Nirja Modi School Amaira case updates: चौथीत शिकणाऱ्या एका नऊ वर्षांच्या चिमुरडीने शाळेच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या चिमुरडीने टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी वर्गशिक्षकांकडे वारंवार मदतीची याचना केली होती, हात जोडले होते, पण तिच्या तक्रारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं. शाळेतील काही मुलांकडून होत असलेल्या छळाला (Bullying) कंटाळून तिने आपलं आयुष्य संपवलं. या संपूर्ण घटनेचा अंगावर काटा आणणारा थरार आता सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून समोर आला असून, त्यामुळे या प्रकरणाला एक नवं वळण मिळालं आहे.
काय आहे प्रकरण?
हा धक्कादायक प्रकार जयपूरमधील एका प्रसिद्ध शाळेत घडला होता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये घडलेल्या या घटनेचे नवीन सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून, त्यामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अमायरा असं या मृत मुलीचं नाव असून ती निरजा मोदी स्कूलमध्ये इयत्ता चौथीमध्ये शिकत होती. गेल्या वर्षी 1 नोव्हेंबर रोजी तिचा शाळेच्या चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता.

नवीन सीसीटीव्ही फुटेजमध्ये अमायराच्या मृत्यूच्या काही वेळ आधीचा सर्व घटनाक्रम कैद झाला आहे. सुरुवातीला अमायरा अगदी शांत आणि सामान्यपणे वर्गात आल्याचं दिसतं. तिने आपल्या मैत्रिणीला अभिवादन केलं आणि त्यानंतर इतर मुलांसोबत डान्स क्लासमध्येही उत्साहाने सहभाग घेतला. डान्स क्लास संपवून वर्गात परतल्यानंतर मात्र तिथे एक खळबळजनक गोष्ट घडली.
( नक्की वाचा : Dombivli News: आधी डिस्चार्ज ठरला, मग अचानक निर्णय बदलला; अटकेत असलेल्या Ramesh Mhatre ला वाचवतोय तरी कोण? )
... आणि झाला वागण्यात बदल
वर्गातील काही मुलांकडे एक डिजिटल स्लेट (पाटी) होती. ती डिजिटल स्लेट मुलांनी अमायराला वारंवार दाखवली. ती स्लेट पाहिल्यानंतर अमायराच्या वागण्यात अचानक मोठा बदल झाला. ती प्रचंड अस्वस्थ झाली, तिला लाज वाटल्यासारखं झालं आणि ती अभ्यासातून पूर्णपणे बाजूला झाली. त्या स्लेटवर मुलांनी तिच्याबद्दल काहीतरी आक्षेपार्ह आणि त्रासदायक मजकूर लिहिला होता, ज्याचा तिला प्रचंड मानसिक त्रास झाला.
त्यानंतरच्या साधारण 1 तासाच्या फुटेजमध्ये अमायराचा जीवघेणा संघर्ष पाहायला मिळतो. ती मदतीसाठी तब्बल चार ते पाच वेळा आपल्या वर्गशिक्षकेपाशी गेली. तिला काय त्रास होत आहे, हे ती शिक्षकेला सांगण्याचा प्रयत्न करत होती. पण प्रत्येक वेळी ती शिक्षकेला सांगायला जायची, तेव्हा वर्गातील दुसरं एखादं मूल तिथे यायचं आणि शिक्षकेचं लक्ष अमायराच्या तक्रारीवरून विचलित व्हायचं. शिक्षकेने तिला बाजूला घेऊन तिचं म्हणणं ऐकण्याऐवजी, प्रत्येक वेळी तिला पुन्हा जागेवर जाऊन बसण्यास सांगितलं.
( नक्की वाचा : Poisonous Snakes पावसाळा सुरू होताच जमिनीखालून बाहेर पडतात 'हे' 4 यमदूतासारखे साप, वाचा कसा करणार स्वत:चा बचाव )
शिक्षिकेसमोर हात जोडले, पण...
शिक्षकेकडून मदत न मिळाल्यामुळे अमायराची अस्वस्थता आणि भीती आणखी वाढत गेली. एका दृश्यात ती शिक्षकेसमोर अक्षरशः हात जोडताना दिसत आहे. दुसऱ्या एका क्षणी तिने धक्क्याने स्वतःच्या तोंडावर आणि डोक्यावर हात ठेवला आहे. शिक्षकेची वर्तणूक तिच्याशी अत्यंत कठोर होती आणि अमायरा तिथे पूर्णपणे हतबल, असहाय्य झाल्याचं फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे.
शिक्षकेने डावलल्यानंतर अत्यंत निराश झालेली अमायरा वर्गातून एकटीच बाहेर पडली. ती कॉरिडोअरमधून वेगाने जिन्याच्या दिशेने गेली. धक्कादायक बाब म्हणजे, ती तळमजल्यावरून थेट चौथ्या मजल्यापर्यंत जात असताना शाळेच्या एकाही कर्मचाऱ्याने तिला पाहिले नाही किंवा रोखण्याचा प्रयत्न केला नाही. त्यानंतर ती चौथ्या मजल्यावरील गॅलरीच्या रेलिंगवरून तब्बल 48 फूट खाली कोसळली. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, पण तिथे पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

शाळेवर निष्काळजीपणाचा ठपका
या घटनेनंतर सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन म्हणजेच सीबीएससीच्या (CBSE) दोन सदस्यीय तपास समितीने शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. सीबीएससीच्या अहवालानुसार, अमायराचा शाळेत गेल्या 18 महिन्यांपासून छळ केला जात होता. तिला सातत्याने वाईट शब्द बोलले जात होते. या प्रकरणी अमायराने आणि तिच्या पालकांनी वर्गशिक्षिका पुनीता शर्मा यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या, पण शिक्षिकेने त्या नेहमीच फेटाळून लावल्या.
पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबरमध्ये एका मुलाने डिजिटल स्लेटवर आक्षेपार्ह मजकूर लिहून अमायराला त्रास दिला होता, तेव्हा तिच्या वडिलांनी शिक्षकेची भेट घेतली होती. पण त्यावर शिक्षकेने, 'तुमच्या मुलीने इतर मुलांसोबत जुळवून घ्यायला शिकले पाहिजे', असा अजब सल्ला दिला होता. शाळेतील शिक्षक, वर्गमित्र आणि पालकांच्या मते अमायरा अभ्यासात अत्यंत हुशार, मनमिळावू आणि शाळेतील एक 'ऑल-राउंडर' विद्यार्थिनी होती, पण शाळेतील छळाने आणि शिक्षकेच्या दुर्लक्षामुळे तिचा बळी घेतला.

दोषींवर कडक कारवाईची मागणी
अमायराच्या कुटुंबाने आता या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी केवळ वर्गशिक्षकेवरच नाही, तर शाळेचे प्राचार्य आणि चेअरमन यांच्यावरही जुवेनाईल जस्टिस (JJ) ॲक्टअंतर्गत कडक कलमे लावून कारवाई करण्याची मागणी केली आहे. या नवीन सीसीटीव्ही फुटेजमुळे आता निष्पाप अमायराला न्याय मिळणार का हा प्रश्न विचारला जात आहे.
इथे पाहा संपूर्ण VIDEO
🔴#BREAKING | Bullying, Call For Help: CCTV Shows Moments Before Jaipur Schoolgirl's Death@ParmeshwarBawa pic.twitter.com/I2SzgGv3sT
— NDTV (@ndtv) July 10, 2026
| Helplines | |
|---|---|
| Vandrevala Foundation for Mental Health | 9999666555 or help@vandrevalafoundation.com |
| TISS iCall | 022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm) |
| (If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.) | |
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world