जाहिरात

Kolhapuri Chappal : प्राडाच्या कोल्हापुरी चप्पलची किंमत 1.2 लाख? 'फॅशन, प्रेम आणि युद्धात सर्व माफ'; लेखिका शोभा डे काय म्हणाल्या?

लेखिका शोभा डे यांनीही हा विषय उचलून धरला आहे. मात्र यावरुन सुरू असलेल्या वादावर त्यांनी सवाल उपस्थित केला. फॅशन, प्रेम आणि युद्धात सर्वकाही माफ असं असंही ते यावेळी म्हणाल्या.

Kolhapuri Chappal : प्राडाच्या कोल्हापुरी चप्पलची किंमत 1.2 लाख? 'फॅशन, प्रेम आणि युद्धात सर्व माफ'; लेखिका शोभा डे काय म्हणाल्या?

Kolhapuri Chappal Controversy :  इटलीच्या लग्जरी फॅशन ब्रँड प्राडाच्या नविन कलेक्शनमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. प्राडाने अलीकडेच मिलानमध्ये आपले Men's Summer 2026 कलेक्शन सादर केलं. या शोमध्ये मॉडेल्सच्या पायात जी चप्पल दिसली ती हुबेहुब भारतातील प्रसिद्ध 'कोल्हापुरी चप्पल' सारखी होती. या चपलेची किंमत जवळपास 1 लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. तर भारतात अशीच चप्पल सुमारे 400 ते 500 रुपयाला सहज मिळते. मात्र या ब्रँडिंगनंतर या कंपनीने कोल्हापूरचं नावच घेतलं नाही याचा कोल्हापुरकरांकडून संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर हा विषय उचलून धरत कोल्हापुरी चप्पल हा कोल्हापूरचाच ब्रँड हवा अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

लेखिका शोभा डे यांनीही हा विषय उचलून धरला आहे. मात्र यावरुन सुरू असलेल्या वादावर त्यांनी सवाल उपस्थित केला. फॅशन, प्रेम आणि युद्धात सर्वकाही माफ असं असंही ते यावेळी म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या, ही केवळ चप्पलची जोडी नाही तर बाराव्या शतकातील एक वारसा हक्क आहे. जी पारंपरिकपणे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कारागिरांनी जपून ठेवली आहे. आजही या चप्पल तयार करण्यासाठी सहा आठवडे लागतात. यावेळी त्यांनी त्यांची कोल्हापुरी चप्पल कॅमेऱ्यातून दाखवली. मी खूप काळापासून कोल्हापुरी चप्पल वापरत आहे. पहिलं कारण माझे पूर्वज कोल्हापुरचे आहेत आणि दुसरी तो महाराष्ट्रासाठी वारसा आहे. ज्याचा मला खूप अभिमान आहे. त्यामुळे प्राडाच्या प्रकरणावर वाद घालण्याची गरज नाही. कदाचित यानिमित्ताने कोल्हापुरी चप्पलेचे पुनरुज्जीवन होऊ शकेल. 

प्राडाचा राडा...

काळ्या पांढऱ्या रंगाचा मऊमऊ गालिचा. त्यावर रंगीबेरंगी कपडे घालून पटापटा चालणारे पाय. अन् पायात काय, तर चक्क कोल्हापुरी पायताण. म्हणजे आपली लाडकी कोल्हापुरी चप्पलच की....कराकरा वाजणारी आणि तोऱ्यात चालणारी कोल्हापुरी चप्पल इटली गाजवतेय. पार सातासमुद्रापार तिनं डंका वाजवला आहे. तर हा होता एक फॅशन शो. फॅशनच्या ब्रँडचं नाव प्राडा आणि प्राडानं वापरलेल्या कोल्हापुरी चप्पलमुळे पार राडा झाला आहे. 

नक्की वाचा -  Kolhapuri Chappal : कोल्हापुरी चप्पलवरून सोशल मीडियावर राडा, लग्झरी ब्रँडवर का संतापले नेटीझन्स?


