1 hour ago

महापालिकांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांची सदस्य संख्या किती असावी, प्रभाग रचना कशी असावी आणि प्रभाग रचना, सदस्यांची संख्या राज्य निवडणूक आयोगाने ठरवावी की राज्य सरकारने आणि ओबीसी आरक्षणासहित निवडणुका घेतल्या जाव्यात की नाही आदी विविध विषयांवर सर्वोच्च न्यायालयात प्रश्न प्रलंबित असताना आता याबाबतची सुनावणी आज म्हणजेच 25 फेब्रुवारीला होणार आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्यास एप्रिल-मे महिन्यात निवडणुका होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.  
 

Feb 25, 2025 13:02 (IST)

Live Update : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसंबंधातील सुनावणी पुढे ढकलली, पुढच्या मंगळवारी होणार सुनावणी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसंबंधातील सुनावणी पुढे ढकलली, पुढच्या मंगळवारी होणार सुनावणी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती, मात्र ती पुढे ढकलण्यात आली आहे. 

Feb 25, 2025 11:28 (IST)

Live Update : नाशिक कुंभ मेळ्यासंदर्भात उद्या महत्त्वाची बैठक

नाशिक कुंभ मेळ्यासंदर्भात उद्या महत्त्वाची बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्री गिरीश महाजन यांनी बोलावली बैठक

रस्ते, विमान, रेल्वे वाहतुकीसंदर्भात होणार महत्त्वाची चर्चा

दोन वर्षांनंतर नाशिकमध्ये होणार कुंभमेळा

Feb 25, 2025 11:24 (IST)

Live Update : मस्साजोग ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन, संतोष देशमुख यांच्या आई आणि मुलगी वैभवीही सहभागी

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 77 दिवस उलटून गेले आहेत. असे असतानाही या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळे हा अद्याप फरारच आहे. कृष्णा आंधळेला तत्काळ अटक करावी यासह नऊ मागण्या देशमुख कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र या मागण्या मान्य होण्यास विलंब होत असल्याने आजपासून देशमुख कुटुंबीय आणि मसाजोग ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. 

आता या आंदोलनात संतोष देशमुख यांच्या आई आणि त्यांची मुलगी वैभवी यादेखील सहभागी झाल्या आहेत. या ठिकाणी ग्रामस्थ देखील आंदोलनात सहभागी झाले असून काही वेळातच मराठा आंदोलन म्हणून जरंगे पाटील हेदेखील आंदोलनासाठी मस्साजोगमध्ये दाखल होणार आहेत. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा विचार आहे यावेळी आंदोलकांकडून देण्यात आला आहे.

Feb 25, 2025 10:51 (IST)

Live Update : शरद पवार यांचा हिंगोलीतील नियोजित दौरा रद्द

हिंगोलीतील शरद पवार यांचा दौरा रद्द झाला आहे, शरद पवार हे आज संत नामदेव महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या नरसी नामदेव येथे भेट देणार होते त्याचबरोबर हिंगोली शहरात स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशमुख टाकळ गव्हाणकर यांच्या शताब्दी वर्षपूर्ती गौरव सोहळ्यात उपस्थित राहणार होते. कार्यक्रमाची जय्यत तयारी देखील करण्यात आली होती,  मात्र अचानक शरद पवारांचा दौरा रद्द झाला आहे, महिनाभरापूर्वी देखील शरद पवार यांचा हिंगोली दौरा आयोजित करण्यात आला होता. मात्र शरद पवारांची तब्येत खालावल्याने तेव्हा देखील दौरा रद्द करावा लागला होता , आत्ता पुन्हा एकदा शरद पवारांचा दौरा रद्द झाल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.. तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नांदेडहून हिंगोलीकडे रवाना झाले आहेत..

Advertisement
Feb 25, 2025 10:43 (IST)

Live Update : सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थेची सुनावणी होण्याची शक्यता कमी

सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थेची सुनावणी होण्याची शक्यता कमी

कोर्ट क्रमांक 3 दुपारी 1 वाजेपर्यंतच बसणार आहे. 

त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रकरण 29 वर सुनावणी होण्याची शक्यता कमी

याचिकाकर्ते आणि राज्य सरकार दोन्ही पक्षांना पुढील तारीख घेण्यासाठी प्रकरण मेन्शन करावे लागणार 

त्यानंतर पुढील तारीख लवकरात लवकर घ्यावी लागेल. 

मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी झाली तरच निवडणूका लवकर होण्याची शक्यता. 

