India-Pakistan : "ट्रम्प यांना सरपंचाचे अधिकार दिले कोणी?", 'सामना'तून हल्लाबोल

ट्रम्प यांनी भारताचे सार्वभौमत्व विकत घेतले काय? कशाच्या बदल्यात? नक्की काय सौदा झाला? देशाला कळायलाच हवे, असे काही सवाल सामनातून विचारण्यात आले आहेत. 

जाहिरात
Read Time: 3 mins

भारत-पाकिस्तान यांच्यात सुरू असलेला तणाव चार दिवसांना संपुष्टात आला आहे. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान 10 मे रोजी सायंकाळी शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली. मात्र अमेरिकेचे अध्यक्ष यांच्या ट्वीटनंतर झालेल्या निर्णयामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. भारत-पाकिस्तान तणावात अमेरिकेना मध्यस्थी का केली, असा प्रश्न पडला आहे. 

शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून देखील काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. पहलगाम हल्ला करणारे सहा दहशतवादी आले कसे व गायब झाले कसे? त्यांचा ठावठिकाणा का लागला नाही? ट्रम्प यांनी भारताचे सार्वभौमत्व विकत घेतले काय? कशाच्या बदल्यात? नक्की काय सौदा झाला? देशाला कळायलाच हवे, असे काही सवाल सामनातून विचारण्यात आले आहेत. 

Advertisement

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भारत हे एक सार्वभौम आणि स्वतंत्र राष्ट्र आहे. आमच्या राष्ट्रात कोणत्याही बाहेरच्या राष्ट्रास हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. मात्र अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी भारत-पाक संघर्षात हस्तक्षेप केला असून भारताने ट्रम्प यांचा युद्धबंदीचा प्रस्ताव मान्य केला. ट्रम्प यांना हे सरपंचाचे अधिकार दिले कोणी? 1971 च्या भारत-पाक युद्धानंतर दोन राष्ट्रांत जो शिमला करार झाला त्यानुसार दोन राष्ट्रांच्या संघर्षात तिसऱ्या राष्ट्राने परस्पर घुसून हस्तक्षेप करण्याची परवानगी नव्हती. मात्र आता भारताच्या पंतप्रधानांनीच सिमला कराराचे उल्लंघन केले. ‘ऑपरेशन सिंदूर' किंवा पाकिस्तानचा बदला पूर्ण झाला काय? याचे उत्तर देशाला मिळाले नाही, अशी विचारणा सामनातून करण्यात आली आहे.  

Advertisement

सिंदूर उजाडलेल्या 26 भगिनींच्या जखमेवर मीठ

पाकिस्तान जागच्या जागी ठणठणीत उभे आहे व पाकड्या पंतप्रधानांनी ‘युद्ध आम्हीच जिंकलो' अशी वल्गना करून पहलगाम हल्ल्यात सिंदूर उजाड झालेल्या 26 भगिनींच्या जखमेवर मीठ चोळले. हे सर्व घडत असताना पंतप्रधान, संरक्षणमंत्री, गृहमंत्री कोठेच दिसत नाहीत. युद्ध सुरू होण्यापूर्वी संसदेत गृहमंत्री अमित शहा गरजले होते की, पाकव्याप्त कश्मीर हा भारताचाच भाग आहे. त्यासाठी प्राणही देऊ, पण हे कश्मीर घेण्यासाठी भारताचे सैन्य पुढे सरकले तेव्हा मोदी-शहांनी सरळ शस्त्रसंधी स्वीकारली व ट्रम्पपुढे शरणागती पत्करली, अशा शब्दात सामनातून निशाणा साधण्यात आला आहे. 

Advertisement

(नक्की वाचा - India Pakistan Tension: राहुल गांधींची पंतप्रधान मोदींकडे मोठी मागणी, मोदी निर्णय घेणार?)

सहा दहशतवाद्यांचं काय?

शस्त्रसंधीचा खेळ सुरू झाल्यावरही संरक्षणमंत्री ‘ऑपरेशन सिंदूरची' ‘री' ओढत आहेत. तरी मूळ प्रश्न आजही कायम आहेत ते म्हणजे ते सहा दहशतवादी आले कसे व गायब झाले कसे? त्यांचा ठावठिकाणा का लागला नाही? हे प्रश्न विचारले जाणारच. भारतीय सेना, हवाई दल यांनी पाकिस्तानने भारतावर सोडलेले ड्रोन, क्षेपणास्त्र नाकाम केले. पाकड्यंना चोख प्रत्युत्तर दिले, मात्र हे सर्व करत असताना पहलगाम हल्ला घडवून आणणारे ते सहा दहशतवादी नक्की कोठे गेले याचा शोध लागू शकलेला नाही. भारत-पाक युद्धाची ठिणगी त्याच सहा दहशतवाद्यांनी टाकली व भडका उडाला, पण पेटलेल्या होळीवर ट्रम्प यांनी पाणी टाकले व त्या होळीच्या बोंबा सरकार मारत आहे, अशी टीका देखील सामनातून करण्यात आली आहे. 

(नक्की वाचा - India Pakistan Tension : कुटुंबातील प्रत्येक पुरुष ऑपरेशन सिंदूरसाठी सीमेवर; प्रज्ज्वलदेखील लग्नानंतर भुजला रवाना)

इस्रायल-पॅलेस्टाईनचे युद्ध थांबवले नाही

ट्रम्प यांना भारत-पाकमध्ये शांतता नांदावी असे वाटते. ट्रम्प म्हणजे महात्मा गांधी, मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला नाहीत. ते एक व्यापारी आहेत. भारतातील सत्ताधारी व्यापाऱ्यांनी अमेरिकेच्या व्यापारी राष्ट्राध्यक्षांशी हातमिळवणी केली. ट्रम्प यांनी इस्रायल-पॅलेस्टाईनचे युद्ध थांबवले नाही. तेथे सरळ इस्रायलला पाठिंबा देऊन ते ‘गाझा'तील जनतेचे शिरकाण पाहत बसतात आणि भारताला मात्र शांतीचा उपदेश देतात. ट्रम्प यांनी भारताचे सार्वभौमत्व विकत घेतले काय? कशाच्या बदल्यात? नक्की काय सौदा झाला? देशाला कळायलाच हवे, असा सवाल सामनातून करण्यात आला आहे.