योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News: अकोला जिल्ह्यातील पातूर गावामध्ये श्रद्धेचा आणि परंपरेचा अनोखा संगम पाहायला मिळाला आहे. तब्बल 138 वर्षांची वैभवशाली परंपरा लाभलेली सिदाजी महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. पातूरकरांसाठी एखाद्या दिवाळीसारखाच असणारा हा सण केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित नसून, त्यात सामाजिक भान आणि जागतिक शांततेचा संदेशही दडला आहे. अठराव्या शतकातील महान संत सिदाजी महाराज यांच्या स्मरणाप्रीत्यर्थ भरणाऱ्या या यात्रेने संपूर्ण पातूर गाव भक्तीरसात न्हाऊन निघाले होते.
सिदाजी महाराजांचा वारसा आणि संजीवन समाधी
सिदाजी महाराजांचा जन्म अठराव्या शतकात पातूरमधील माहोकार घराण्यात झाला होता. एक अवलिया संत म्हणून त्यांची ओळख असून त्यांचा भक्तसंप्रदाय आजही खूप मोठा आहे. महाराजांनी 1812 मध्ये गुढीपाडव्यानंतरच्या दहाव्या दिवशी संजीवन समाधी घेतली होती. त्यापूर्वी 1810 मध्ये त्यांनी समाधी मंदिरासमोर ध्वज आणि खास परंपरा असलेल्या टाळाची प्रतिष्ठापना केली होती. याच ऐतिहासिक वारशाची आठवण म्हणून दरवर्षी ही यात्रा साजरी केली जाते. सकाळी होणाऱ्या महाआरतीने या यात्रेचा रितसर प्रारंभ झाला.
( नक्की वाचा : Amravati News: अमरावतीत खळबळ! हनुमान मंदिराचे बांधकाम कुणी अडवले? भाजपा खासदाराचा मोठा आरोप )
दहीहंडीचा प्रसाद आणि बदललेली परंपरा
या यात्रेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे दुपारी होणारी दहीहंडी. गावातील नागरिक मातीची मडकी आणि सजवलेल्या दहीहंड्या घेऊन वाजत-गाजत मंदिरात दाखल होतात. या हंडीमध्ये पोहे, दही, भिजवलेले हरभरे आणि लोणचे यांचे मिश्रण करून प्रसाद भरला जातो. दुपारी 12 वाजता काल्याचे कीर्तन आणि महाआरती झाल्यानंतर सर्व भाविकांना हा प्रसाद वाटला जातो.

विशेष म्हणजे, पूर्वी ही मडकी फोडण्याची प्रथा होती, मात्र आता पातूरकरांनी यात बदल केला आहे. आता ही मडकी फोडली जात नाहीत, तर ती एकत्रित करून ठिकठिकाणी पक्ष्यांसाठी पाणी पिण्याची सोय म्हणून वापरली जातात. परंपरेला पर्यावरणाची जोड देणारा हा उपक्रम सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
जागतिक शांततेसाठी साकडे आणि सामाजिक एकता
यात्रेच्या निमित्ताने भाविकांनी सिदाजी महाराजांच्या चरणी महत्त्वाच्या प्रार्थना केल्या. शेतकरी आणि भारत देश सुख-समृद्धीने नांदो, अशी मागणी तर केलीच, पण त्याचसोबत सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेले युद्ध थांबावे आणि जगात शांतता प्रस्थापित व्हावी, असे साकडेही घातले गेले. संध्याकाळी महाराजांची पालखी वाजत-गाजत गावातून काढण्यात आली. या पालखीचे मानकरी म्हणून भोई समाजाला मान दिला जातो, जे सामाजिक एकतेचे प्रतीक मानले जाते.
गावासाठी महाप्रसादाचे आयोजन
पालखी सोहळ्यानंतर संपूर्ण पातूर गावासाठी महाप्रसादाचे म्हणजेच भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी पहाटेपासूनच जय्यत तयारी सुरू करण्यात आली होती. केवळ पातूरच नव्हे तर आसपासच्या परिसरातील हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. 138 वर्षांपासून अविरत सुरू असलेली ही यात्रा पातूरच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनली असून, यंदाही ती अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world