प्राडा म्हणजे जगभरातल्या सेलिब्रिटींचा ब्रँड. एकदा, दोनदा नव्हे तर डझनभर मॉडेल्स चपला घालून रॅम्पवर चालले. त्यांनी कोल्हापुरी चप्पल वापरली मात्र कोल्हापूरकरांना त्याची साधी कल्पनाही दिली नाही. कोल्हापूरचा कारागिर आजही कोल्हापूरच्या गल्ल्यागल्ल्यांमध्ये चपला तयार करतोय. त्याच्याच या चप्पलची कॉपी केली प्राडानं आणि ओरिजनल आयडिया असलेल्या कोल्हापूरकरांना काय मिळालं. एक छदामसुद्धा नाही आणि मानसुद्धा नाही. 

कोल्हापुरी चप्पलेचा इतिहास..

कोल्हापुरी चप्पल आपल्याकडे बाराव्या-तेराव्या शतकापासून वापरली जाते. कोल्हापुरी चप्पल म्हणजे महाराष्ट्राची ओळख आणि शान. कोल्हापुरी चप्पल चामड्यापासून बनवलेली असते, म्हणूनच ती पायातली उष्णता शोषून घेते. कोल्हापुरी चप्पल पायात असली की पाय थंड राहतात. पायात घालायला हलकी आणि चालायला वेगवान अशी ही चप्पल. कोल्हापूरी चप्पल बनतेच अशी की ती वर्षानुवर्षं तुमच्या पायाची पाठ सोडत नाही. शाहू महाराजांनी या कोल्हापुरी चप्पलेला प्रोत्साहन दिलं आणि कुशल कारागिर तयार झाले. 

(लेखिका शोभा डे यांनीही प्राडामध्ये एक लाखांना विकल्या जाणाऱ्या कोल्हापुरी चप्पलेबाबत ट्विट केलं आहे.) 

दुर्देवाने कोल्हापुरी चप्पल इतिहासातच राहिली. तिला मानाचा जीआय टॅग मिळाला पण ना तिचं मार्केटिंग झालं, ना तिला मोठी बाजारपेठ मिळाली. कोल्हापुरानं ढिगानं राजकारणी महाराष्ट्राला दिले. पण कुणीही म्हणावं तसं कोल्हापुरी चपलेचं कधी मनावर घेतलं नाही. आता प्राडानं कोल्हापुरी चप्पल चोरल्यावर सगळे लक्ष घालू असं म्हणत आहेत.इंटरनॅशनल ब्रँड असणाऱ्या प्राडाने त्यांच्या फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चपलेचे प्रदर्शन केलं ही चांगली गोष्ट आहे. प्राडा कंपनीच्या प्रदर्शनामुळे अजून चांगल्या पद्धतीने एकूणच कामाला गती मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.  

कोल्हापुरी चप्पलेला चांगला दर्जा, किंमत मिळणे यासाठी काम होत असतं. चर्मकार महामंडळ यासाठी प्रयत्नशील आहे. चांगल्या कारागिरांच्या माध्यमातुन दर्जेदार चप्पल निर्मिती होणे. त्याची चांगली विक्री दर गरजेच यासाठी प्रयत्न , खासगी कंपनी परवानगी घेतली की नाही माहिती नाही  त्याची किंमत किती यावर आपले नियंत्रण असू शकत नाही.


400 ची चप्पल एक लाखांवर...

आपल्याकडे कोल्हापुरी चपल मिळते 400 ते दीड हजारापर्यंत. प्राडाच्या फॅशन शो मधल्या कोल्हापूरी चपलेची किंमत होती तब्बल 1 लाख 16 हजार. म्हणजे ही चप्पल किती श्रीमंत आहे पाहा. खरं तर ज्या कोल्हापुरी चपलेला जीआय मानांकन आहे, ती कोल्हापुरी चप्पल कुठे वापरायची असेल तर परवानगी घेणं गरजेचं आहे. मात्र आपल्याकडे कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्यांची एकसंघ अशी संघटनाच नाही, त्यामुळे परवानगी कोण देणार याबाबत संभ्रमच आहे. खरं तर आपली कोल्हापुरी चप्पल जगात लय भारी आहे. पण याच कोल्हापुरी चपलेची किंमत आपणच ठेवली नाही, त्यामुळेच तिची झाली चोरी. आता तरी किमान कोल्हापूरच्या कारभाऱ्यांचे डोळे उघडतील. आणि या चपलेला तिच्या मानाचं स्थान देतील अशी आशा आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com