परंतु पुढील आठवड्यात सुनावणी झाली नाही तर पावसाळ्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होतील.

Feb 25, 2025 10:41 (IST)

Live Update : गणपतीपुळ्याच्या समुद्रात झेपावली 47 कासवांची पिल्लं

रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर सागरी कासव संरक्षण आणि संवर्धन मोहिमेत सागरी कासवांची 47 पिल्ले समुद्रात सुरक्षितपणे सोडण्यात आली. गणपतीपुळे येथे समुद्र किनाऱ्यावर कांदळवन दक्षिण विभाग परिक्षेत्र रत्नागिरीच्या वतीने सागरी कासव संरक्षण आणि संवर्धन मोहीम अंतर्गत अंडी उबवणी केंद्रामध्ये कासवांच्या संरक्षित प्रजाती तयार केल्या जात आहेत. त्यामध्ये ठेवण्यात आलेल्या घरट्यांमधील सुमारे 137 कासवांची पिल्ले किनाऱ्यावर संरक्षित करण्यात आली होती. संरक्षित केलेल्या अंड्यांमधील 47 पिल्लांना सुरक्षितरित्या गणपतीपुळे अंडी उबवणी केंद्रासाठी नियुक्ती करण्यात आलेले कासवमित्र वीरेंद्र सुर्वे व मालगुंड येथील कासवमित्र आदित्य मयेकर यांच्या विशेष सहकार्यान गणपतीपुळे समुद्रात सोडण्यात आलं आहे.

Advertisement
Feb 25, 2025 10:38 (IST)

Live Update : भविकाकडून श्रीतुळजाभवानी चरणी अर्धा किलो सोन्याचा मुकुट अर्पण

श्रीतुळजाभवानी मातेच्या चरणी ठाणे येथील भक्ताने 540 ग्रॅम  वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. देवसमर्पनाच्या भावनेतून देवीसाठी सुवर्णालंकार अर्पण केल्याचे भाविकांनी सांगितले. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तर्फे भाविक कुटुंबीयांचा देवीची प्रतिमा व महावस्त्र देऊन सत्कार करण्यात आला.

Feb 25, 2025 09:08 (IST)

Live Update : इंदापूरचं ग्रामदैवत इंद्रेश्वर महाराजांना विविध कावडींच्या मंगल कलशातून जलाभिषेक

इंदापूरचं ग्रामदैवत इंद्रेश्वर महादेव रथोत्सवानिमित्त पंचक्रोशीतील विविध कावडींच्या मंगल कलशातून इंद्रेश्वर शंभू महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करण्यात आलाय.यावेळी कांबळे बंधू यांची शंभर वर्षाची परंपरा असलेल्या मानाच्या कावडीचं पारंपारिक वाद्याच्या गजरात आगमन झालं.

Advertisement
Feb 25, 2025 08:12 (IST)

Live Update : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना पितृशोक

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव रामचंद्र गोरे यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. मागील काही दिवस त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यावर बोराटवाडी ता. माण जिल्हा सातारा येथे सायंकाळी 4 वाजता अंत्यविधी होणार आहे.

Feb 25, 2025 07:09 (IST)

Live Update : नंदुरबारमध्ये विहिरीत पडल्याने बिबट्याचा मृत्यू

नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील तिजोरा शिवारातील एका शेतातील विहिरीत बिबट्या पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. साहेबराव गायकवाड यांच्या शेतातील विहीरीत हा मृत बिबट्या आढळून आला. शेतात पाणी सोडल्यानंतर मोटार पाणी सोडतांना त्रास देत असल्याने विहीरीत पाहीले असता त्यांना मृत बिबट्या आढळून आला. शेतातील मेढींच्या सुगाव्याने हा बिबट्या आला मात्र विहीरीची कल्पना न आल्याने तो विहिरीत पडून मृत पावल्याचा अंदाज वर्तवल्या जात आहे. 

Feb 25, 2025 07:08 (IST)

Live Update : वर्ध्यात एका रुग्णामध्ये जीबीएसची लक्षणं, जिल्हा आरोग्य विभाग अलर्टवर

वर्ध्यात एका रुग्णामध्ये जीबीएसची लक्षणं आढळून आली आहेत

साहूर परीसरातील 85 वर्षीय व्यक्तीला जीबीएस सदृश लक्षणे दिसून आली आहेत.

रुग्णावर नागपूर येथे उपचार सुरू आहे, लॅबचे रिपोर्ट अद्याप मिळू शकलेले नाहीत