PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NDTV नेटवर्कला विशेष मुलाखत दिली आहे. एनडीटीव्ही ग्रुपचे मुख्य संपादक संजय पुगलिया यांनी विचारलेल्या थेट प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेधडक उत्तरे दिली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप-एनडीए ऐतिहासिक विजय मिळवेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. विरोधकांचे आरोप, भारताच्या विकासाचे व्हिजन, विरोधकांचे राजकारण अशा विविध राजकीय-सामाजिक मुद्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली.
प्रश्न - तुम्ही दोन गोष्टींचा उल्लेख करता, एक म्हणजे अयोध्येमध्ये आता एक हजार वर्षांचा पाया रचला जात आहे आणि दुसरे म्हणजे 100 वर्षांचा अजेंडा सेट केला जात आहे. ज्याची झलक मोदी सरकारच्या तिसऱ्या अध्यायामध्ये पाहायला मिळेल व वर्ष 2047बाबत तुम्ही वारंवार भाष्य करत आहातच. तर यापुढे तुमचे सर्वात मोठे लक्ष्य काय असणार आहे?
PM नरेंद्र मोदी : तुम्ही पाहिले असेलच की मी तुकड्यातुकड्यामध्ये विचार करत नाही. माझा अतिशय व्यापक आणि एकात्मिक दृष्टीकोन आहे. दुसरे म्हणजे मीडियाचे लक्ष वेधण्यासाठी काम करण्याची मला सवय नाही. मला असे वाटते की कोणत्याही देशाच्या कार्यपद्धतीमध्ये काही टर्निंग पॉइंट येतात. वैयक्तिक आयुष्यातही काही टर्निंग पॉइंट येतात. जर आपण त्या मार्गावर चाललो तर त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. खासगी जीवनातही जसे वाढदिवस साजरा केला जातो, यामुळे उत्साह वाढतो. तसेच आता आपण स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत होतो, तेव्हा माझ्या मनात 75 वर्षे मर्यादित नव्हती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तर यापुढील 25 वर्षे लक्षात ठेवून म्हणजे वर्ष 2047 डोळ्यासमोर ठेवून महामंथन केले. यासाठी लाखो लोकांनी इनपुट दिले आहेत. कदाचित 15-20 लाख युवकांकडून माझ्याकडे सूचना आल्या आहेत. इतक्या दीर्घकाळापासून काम करतोय की यातील काही अधिकारी निवृत्त देखील झाले आहेत. मंत्री, सचिव, तज्ज्ञमंडळींकडून आम्ही सल्ले घेतले आहेत. या कार्याची मी 25 वर्षे, यानंतर पाच वर्षे, एक वर्षे व 100 दिवस अशा टप्प्यांमध्ये विभागणी केली आहे. यामध्ये काही गोष्टी जोडल्या जातील तर काही सोडाव्याही लागतील. यामध्ये आम्ही आणखी 25 दिवस जोडले आहेत. तरुणांमध्ये फार उत्साह असल्याचे दिसत आहे. यास योग्य दिशा दाखवली तर अतिरिक्त फायदे मिळतील. यासाठी मी 100 अधिक 25 दिवस म्हणजे 125 दिवसांचे काम करू इच्छितो.
(नक्की वाचा- मतदान करा आणि हॉटेलमध्ये स्वस्तात भरपेट जेवण करा; मुंबईकरांसाठी स्विगीची भन्नाट ऑफर!)
आता आम्ही 'माय भारत' पोर्टल व अॅप लाँच केले आहे. याद्वारे मी कशा पद्धतीने देशातील तरुणांशी जोडला जाऊ शकतो? त्यांना मोठे स्वप्न पाहण्याची सवय कशी लावू शकतो? त्यांना मोठे स्वप्न सत्यात उतवरण्याची सवय कशी लावू शकतो? यावर लक्ष्य केंद्रीत करू इच्छितो. मला विश्वास आहे की या सर्व प्रयत्नांचे चांगले परिणाम मिळतील. मी वारसा आणि विकास या दोन्ही गोष्टी एकत्रितरित्या घेऊन मी पुढे जातो. आता अशा घटना घडत आहेत, ज्या आपल्याला हजार वर्षांच्या उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जात आहेत. त्यामुळे हीच आमची वेळ आहे आणि हीच भारताचीही वेळ आहे, आता ही संधी सोडता कामा नये.
पाहा संपूर्ण मुलाखत
प्रश्न - यासाठी तुमच्याकडे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत, त्यातील एक मोठी गोष्ट म्हणजे पायाभूत सुविधांवरील काम. 60% पेक्षा जास्त रस्ते- पूल-महामार्गांची निर्मिती केली गेली. विमानतळांचीही संख्या दुप्पट झाली आहे. लोक खूप प्रवास करत आहेत, एवढ्या वेगाने बांधकाम होऊनही सुविधा कमीच वाटत आहेत. तर यामध्येही तुमचा एखादा नवीन फोकस असणार आहे का?
