Kanchanjunga Express accident: पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यामध्ये सोमवारी (17 जून) सकाळी कांचनजुंगा एक्सप्रेसला मालगाडीने दिलेल्या जोरदार धडकेमुळे भीषण अपघात झाला. यामुळे एक्सप्रेसचे तीन डबे रुळावरून खाली घसरले. या घटनेमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. ही दुर्घटना सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली.
अपघातात मालगाडीच्या लोको पायलटचाही मृत्यू झाला आहे. काही मिनिटांमध्ये हा अपघात कसा घडला? जाणून घ्या व्हिडीओच्या माध्यमातून...
कांचनजुंगा एक्सप्रेस न्यू जलपाईगुडीपर्यंत पूर्णपणे सुरक्षित होती. प्रवासी सकाळी झोपेतच होते. काहींनी नाश्ता केला होता तर काही जण नाश्ता करण्याच्या तयारीत होते. काही मिनिटांतच मोठी दुर्घटना घडणार आहे? याची कोणीही कल्पना केली नव्हती.
(ट्रेडिंग न्यूज: VIDEO : रीलच्या नादात कार दरीत कोसळली; 23 वर्षीय तरुणीचा मृत्यू)
येथून कांचनजुंगा एक्सप्रेसने आठ किलोमीटरपर्यंतचा प्रवास व्यवस्थितपणे केला. प्रवासी देखील आपापसात गप्पागोष्टी करण्यात व्यस्त होते. आपापले स्टेशन येण्याची वाट पाहत होते.
यानंतर एक्सप्रेसने रंगपाणी स्टेशन ओलांडले. यानंतरच कांचनजुंगा एक्सप्रेस आणि मालगाडीचा अपघात झाला.
(ट्रेडिंग न्यूज: रेल्वे तिकीट बुक करताना इन्शुरन्स कसे काढावे? 45 पैशांमध्ये मिळतो 10 लाखांपर्यंतचा क्लेम)
रंगपाणी स्टेशनंतर एक्सप्रेसने सहा किलोमीटर अंतराचा प्रवास केला आणि ट्रेन पुढे जाऊन थांबली.
जवळपास नऊ वाजण्याच्या सुमारास एक मालगाडी मागील बाजूने आली आणि तिची एक्सप्रेसला जोरदार धडक बसली. परिसरात किंकाळ्यांचा आवाज पसरू लागला. लोक जीव वाचवण्यासाठी धडपड करत होते.
प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितले?
अपघातानंतर सुरू करण्यात आलेल्या मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव सोमवारी (17 जून) घटनास्थळी दाखल झाले होते. रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पॅसेंजर ट्रेन रुळांवर उभी असताना मालगाडीने मागून धडक दिली. यामुळे कांचनजुंगा एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले तर तिसरा डबा मालगाडीच्या इंजिनच्या वर चढला.
(ट्रेडिंग न्यूज: कांचनजुंगा एक्सप्रेस व मालगाडीची धडक कशी झाली? एकावर एक चढले ट्रेनचे डबे, अपघाताची भीषणता दाखवणारे PHOTOS)
कांचनजुंगा एक्स्प्रेसच्या एस 6 क्रमांकाच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या आगरतळा येथील एका प्रवाशाने सांगितले की, त्याला अचानक जोरदार धक्का बसला आणि भयानक आवाज झाल्यानंतर ट्रेन थांबली. मदत आणि बचाव कार्यामध्ये उशीर होत असल्याचा दावाही त्यांनी केला. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना प्रवाशाने सांगितले की, 'माझी पत्नी, मूल आणि मी आम्ही कसेबसे अपघाग्रस्त डब्यातून बाहेर पडलो. आम्ही अजूनही चिंतेतच आहोत. बचाव कार्यही उशीराने सुरू झाले".
सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे झाला अपघात?
पश्चिम बंगालमधील रानीपतरा रेल्वे स्टेशन आणि छत्तर हाट जंक्शन दरम्यानची स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा (Automatic Signaling System) पहाटे 5.50 वाजल्यापासून बंद होती. याच ठिकाणी मालगाडीने सियालदह कांचनजुंगा एक्सप्रेसला मागून धडक दिली. रेल्वेतील सूत्राने ही माहिती दिली.
दुसऱ्या एका रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणेमध्ये बिघाड होतो, तेव्हा स्टेशन मास्टर 'TA 912' नावाची लेखी पत्र जारी करतो, ज्यामुळे चालकाला त्या विभागातील सर्व लाल रंगाचे सिग्नल पार करण्याचा अधिकार मिळतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'रानीपतराच्या स्टेशन मास्टरने ट्रेन क्रमांक 13174 ला 'टीए 912' जारी केला होता.' ते म्हणाले की, 'GFCJ नावाची मालगाडी रंगपाणीहून सकाळी 8:42 वाजता निघाली आणि ट्रेन क्रमांक 13174ला मागील बाजूने धडक दिली. यामुळे गार्ड कोच, दोन पार्सल डबे आणि एक सामान्य डबे असे एकूण तीन डबे रुळावरून घसरले.'
मालगाडीच्या चालकाची होती चूक?
रेल्वे बोर्डने आपल्या प्राथमिक निवेदनामध्ये म्हटले की, मालगाडीच्या चालकाने सिग्नलचे उल्लंघन केले होते. मालगाडीला 'टीए 912' हा वेगामध्ये खराब सिग्नल ओलांडण्यासाठी देण्यात आला होता का? की लोको पायलटने खराब सिग्नलच्या नियमाचे उल्लंघन केले? याबाबतची माहिती तपासानंतरच समोर येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
चालकाने रेल्वे सिग्नलचे उल्लंघन केल्याच्या रेल्वेच्या विधानावर लोको पायलट संघटनेने प्रश्न उपस्थित केले आहेत. भारतीय रेल्वे लोको रनिंगमेन्स ऑर्गनायझेशन (IRLRO) चे कार्यकारी अध्यक्ष संजय पांधी म्हणाले की, 'लोको पायलटच्या मृत्यूनंतर आणि CRS चौकशी प्रलंबित झाल्यानंतर लोको पायलटला जबाबदार घोषित करणे अत्यंत आक्षेपार्ह आहे.' तर दुसरीकडे रेल्वे बोर्डच्या अध्यक्ष जया वर्मा सिन्हा यांनी म्हटले की, "मालगाडीने सिग्नलकडे दुर्लक्ष केल्याने सियालदहकडे जाणाऱ्या कांचनजुंगा एक्स्प्रेसला धडक बसली".
रेल्वेमंत्र्यांकडून मदतीची घोषणा
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, गुवाहाटी-दिल्ली मार्गावर पश्चिम बंगालमधील रंगपाणी येथे सोमवारी (17 जून) सियालदह कांचनजुंगा एक्सप्रेसला मागील बाजूने आलेल्या मालगाडीची धडक बसून झालेल्या अपघाताचा तपास रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (CRS) सुरू केला आहे. अपघातात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपये तर गंभीर जखमी प्रवाशांना प्रत्येकी 2.5 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कांचनजुंगा एक्स्प्रेसला जेथे मालगाडीची धडक बसली तेथे कवच किंवा ट्रेन टक्करविरोधी यंत्रणा उपयोगामध्ये नव्हती.