेगी यांनी स्पष्ट केले की, त्यांचा विवाह स्वेच्छेने झाला होता, तर काही ठिकाणी जबरदस्तीने विवाह केले जातात. ही व्यवस्था दोन्ही भावांना आणि त्यांच्या पत्नीलाही मान्य होती आणि त्यांच्या कुटुंबानेही या लग्नाला पूर्ण पाठिंबा दिला.
प्रदीप पुढे म्हणाले, "मी आपल्या परंपरा आणि संस्कृतीचा नेहमीच पुरस्कार करत राहीन. ज्यांना आपल्या चालीरीतींबद्दल काहीच माहिती नाही, असे लोकही आपले मत मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही सर्वांनी या लग्नाला सहमती दिली आणि आमचे कुटुंब आणि समाजही यावर आनंदी आहे."
प्रदीप यांनी सांगितले की त्यांचे कुटुंब कमी उत्पन्न असलेले आहे, त्यांच्याकडे फारशी जमीन नाही आणि त्यांना प्रसिद्धीची कोणतीही महत्त्वाकांक्षा नाही. "आम्ही प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी लग्न केलेले नाही," असे त्यांचा भाऊ कपिल म्हणाला.
"एकत्र राहणे आणि एकमेकांवर प्रेम करत राहणे हाच या लग्नाचा एकमेव उद्देश आहे. आम्ही लोकांना विनंती करतो की त्यांनी आमच्यावर टीका करू नये, कारण आमचे आयुष्य आम्ही जगत आहोत आणि त्यात आम्ही समाधानी आहोत," असे प्रदीप यांनी शेवटी सांगितले.
कसं झालं लग्न?
हा विवाह सिरमौर जिल्ह्याच्या ट्रान्स-गिरी प्रदेशातील शिलाई गावामध्ये झाला. 12 जुलैपासून सुरू झालेला हा विवाह सोहळा 3 दिवस चालला, ज्यामध्ये नृत्य, स्थानिक लोकगीते आणि सामुदायिक सोहळ्याचा खास उत्साह होता.
वंशपरंपरागत जमिनीची विभागणी टाळण्यासाठी ही जुनी प्रथा पाळली जाते, जी डोंगराळ भागातील शेती करणाऱ्या समुदायांसाठी एक मोठी समस्या आहे. अशा विवाहातून जन्मलेल्या मुलांचा कायदेशीर पिता म्हणून थोरल्या भावाला मानले जाते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world