- मध्यपूर्वेतील युद्धामुळे एलपीजी सिलिंडर पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे
- आयआरसीटीसीने राजधानी, शताब्दी आणि वंदे भारत गाड्यांमध्ये खाद्यपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विशेष सूचना केल्या
- एलपीजी टंचाई असल्यास रेल्वे स्थानकांवरील किचनमध्ये इंडक्शन आणि मायक्रोवेव्हचा वापर करण्याचे आदेश
मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे व्यावसायिक एलपीजी (LPG) सिलिंडरच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याचा फटका रेल्वेच्या केटरिंग सेवेला बसू शकते. मात्र प्रवाशांची गैरसोय होवू नये, यासाठी आयआरसीटीसीने (IRCTC) कंबर कसली आहे. राजधानी, शताब्दी आणि वंदे भारत यांसारख्या महत्त्वाच्या गाड्यांमधील खाद्यपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विशेष मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यासाठी IRCTC ने भन्नाट शक्कल लढवली आहे.
रेल्वे स्थानकांवरील बेस किचन, फूड प्लाझा आणि जनआहार केंद्रांमध्ये एलपीजीची टंचाई भासल्यास इंडक्शन आणि मायक्रोवेव्हचा वापर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रेल्वे बोर्डाच्या धोरणानुसार, सुरक्षेच्या कारणास्तव एलएचबी (LHB) डब्यांच्या पँट्री कारमध्ये आधीच गॅस सिलिंडरचा वापर बंद करण्यात आला आहे. आता स्थानकांवरील स्वयंपाकघरांमध्येही 'रेडी टू ईट' पदार्थांचा पुरेसा साठा ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जर एखाद्या युनिटमध्ये गॅसअभावी स्वयंपाक बंद पडला, तर त्वरित पश्चिम झोन कंट्रोलला सूचित करणे अनिवार्य करण्यात आले आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वे दररोज सरासरी 16.5 लाख जेवणाचे ताट प्रवाशांना पुरवते. ही साखळी खंडित होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासन आता 'इलेक्ट्रिक कुकिंग'वर भर देत आहे. रेल्वेच्या पँट्री कारमध्ये आग लागण्याचा धोका टाळण्यासाठी आधीच गॅस वापरण्यावर बंदी आहे.
आता स्थानकांवरील मोठ्या किचनमध्येही बॅकअप प्लॅन तयार ठेवण्यात आला आहे. जर गॅस सिलिंडर मिळाले नाहीत, तर विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर करून जेवण तयार केले जाईल. तसेच 'रेडी टू ईट' फूड पॅकेटचा साठा वाढवण्यास सांगण्यात आले आहे. 6 ऑगस्ट 2025 रोजी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, रेल्वे दररोज 16.5 लाख लोकांना जेवण पुरवते. ही सेवा विनासायास सुरू राहावी, यासाठी सर्व झोनला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रवाशांना एलपीजी टंचाईची झळ बसणार नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world