PM नरेंद्र मोदी : पहिली गोष्ट म्हणजे स्वातंत्र्यानंतर लोक तुलना करतात की स्वातंत्र्य झालेल्या देशांनी इतकी प्रगती केली तर मग आपण का मागे आहोत? दुसरे म्हणजे गरिबीसंदर्भात आपण ठीक आहे, चालते; असा विचार करतो. पण मोठा आणि भविष्याचा विचार करावा लागेल. आपल्या देशामध्ये पायाभूत सुविधांचा खूप गैरवापर झाला, असे मला वाटते. पूर्वी इन्फ्रास्ट्रक्चरचा अर्थ म्हणजे प्रकल्प जितका मोठा तितकी जास्त मलई. तर हे मलई फॅक्टरशी जोडले गेले होते. यामुळे देश उद्ध्वस्त झाला. मी पाहिले आहे की वर्षानुवर्षे पायाभूत सुविधांच्या योजना एकतर कागदावरच अस्तित्वात आहेत किंवा तेथे दगड ठेवला गेलाय अथवा केवळ पायाभरणी झालीय. मी येथे आल्यानंतर प्रगती नावाच्या कार्यक्रमांतर्गत मी सर्व कामांचा आढावा घ्यायचो. आढावा घेऊन मी कामांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. दिरंगाईला कुठेतरी आपलीच मानसिकता, ब्युरोकसी जबाबदार आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी काही प्रयत्नही केले होते. ते अधिक काळ जगले असते तर सरकारी यंत्रणांच्या मूलभूत रचनेत बदल झाला असता.
आपल्या जीवनाचे उद्देश काय आहे? हे सरकारी अधिकाऱ्यांनी कळणे गरजेचे आहे. पदोन्नती कधी मिळेल, उत्तम विभाग कधी मिळेल; केवळ इथंवरच मर्यादित राहून चालणार नाही. एक प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चरमध्येही भौतिक पायाभूत सुविधा, सामाजिक पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानविषयक पायाभूत सुविधा या सुविधांमध्येही आणखी एक गोष्ट आहे. ते म्हणजे एक तर स्कोप आणि स्केल मोठे असावे; त्यानुसार स्पीड देखील असावा. म्हणजे स्कोप, स्किल आणि स्पीडसोबत स्किल देखील असायला हवे. जर आपण या चार गोष्टी एकत्रित करून काम करू शकलो तर मला वाटते की आपण बरेच काही साध्य करू शकतो. त्यामुळे स्किल, स्केल आणि स्पीड देखील उपलब्ध असावे तसेच कोणतीही संधी आपण सोडता कामा नये; हाच माझा प्रयत्न आहे.
पूर्वी कॅबिनेटचे नोट्स तयार करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागत असे. आता जवळपास 30 दिवस लागत आहेत. आगामी काळामध्ये आणखी कमी वेळ लागेल. वेग म्हणजे बांधकामांचा स्पीड वाढवणे, असा अर्थ होत नाही. तर निर्णय प्रक्रियेमध्येही गती आली पाहिजे. दुसरीकडे जगभरात आपल्या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरसंदर्भात जितकी चर्चा होते, तितकी गतीशक्तीबाबत चर्चा होताना दिसत नाही.
तंत्रज्ञानाचा अप्रतिम वापर म्हणजे स्पेस टेक्नोलॉजीचा उपयोग आणि संपूर्ण देशामध्ये कोठेही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टचे काम करण्यासाठी, लॉजिस्टिक खर्च कमी करण्यासाठी आणि लॉजिस्टिक सपोर्ट वाढवण्यासाठी गतिशक्ती हे एक उत्तम व्यासपीठ असेल. हे प्लॅटफॉर्म जेव्हा मी लाँच केले तेव्हा राज्यांचे मुख्य सचिव खूप खूश झाले होते. आधुनिक रेल्वे सेवेमध्येही सर्व बाबी बारकाईने पाहण्यात आल्या. याचा फायदा प्रवाशांनाही होत आहे.
(वाचा - मविआ किती जागा जिंकणार? खरगे- ठाकरेंचे आकडे वेगवेगळे, पवारांचा अंदाज काय?)
प्रश्न - ब्युरोकसीमध्ये आपण बरेच बदल केले आहेत. तुम्ही सरदार पटेलजींचाही उल्लेख केला. त्यामुळे मला वाटते की तुम्ही सर्व कार्य पार पाडण्यासाठी प्रशासनाच्या रचनेत मोठ्या प्रमाणावर बदल करू पाहत आहात?
PM नरेंद्र मोदी : प्रशिक्षण आणि भरती प्रक्रिया ही सर्वात मोठी गोष्ट आहे. यावर मी खूप भर दिला आहे. आम्ही प्रशिक्षणार्थी संस्थांचा संपूर्ण कायापालट केला आहे. प्रत्येक स्तरावर तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करण्याच्या दिशेने भर देत आहोत. आता भरती प्रक्रियेतही मी कनिष्ठ स्तराच्या मुलाखती प्रक्रिया पूर्णपणे बंद केल्या आहेत. कारण यामुळे भ्रष्टाचार वाढत होता. गरीब माणसाची लुट केली जात होती. आता गुणवत्तेच्या आधारावर नोकरी द्यायची की नाही हे संगणक ठरवते. यामुळे वेळेचीही बचत होते.
