जाहिरात

Virar Railway Station Protest: प्रवासी ट्रॅकवर उतरले, लोकल रोखली; विरार स्थानकात फुल राडा! नेमकं काय घडलं?

Virar Railway Station : विरार रेल्वे स्थानकात आज सकाळी 8.28 ची नियमित लोकल वातानुकूलित (AC) केल्यामुळे संतप्त प्रवाशांनी रेल्वे रोको आंदोलन केले. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाला प्रवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

Virar Railway Station Protest: प्रवासी ट्रॅकवर उतरले, लोकल रोखली; विरार स्थानकात फुल राडा! नेमकं काय घडलं?

पश्चिम रेल्वेच्या विरार स्थानकावर आज सकाळी प्रवाशांच्या संतापाचा मोठा उद्रेक पाहायला मिळाला. नेहमीची 8:28 वाजताची विरार–चर्चगेट ही साधी लोकल अचानक वातानुकूलित (AC) करण्यात आल्याच्या निषेधार्थ हजारो प्रवाशांनी रेल्वे रुळावर उतरून गाडी रोखून धरली. या आंदोलनामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून प्रवाशांनी प्रशासनाच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

पाच मिनिटांच्या अंतराने दोन AC गाड्या

पश्चिम रेल्वेने 1 मे पासून ही लोकल AC करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आधीच 8.33 वाजता एक AC लोकल उपलब्ध असताना, केवळ पाच मिनिटांच्या अंतराने पुन्हा 8.28 ला दुसरी AC गाडी सुरू केल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. यामुळे सामान्य गाड्यांची संख्या कमी झाली असून, उरलेल्या लोकलमध्ये प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. "प्रशासनाने नवीन AC गाड्या वाढवाव्यात, पण सामान्य गाड्या बंद करून सर्वसामान्यांवर अन्याय करू नये," अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली.

(नक्की वाचा-  Toll Plaza News: मुंबईच्या वेशीवरील 'हा' टोल नाका पुन्हा सुरु होणार? वाहनांकडून होणार वसुली)

दैनंदिन प्रवासाचे गणित बिघडले

विरार-वसई पट्ट्यातील हजारो कामगार, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गासाठी 8.28 वाजताची ही लोकल अत्यंत महत्त्वाची आहे. AC लोकलचे भाडे सामान्य प्रवाशांच्या आवाक्याबाहेर असल्याने अनेकांना आर्थिक फटका बसत आहे. "आम्ही आधीच गर्दीचा सामना करतोय, त्यात आता हक्काच्या गाड्याही हिरावून घेतल्या जात आहेत," असे मत संतप्त प्रवाशांनी व्यक्त केले.

(नक्की वाचा-  Thermos Bottles: सावधान! 3 जणांची दृष्टी गेली, अनेक जण जखमी; 'थर्मॉस'च्या लाखो बॉटल्स आणि जारमध्ये गंभीर दोष)

रेल्वे वाहतुकीवर परिणाम

आजच्या या आंदोलनामुळे पश्चिम रेल्वेच्या अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. काही गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिरा धावत आहेत. स्थानकात पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून सामान्य गाड्यांची संख्या पूर्ववत करावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनांकडून केली जात आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com