कोरोना महामारीपासून सावरल्यानंतर चीनमधील आणखी एका व्हायरसची जगभर चर्चा आहे. HMPV व्हायरस हळूहळू अनेक देशांमध्ये पसरत आहे. भारतातही HMPV व्हायरसचे तीन रुग्ण आढळले आहे. देशात या व्हायरसचा धोका निर्माण झाल्याची चर्चा सुरु आहे. अशात केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी सोमवारी एचएमपीव्ही व्हायरसबाबत सांगितले की, एचएमपीव्ही हा नवीन व्हायरस नाही. 2001 मध्ये प्रथम या व्हायरसचे रुग्ण आढळले होते. अनेक वर्षांपासून जगभरात हा व्हायरस पसरत आहे. हा व्हायरस श्वास आणि हवेतून पसरतो. तसेच सर्व वयोगटातील लोकांना संक्रमित करू शकते. हा व्हायरस हिवाळ्यात आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीला अधिक पसरतो.
आरोग्य मंत्रालय, ICMR आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र चीन तसेच शेजारील देशांमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या व्हायरसची दखल घेतली आहे आणि लवकरच त्याचा अहवाल देशासोबत शेअर करणार आहे, अशी माहिती जेपी नड्डा यांनी दिली.
(नक्की वाचा- HMPV Mumbai : चीनमध्ये धुमाकूळ, भारतात एण्ट्री, मुंबईत HMPV ची स्थिती काय?)
भारतासह जागतिक स्तरावर एचएमपीव्ही आधीपासूनच प्रसारित आहे आणि विविध देशांमध्ये एचएमपीव्हीशी संबंधित श्वसन आजारांचे रुग्ण सापडल्याची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. शिवाय, आयसीएमआर आणि इंटिग्रेटेड डिसीज सर्व्हिलन्स प्रोग्राम (IDSP) नेटवर्कच्या सध्याच्या डेटाच्या आधारे, देशात इन्फ्लूएंझा-सारखे आजार (ILI) किंवा गंभीर तीव्र श्वसन आजाराच्या (SARI) रुग्ण संख्येमध्ये असामान्य वाढ झालेली नाही.
(नक्की वाचा- HMPV Update : पुन्हा मास्क, पुन्हा सॅनिटायझर? भारतात HMPV चे 2 रुग्ण, आरोग्य विभागाने जारी केली नियमावली)
प्रभावित रूग्णांपैकी एकानेही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय सर्व उपलब्ध निगराणी प्रणालीमार्फत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.आयसीएमआर वर्षभर एचएमपीव्ही अभिसरणातील कलाचा मागोवा घेणे सुरू ठेवणार आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) या संसर्गासंदर्भात आधीच सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी चीनमधील परिस्थितीबाबत वेळोवेळी अद्यतनित माहिती पुरवत आहे.