Thalapathy Vijay: साऊथ सुपरस्टार थलपती विजय (Joseph Vijay) याच्यासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल आज (4 मे 2026) जाहीर होत असून, सुरुवातीच्या कलांमध्ये विजय यांच्या 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) पक्षाने मोठी मुसंडी मारली आहे. गेल्या 50 वर्षांपासून तमिळनाडूच्या राजकारणात वर्चस्व गाजवणाऱ्या DMK आणि AIADMK या दोन मोठ्या पक्षांना मागे टाकत विजयचा पक्ष बहुमताच्या अगदी जवळ पोहोचला आहे.
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री
चित्रपटसृष्टी सोडल्यानंतर विजयने आपला पूर्ण वेळ राजकारणात सक्रिय होण्याचे ठरवले. आजच्या निकालांमध्ये विजय स्वतः पेरांबूर आणि तिरुचिरापल्ली पूर्व या दोन्ही जागांवरून आघाडीवर आहेत. तर दुसरीकडे, विद्यमान मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन कोलाथूर मतदारसंघातून पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. विजय यांच्या या कामगिरीमुळे तामिळनाडूच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता आहे.
(नक्की वाचा- Virar Railway Station Protest: प्रवासी ट्रॅकवर उतरले, लोकल रोखली; विरार स्थानकात फुल राडा! नेमकं काय घडलं?)
'इलायाथलपती' ते 'थलपती' प्रवासाची गोष्ट
विजयला त्याचे चाहते प्रेमाने 'थलपती' (कमांडर) म्हणतात. या नावामागे एक रंजक इतिहास आहे. 1984 मध्ये बालकलाकार म्हणून सुरुवात केलेल्या विजय यांनी 1992 मध्ये 'नालयिया थीरपू' चित्रपटातून नायक म्हणून पदार्पण केले. 1994 मधील 'रसिगन' चित्रपटाच्या यशानंतर त्यांना 'इलायाथलपती' (तरुण कमांडर) ही पदवी मिळाली. त्यानंतर 2017 मध्ये 'मर्सल' चित्रपटावेळी दिग्दर्शक एटली यांच्यासोबत चर्चा करून विजयने 'इलायाथलपती'मधील 'इलाया' शब्द काढून टाकला. तेव्हापासून तो 'थलपती' विजय म्हणून ओळखले जाऊ लागला.
शेवटचा चित्रपट 'जन नायगन'ची प्रतीक्षा
विजयचा शेवटचा चित्रपट 'जन नायगन' (Jan Nayagan) पाच महिन्यांपासून सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात अडकला होता. मात्र, आता निवडणुकीच्या निकालानंतर हा चित्रपट 8 मे 2026 रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात विजय एका माजी पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून, यात बॉबी देओल आणि पूजा हेगडे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.