
मंडी लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेल्या अभिनेत्री कंगना राणौत यांनी आपल्या व्यावसायिक अडचणी उघडपणे मांडल्या आहेत. हिमाचल प्रदेशात आलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर आपल्या मतदारसंघातील पूरग्रस्त भागाचा दौरा करताना त्यांनी हे दुःख व्यक्त केले. मनालीतील त्यांच्या रेस्तराँमध्ये विक्री घटल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून, ही बाब त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलून दाखवली.
कंगना काय म्हणाली ?
कंगना राणौतच्या म्हणण्यानुसार, तिच्या रेस्तराँची एका दिवसाची विक्री केवळ 50 रुपये इतकी झाली आहे, तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर खर्च महिन्याला 15 लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. आपत्तीग्रस्त भागाचा दौरा करत असताना कंगनाने पलचान गावातील परिस्थिती पाहिली आणि नंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी तिने आपल्या व्यथा मांडताना सांगितले की, "मी पण एक हिमाचली असून, याच भूमीची लेक आहे. लोकं माझ्याकडे मदतीसाठी येतात, पण त्यांनी माझाही त्रास समजून घेतला पाहिजे. मी एकटी स्त्री असून, माझ्या रेस्तराँची विक्री 50 रुपये झाली आहे, तर खर्च 15 लाख रुपये आहे." एका यशस्वी अभिनेत्रीला आणि आता लोकप्रतिनिधी बनलेलल्या कंगनालाही अशा प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने कंगनाचा हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनलाय.
'मेरे रेस्टोरेंट में कल 50 रूपये की सेल हुई है..'
— NDTV India (@ndtvindia) September 18, 2025
बाढ़ पीड़ित महिला जब शिकायत करने सांसद कंगना रनौत के पास पहुंची तो सांसद कंगना ने पीड़ित महिला की सुनने के बजाय उसे ही सुना दिया अपन दुखड़ा#Manali pic.twitter.com/CB5vGSGg0F
अभिनयानंतर राजकारणात स्थिरावत असताना कंगनाला व्यावसायिक पातळीवर कराव्या लागत असलेल्या संघर्षाबद्दल सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. काहीजण तिच्या समर्थनार्थ उतरले आहेत तर काहींनी तिच्यावर टीका करण्यास सुरूवात केली आहे. कंगनाने केलेल्या पाहणी दौऱ्यादरम्यान म्हटले की हिमाचल प्रदेश सरकारने केंद्र सरकारने केलेल्या मदतीसाठी आभार मानले पाहीजेत. केंद्र सरकारने हिमाचल प्रदेशसाठी आतापर्यंत 10 हजार कोटी रुपये खर्च केल्याचे तिने म्हटले आहे. येत्या काळात केंद्र सरकार इथल्या जनतेसाठी आणखी आर्थिक मदत करेल असा दावाही कंगनाने केला आहे.
कंगनाने मनालीमधील प्रीणी इथे एक हॉटेल सुरू केलं आहे. 'The Mountain Story' असं या हॉटेलचे नाव आहे. इथे हिमाचल प्रदेशातील पारंपरीक व्यंजने मिळतात. सोबतच इथे इटालियन आणि कॉन्टीनेंटल पदार्थही मिळतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world