जाहिरात

Galgotias : 25 वर्षात 3 हजार कोटींची झेप, चिनी रोबोट डॉग वादात अडकलेलं गलगोटिया विद्यापीठ कुठं आहे? मालक कोण?

Galgotias University : दिल्लीत सुरू असलेल्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मधून गलगोटिया युनिव्हर्सिटीला बाहेर काढण्यात आलं आहे.

Galgotias : 25 वर्षात 3 हजार कोटींची झेप, चिनी रोबोट डॉग वादात अडकलेलं गलगोटिया विद्यापीठ कुठं आहे? मालक कोण?

India AI Impact Summit : दिल्लीत सुरू असलेल्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट' मधून नोएडा येथील गलगोटिया युनिव्हर्सिटीला (Galgotias University) बाहेर काढण्यात आलं आहे. या समिटमध्ये एका मोठ्या वादामुळे विद्यापीठाची नाचक्की झाली असून यामुळे विद्यापीठाचे संस्थापक पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

नेमका काय आहे वाद?

गलगोटिया विद्यापीठाने प्रदर्शनात 'ओरियन' (Orion) नावाचा एक 'रोबोट डॉग' सादर केला होता. विद्यापीठाने दावा केला आहे की, या रोबोटचा शोध विद्यापीठाने केला आहे. मात्र, तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी हा रोबोट लगेच ओळखला. हा प्रत्यक्षात चीनच्या 'युनिट्री' कंपनीचा 'Unitree Go2' हा रोबोट होता. चिनी रोबोटला स्वतःचा शोध म्हणून सादर केल्यामुळे विद्यापीठावर सर्व स्तरांतून टीका होत आहे. गलगोटिया विद्यापीठाच्या प्रोफेसर नेहा सिंह यांनी सुरुवातीला एका वाहिनीला सांगितलं होते की, युनिव्हर्सिटीने AI क्षेत्रात ३५० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे आणि हा रोबोट त्यांच्या सेंटर ऑफ एक्सलन्सने विकसित केला आहे. फजिती झाल्यानंतर विद्यापीठाने स्पष्टीकरण दिलं की, कदाचित गोष्टी नीट समजावून न सांगितल्यामुळे हा गैरसमज झाला असावा.

नक्की वाचा - Galgotias University: चिनी रोबो कुत्र्यामुळे गलगोटिया विद्यापीठ अडचणीत

कोण आहेत गलगोटिया युनिव्हर्सिटीचे संस्थापक?

गलगोटिया विद्यापीठाचे संस्थापक आणि मालक सुनील गलगोटिया आहेत. ग्रेटर नोएडा येथील या प्रसिद्ध खाजगी विद्यापीठाची पायाभरणी त्यांनीच केली होती. त्यांच्या कुटुंबाचे १९३० च्या दशकात दिल्लीच्या कनॉट प्लेसमध्ये एक छोटे पुस्तकांचे दुकान होते. सध्या त्यांचे पुत्र डॉ. ध्रुव गलगोटिया या विद्यापीठाचे प्रमुख आहेत.

सुनील गलगोटिया यांनी दिल्लीच्या श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून शिक्षण पूर्ण केलं. १९८० च्या दशकात त्यांनी 'गलगोटिया पब्लिकेशन्स'द्वारे प्रकाशनाचे काम सुरू केले. २००० मध्ये त्यांनी 'गलगोटिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी' ची स्थापना केली. २०११ मध्ये उत्तर प्रदेश सरकारने या संस्थेला विद्यापीठाचा दर्जा दिला. सुनील गलगोटिया यांनी अतिशय शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांचे पहिले पुस्तक प्रकाशित करण्यासाठी त्यांना ९,००० रुपये उसने घ्यावे लागले होते. २००० मध्ये केवळ ४० विद्यार्थ्यांसह त्यांनी शैक्षणिक संस्था सुरू केली होती. आज त्यांच्या व्यवसायाचं नेटवर्थ सुमारे ३,००० कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. आज ग्रेटर नोएडामध्ये ५२ एकरांवर हे विद्यापीठ पसरलेलं आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com