हैदराबादमधील सायबराबाद येथील एका 50 वर्षीय महिलेची घरात घुसून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हल्लेखोरांनी महिलेला मारहाण करून तिचा गळा चिरला आणि घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटून नेली आहे. पोलिसांना या प्रकरणात दोन घरकाम करणाऱ्या कामगारांवर संशय आहे.
रेणू अग्रवाल असे मृत महिलेचे नाव असून, त्या पती आणि मुलासोबत स्वान लेक अपार्टमेंटच्या 13 व्या मजल्यावर राहत होत्या. बुधवारी सकाळी 10 वाजता त्यांचे पती आणि मुलगा घराबाहेर पडले. संध्याकाळी 5 वाजता त्यांच्या पत्नीशी संपर्क झाला नाही, त्यामुळे पती लवकर घरी परतले. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
(नक्की वाचा- Chhatrapati Sambhajinagar: ब्लॅकमेलिंगला कंटाळून फार्मसिस्ट तरुणीची आत्महत्या, मन सुन्न करणारी सुसाईड नोट)
गळा चिरण्यापूर्वी प्रेशर कुकरने मारहाण
अग्रवाल यांनी घराचे दार आतून बंद असल्याने प्लंबरच्या मदतीने बाल्कनीतून दार उघडले. आत त्यांना पत्नी रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळली. लगेच त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी रेणू अग्रवाल यांचे हात-पाय बांधले आणि प्रेशर कुकरने त्यांना मारहाण केली. त्यानंतर चाकू आणि कात्रीने त्यांचा गळा चिरून त्यांची हत्या केली. हल्लेखोरांनी घरातून 40 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 1 लाख रुपये रोख रक्कम लुटली. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांनी घरातच आंघोळ केली, रक्त लागलेले कपडे तिथेच सोडून दुसरे कपडे घालून पळून गेले.
सीसीटीव्हीमुळे संशयित समोर
प्राथमिक तपासात दोन पुरुष संशयित म्हणून समोर आले आहेत. यापैकी एक हर्ष हा अग्रवाल यांच्याकडे कामाला होता, तर दुसरा रोशन हा त्यांच्या शेजारच्या घरात काम करत होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे दोघे 13 व्या मजल्यावर जाताना आणि संध्याकाळी 5.02 वाजता पळून जाताना दिसले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे रांचीकडे पळून गेले असल्याचा संशय आहे.
(नक्की वाचा- Samruddhi Highway News: समृद्धी महामार्गावर खिळे कुणी ठोकले? MSRDC चं स्पष्टीकरण आलं समोर)
हर्ष हा झारखंडमधील असून त्याला 10 दिवसांपूर्वी कोलकातातील एका एजन्सीमार्फत कामावर ठेवले होते. हे दोघेही रोशनच्या मालकाच्या दुचाकीवर पळून गेले. याप्रकरणी पोलिस गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु केला आहे.