
उत्तराखंडमधील केदारनाथ धाम यात्रा देशभरात भाविकांसाठी एक आस्थेचं केंद्र आहे. दरवर्षी लाखो भाविक बाबा केदारनाथ यांच्या दर्शनासाठी येत असतात. उंच डोंगर आणि दुर्गम रस्ते असल्या कारणाने येथे हेलिकॉप्टरच्या सेवेची मागणी वाढत आहे. विशेषत: वृद्ध आणि कमी वेळात दर्शन घेण्यासाठी येणारे भाविक हेलिकॉप्टरने जाणं पसंत करतात. कारण कमी वेळात त्यांना दर्शन घेता येतं. मात्र गेल्या काही दिवसात हेलिकॉप्टर कोसळल्याच्या घटनांनी भाविकांमध्ये भीती पसरली आहे.
रविवारी सकाळी केदारनाथच्या गौरीकुंडमध्ये एक हेलिकॉप्टर कोसळलं. ज्यामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यात पायलट आणि एका मुलासह आणखी ५ जण होते. आता प्रश्न असा निर्माण होतो की या लोकांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळेल का?
हेलिकॉप्टरचं भाडे किती आहे?
केदारनाथसाठी हेलिकॉप्टर सेवा प्रामुख्याने फाटा, सिरसी आणि गुप्तकाशी सारख्या हेलिपॅडवरून उपलब्ध आहे. हे भाडे सरकार निश्चित करते आणि दरवर्षी चारधाम यात्रेपूर्वी जाहीर केले जाते.
फाटा ते केदारनाथ (फेरी प्रवासाचे भाडे) प्रति व्यक्ती ५,५०० ते ६,००० रुपये
सिरसी ते केदारनाथ ५,००० ते ५,८०० रुपये
गुप्तकाशी ते केदारनाथ ७,५०० ते ८,००० रुपये
हे भाडे एका व्यक्तीच्या फेरी प्रवासासाठी आहे. मुलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळे दर नाहीत, परंतु वजन मर्यादा विचारात घेतली जाते.
विमान कोसळल्यानंतर किती भरपाई मिळेल?
- हेलिकॉप्टर अपघात ही एक दुर्दैवी घटना आहे. परंतु नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) आणि हेलिकॉप्टर ऑपरेटर कंपन्यांनी अशा परिस्थितीसाठी नियम आणि विमा निश्चित केला आहे.
- मृत प्रवाशांच्या कुटुंबाला विम्याअंतर्गत ५ लाख ते २० लाखांपर्यंतची भरपाई मिळू शकते. ही भरपाई ऑपरेटरच्या पॉलिसीनुसार असेल.
- जखमी प्रवाशांना वैद्यकीय खर्च आणि भरपाई दिली जाते. ज्याची रक्कम वेगवेगळी असू शकते.
- प्रत्येक ऑपरेटरला प्रवाशांसाठी वैध विमा बंधनकारक आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world