How RSS works structural process: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे चिरंजीव आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियंक खरगे यांनी आरएसएसच्या रजिस्ट्रेशनवर प्रश्न उपस्थित केले आहेत. खरगे यांच्या या प्रश्नानंतर जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना असलेल्या आरएसएसची कार्यपद्धती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नक्की कसा काम करतो, त्याचे रजिस्ट्रेशन झाले आहे की नाही आणि त्याच्या फंडिंगसह संचालनाची संपूर्ण प्रक्रिया काय आहे, असे अनेक प्रश्न संघ विरोधकांना तसेच संघ माहिती नसलेल्या सामान्य नागरिकंना अनेकदा पडतात.
संघाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी वेळोवेळी या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरएसएस ही एक 'बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स' (व्यक्तींचा समूह) आहे आणि वेगवेगळ्या न्यायालयांच्या निर्णयांमध्येही त्याला याच रूपात मान्यता देण्यात आली आहे.
संघ ही एक वैचारिक संघटना असून मोकळ्या मैदानात भरणाऱ्या शाखांचे संचालन आणि देखभाल स्वतः स्वयंसेवक करतात. संघाचे स्वयंसेवक संघात शिकलेले विचारांच्या आधारावर समाज जीवनात वेगवेगळे संघटन चालवतात. ज्यामध्ये प्रत्येक संघटना आपापल्या पातळीवर स्वतंत्रपणे सरकारी नियमांचे पालन करत काम करते.
( नक्की वाचा : Salman Khan: RSS च्या कार्यक्रमाला सलमान खानच्या उपस्थितीचं कारण काय? जाणून घ्या पडद्यामागची 'रिअल स्टोरी' )
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक रजिस्टर्ड संघटना आहे का?
संघाचे कधीही औपचारिक रजिस्ट्रेशन करण्यात आलेले नाही. सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरएसएसची स्थापना 1925 मध्ये झाली होती. त्या काळात भारतात ब्रिटिशांचे शासन असल्याने रजिस्ट्रेशनचा प्रश्नच येत नव्हता, कारण संघ ब्रिटिशांच्या धोरणांविरोधात सक्रिय होता.
स्वातंत्र्यानंतरही भारतीय कायद्यांमध्ये अशा संघटनांचे रजिस्ट्रेशन अनिवार्य नव्हते, त्यामुळे याला 'बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स' मानले गेले. सरकारने आजवर 3 वेळा संघावर बंदी घातली होती, ज्यावरून हे स्पष्ट होते की सरकारने संघाला एक स्वतंत्र घटक म्हणून मान्यता दिली होती. प्रत्येक वेळी न्यायालयाने ही बंदी उठवल्यामुळे संघाची कायदेशीर स्थिती अधिक स्पष्ट झाली आहे.
( नक्की वाचा : Mohan Bhagwat : 'हम दो, हमारे तीन'ची वेळ आली!लोकसंख्या धोरणावर RSS प्रमुख मोहन भागवत यांचा नवा फॉर्म्युला )
आरएसएसमधील 'गुरुदक्षिणा' प्रक्रिया काय आहे?
आयकर विभागाने एकदा आरएसएसवर कर (टॅक्स) लावण्याचा मुद्दा उपस्थित केला होता, मात्र न्यायालयाने ही संघटना 'बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स' असल्याचे स्पष्ट करत गुरुदक्षिणेवर कर लागणार नाही असा निर्णय दिला. दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने स्वयंसेवक आपल्या इच्छेने गुरुदक्षिणा देतात, ज्याची सुरुवात अगदी 1 रुपयापासून होते. याच निधीतून संघाचे सर्व कार्यक्रम आणि दैनंदिन खर्च चालवले जातात आणि या जमा-खर्चाचा संपूर्ण हिशोब पद्धतशीरपणे ठेवला जातो. स्वयंसेवकांकडून प्राप्त गुरुदक्षिणा राष्ट्रीयकृत बँकात चालू खात्यात ठेवली जाते आणि ज्याचे दरवर्षी ऑडिट सुद्धा होते.
स्वयंसेवकांचा संपूर्ण रेकॉर्ड आणि निर्णय प्रक्रिया
महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर संघावर पहिल्यांदा बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर ही बंदी उठवण्यासाठी संघाची स्वतःची एक लिखित घटना (संविधान) असावी, अशी अट ठेवण्यात आली होती. संघाने ही अट मान्य केली आणि संघ कोणत्याही थेट राजकीय गतिविधींमध्ये भाग घेणार नाही, असेही स्पष्ट केले. याच घटनेच्या आधारे आज संघाचे संपूर्ण संघटन चालते, ज्यामध्ये सरसंघचालक पद वगळता इतर सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची रीतसर निवडणूक घेतली जाते.
संघाची सर्वात महत्त्वाची आणि सर्वोच्च निर्णय घेणारी बैठक म्हणजे 'अखिल भारतीय प्रतिनिधी सभा' होय, जी दरवर्षी मार्च महिन्यात आयोजित केली जाते. याशिवाय 'अखिल भारतीय कार्यकारी मंडळ' वर्षातून 2 वेळा बैठक घेते. राष्ट्रीय पातळीपासून ते थेट जिल्हा आणि शाखा पातळीपर्यंत नियमित बैठकांचे आयोजन केले जाते, जिथे शाखा आणि स्वयंसेवकांचा संपूर्ण रेकॉर्ड ठेवला जातो. दरवर्षी उन्हाळ्यात 'संघ शिक्षा वर्ग' (ओटीसी) आयोजित केला जातो, ज्यामध्ये स्वयंसेवकांना वैचारिक आणि शारीरिक प्रशिक्षण दिले जाते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world