Salman Khan Attends RSS Centenary Event in Mumbai: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुंबईतील एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमात बॉलिवूडचा सुलतान म्हणजेच सलमान खान यानं हजेरी लावल्यानं सध्या संपूर्ण देशात एकच चर्चा रंगली आहे. संघासारख्या हिंदुत्ववादी संघटनेच्या व्यासपीठावर देशातील एका मोठ्या मुस्लिम सुपरस्टारचं उपस्थित राहणं हे सामाजिक आणि राजकीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे. मुंबईतील नेहरू सेंटर सभागारात आयोजित या सोहळ्यात सलमानच्या एन्ट्रीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
संघाच्या शताब्दी वर्षाचा सोहळा आणि सलमानची एन्ट्री
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे शताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त मुंबईत 'नवे क्षितिज' या विशेष व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अभिनेता सलमान खान डार्क निळ्या रंगाचा शर्ट आणि डोळ्यांवर गॉगल अशा डॅशिंग अंदाजात पोहोचला. त्याचा तिथला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
काय आहे सलमानचा इतिहास?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी महोत्सवात अभिनेता सलमान खान ज्या पद्धतीने सहभागी झाला, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, सलमान खानचा इतिहास पाहिला तर त्याचं हिंदुत्ववादी संघटना किंवा हिंदू सण-उत्सवांशी असलेलं नातं खूप जुनं आणि घट्ट असल्याचं दिसतं. इतर मोठ्या मुस्लिम सुपरस्टार्सच्या तुलनेत सलमानची प्रतिमा या बाबतीत नेहमीच वेगळी राहिली आहे.
( नक्की वाचा : Mohan Bhagwat : 'हम दो, हमारे तीन'ची वेळ आली!लोकसंख्या धोरणावर RSS प्रमुख मोहन भागवत यांचा नवा फॉर्म्युला )
घरात गणेश उत्सव आणि सर्वधर्मीय संस्कार
सलमान खानच्या घरी दरवर्षी गणेश उत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गणपती बाप्पाचं आगमन होतं आणि स्वतः सलमान खान गणपतीची आरती करताना अनेकदा दिसला आहे. त्याचे वडील सलीम खान आणि आई सुशीला चरक (सलमा खान) यांनी आपल्या मुलांवर सर्वधर्मीय संस्कार केले आहेत.
सलमानच्या घरात ईद जितक्या थाटात साजरी होते, तितक्याच भक्तिभावाने दिवाळी आणि गणेशोत्सवही साजरा केला जातो. यामुळेच हिंदू संघटनांमध्ये सलमानबद्दल नेहमीच एक मवाळ आणि आपुलकीची भावना राहिली आहे.
मोदींशी मैत्री आणि पतंग महोत्सव
2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा सलमान खान अहमदाबादमध्ये एका पतंग महोत्सवासाठी पोहोचला होता. मोदींसोबत पतंग उडवतानाचे त्याचे फोटो त्यावेळी देशभर व्हायरल झाले होते. त्या काळात अनेक बॉलिवूड कलाकार राजकीय भूमिका घेण्यास घाबरत असताना, सलमानने उघडपणे मोदींची भेट घेऊन सर्वांचे लक्ष वेधले होते. ही जवळीक आजही कायम असल्याचं बोललं जातं.
Narendra Modi and Salman Khan at Kite Festival in Ahmedabad pic.twitter.com/0uCIxdQ4rQ
— ANI (@ANI) January 14, 2014
अन्य खान विरुद्ध सलमान
बॉलिवूडमधील इतर दोन 'खान' म्हणजेच शाहरुख खान आणि आमिर खान यांना अनेकदा त्यांच्या काही विधानांमुळे किंवा भूमिकांमुळे हिंदुत्ववादी संघटनांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. 'असिष्णुता' (Intolerance) या विषयावरील विधानांनंतर शाहरुख आणि आमिरवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. याउलट, सलमान खान अशा वादांपासून नेहमीच लांब राहिला आहे. त्याने कधीही धार्मिक किंवा राजकीय संवेदनशील विषयावर भाष्य करून वाद ओढवून घेतला नाही. त्यामुळेच हिंदू संघटनांच्या निशाण्यावर तो कधीच आला नाही.
