
Samruddhi Highway News : छत्रपती संभाजीनगर येथील समृद्धी महामार्गावर खीळे लावण्यात आल्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. रस्त्यावर लावलेल्या खिळ्यांमुळे अनेक वाहनांचे टायर पंक्चर झाल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) यावर अधिकृत खुलासा केला आहे. त्यानुसार, महामार्गावर खीळे नव्हे तर, रस्त्यावरील सूक्ष्म तडे भरताना वापरण्यात आलेले ‘अॅल्युमिनिअम नोजल्स' वाहने पंक्चर होण्यास कारणीभूत ठरले आहेत. NDTV मराठीने या बातमीचा पाठपुरावा केल्याने प्रशासनाला जाग आली.
नेमकं काय घडलं?
एमएसआरडीसीने दिलेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर मुंबई दिशेकडील पहिल्या व दुसऱ्या लेनमध्ये साधारण 15 मीटर लांबीचे सूक्ष्म तडे आढळले होते. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामाअंतर्गत, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ‘इपॉक्सी ग्राउटिंग'द्वारे हे तडे भरण्याचे काम सुरू होते. हे काम करत असताना ‘अॅल्युमिनिअम नोजल्स' लावावे लागतात.

Samruddhi Highway MSRDC Letter
हे काम 09 सप्टेंबरच्या रात्री 11.30 वाजता पूर्ण झाले. काम सुरू असताना वाहतूक वळवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर वेगाने आलेल्या काही गाड्यांनी ‘डायव्हर्जन' ओलांडले आणि त्या ‘नोजल्स'वरून गेल्या. त्यामुळे 3 गाड्यांचे टायर पंक्चर झाले. ही घटना 10 सप्टेंबरच्या रात्री 12.10 च्या सुमारास घडली.
कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई
या घटनेची माहिती मिळताच महामार्ग गस्त वाहन रात्री 12.36 वाजता घटनास्थळी पोहोचले होते. सुदैवाने या ठिकाणी कोणताही अपघात किंवा जीवितहानी झालेली नाही. तसेच, 'इपॉक्सी ग्राउटिंग'साठी लावण्यात आलेले ‘अॅल्युमिनिअम नोजल्स' 10 सप्टेंबर रोजी सकाळी 5 वाजता काढण्यात आले असून, सध्या वाहतूक सुरळीत सुरू आहे. दरम्यान, या ठिकाणी 'ट्रॅफिक डायव्हर्जन'साठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याचे दिसून आले. त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचेही एमएसआरडीसीने म्हटले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world