'गलवान' चित्रपटाचा संदर्भ आणि आगामी टार्गेट
या कार्यक्रमातील त्याच्या उपस्थितीमागे त्याचा आगामी चित्रपट 'बॅटल ऑफ गलवान' (Battle of Galwan) असल्याचंही बोललं जात आहे. हा चित्रपट भारत आणि चीन यांच्यातील गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षावर आधारित आहे. यामध्ये सलमान खान एका भारतीय लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे.
राष्ट्रवाद आणि भारतीय जवानांच्या शौर्यावर आधारित या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी किंवा त्याला योग्य वातावरण निर्मिती करण्यासाठी सलमानने संघाच्या व्यासपीठावर हजेरी लावल्याची चर्चा चित्रपट वर्तुळात आहे.

संघासारख्या राष्ट्रवादाचा पुरस्कार करणाऱ्या संघटनेच्या कार्यक्रमात उपस्थित राहून सलमानने एका अर्थाने आपल्या आगामी चित्रपटाचा पाया मजबूत केल्याचं मानलं जात आहे.
या कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संघाच्या 100 वर्षांच्या प्रवासावर भाष्य केलं. हिंदुत्ववादी विचारधारेच्या या व्यासपीठावर सलमान खानची उपस्थिती ही अनेकांसाठी धक्कादायक असली तरी, संघाने आपल्या शताब्दी वर्षानिमित्त समाजातील सर्व स्तरांतील दिग्गजांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केल्याचं यातून स्पष्ट होत आहे.
( नक्की वाचा : Mohan Bhagwat : संघ आणि सरकार यांच्यातील 'मतभेद' आणि 'मनभेद' वर मोहन भागवत यांचे स्पष्ट उत्तर )
तिन्ही खानना आमंत्रण पण फक्त सलमान आला
संघाच्या या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी बॉलिवूडच्या तिन्ही खानना म्हणजेच शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांना निमंत्रण धाडण्यात आलं होतं. मात्र, या तिघांपैकी केवळ सलमान खानने प्रत्यक्ष हजेरी लावून सर्वांना चकित केलं.
शाहरुख आणि आमिर या कार्यक्रमाला येणार की नाही याबाबत शेवटपर्यंत स्पष्टता नव्हती, पण सलमानने तिथे उपस्थित राहात सर्वांचं लक्ष वेधलं. केवळ चित्रपटसृष्टीच नाही, तर उद्योग आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनाही यावेळी आमंत्रित करण्यात आलं होतं.
कोणाकोणाला मिळालं होतं निमंत्रण?
या कार्यक्रमासाठी एकूण 1208 लोकांना निमंत्रण देण्यात आलं होतं, ज्यापैकी 850 पेक्षा जास्त पाहुणे उपस्थित राहिले. विशेष म्हणजे ज्या मान्यवरांनी अयोध्या येथील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावली होती, त्या सर्वांना या कार्यक्रमाचं आमंत्रण होतं. यामध्ये अमिताभ बच्चन, अनुपम खेर, आशा भोसले, बोनी कपूर, मधुर भंडारकर आणि चिराग शेट्टी यांच्या नावांचा समावेश होता.
उद्योग विश्वातून कुमार मंगलम बिर्ला आणि अंबानी परिवारालाही आमंत्रित करण्यात आलं होतं. क्रिकेट विश्वातून रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना बोलावण्यात आलं होतं, मात्र वर्ल्ड कपच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ते येऊ शकले नाहीत.
दोन दिवसांचा विशेष कार्यक्रम आणि संवाद
मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये आयोजित हा कार्यक्रम 7 आणि 8 फेब्रुवारी अशा दोन दिवसांचा आहे. पहिल्या दिवशी डॉ. मोहन भागवत यांनी संघाचा प्रवास आणि भविष्यातील दृष्टिकोन यावर मार्गदर्शन केलं. तर दुसऱ्या दिवशी एक विशेष प्रश्नोत्तरांचा तास ठेवण्यात आला होता, ज्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विचारलेल्या प्रश्नांना सरसंघचालकांनी उत्तरं दिली. सामाजिक बदल, राष्ट्रीय मूल्यं आणि भारताची प्रगती यावर चर्चा घडवून आणणं हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world