माझ्या मंत्रिमंडळात एक महत्त्वपूर्ण परंपरा सुरू केली आहे ते म्हणजे संसदेचे कोणतेही विधेयक येते, तेव्हा त्यासोबत जागतिक दर्जाची नोट येते. जगातील कोणता देश कोणत्या क्षेत्रामध्ये सर्वोत्तम कामगिरी करत आहे? त्याचे कायदे-नियम काय आहेत? आपल्यालाही त्या गोष्टी साध्य करायच्या असतील तर आपण कसे काम केले पाहिजे? म्हणजेच कॅबिनेटमधील प्रत्येक नोट ग्लोबल स्टँडर्डशी जुळवूनच आणावी लागते आणि याची नोकरदार वर्गाला सवयही झाली आहे. त्यामुळे केवळ बोलून काहीही उपयोग नाही. त्यासाठी काम करावे लागेल. उदाहरणार्थ आपल्या देशांमध्ये तेराशे बेट आहेत. जेव्हा मी याबाबत विचारणा केली तेव्हा आपल्याकडे याबाबत कोणताही तपशील-सर्व्हे नव्हता. यासाठी मी स्पेस टेक्नोलॉजीचा वापर केला. देशामध्ये जितके बेट आहेत, त्या सर्व जागांचा सर्व्हे केला. काही बेटे जवळपास सिंगापूरच्या आकाराची आहेत. याचा अर्थ आपण प्रयत्न केल्यास नवीन सिंगापूर तयार करणे हे भारतासाठी अवघड काम नाही. त्या दिशेने काम करत आहोत.
प्रश्न - तर मग पायाभूत सुविधा किंवा विकासाबाबत चर्चा करताना काही गोष्टी लवकरच घडू शकतात, ज्याचा आपण विचारही केलेला नाही, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
PM नरेंद्र मोदी: बरेच काही होणार आहे. उदाहरणार्थ डिजिटल एम्बसीची कल्पना, आम्ही याचा फार प्रचार करत आहोत. गरिबांच्या सक्षमीकरणाचे सर्वात मोठे साधन म्हणजे डिजिटल क्रांती. आज संपूर्ण जगाला विश्वास आहे की AI क्षेत्रामध्ये भारत संपूर्ण जगाचे नेतृत्व करेल. डिजिटल क्रांतीमुळे खूप मोठी मदत मिळेल. आपल्या देशामध्ये प्रतिभावान नागरिकांचीही संख्या मोठी आहे. दुसरे म्हणजे भारतात विविधता आहे. गेमिंगमुळे नवे क्षेत्र खुले होत आहे. मी न्यूयॉर्कमध्ये नोबेल पुरस्कार विजेते प्रोफेसर रॉमर यांना भेटलो. विविध विषयांवर आमची चर्चा झाली. यावेळेस त्यांनी डॉक्युमेंट ठेवण्यासाठी सॉफ्टवेअरची गरज असल्याचे बोलून दाखवले. त्यावेळेस मी त्यांना आपल्या देशाच्या डिजि लॉकरसंदर्भात मोबाइलवर सर्व माहिती दाखवली. ते इतके उत्साहित झाले आणि म्हणाले जग ज्या गोष्टींचा विचार करत आहे, त्या डिजिटल युगामध्ये आपण कैकपटीने पुढे आहात.
प्रश्न - तुमच्या विकासकामांच्या उद्दिष्टांमध्ये लोकांना शेतीपासून वळवणे, उत्पादन वाढवणे. पण यासाठी खूप काम करणे आवश्य आहे, असे वाटते. यावर तुमचा विचार काय आहे?
PM नरेंद्र मोदी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक उत्तम गोष्ट सांगायचे, ज्याकडे देशातील राजकारण्यांनी दुर्लक्ष केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की या देशामध्ये औद्योगिक क्रांती होणे अत्यंत आवश्यक आहे. कारण देशातील दलित-आदिवासी समाजाकडे हक्काची जमिनी नाही. त्यामुळे शेतीमध्ये ते काही करू शकत नाहीत. म्हणून औद्योगिक क्रांतीचा भाग होणे खूप महत्त्वाचे आहे. शेतीवरील भार कमी करण्याची गरज आहे. कायदेव्यवस्था हे ओझे कमी करण्याचे काम करत नाही. ओझे कमी करण्यासाठी वैविध्यता आणणे गरजेचे आहे. औद्योगिक जाळे असेल तेव्हाच वैविध्यता निर्माण होते. उदाहरणार्थ तुम्हाला दोन मुले असतील तर एकाने उद्योग क्षेत्रांमध्ये काम करावे आणि दुसऱ्याने शेती सांभाळावी. यामुळे शेती व्यवसायावरील ओझे कमी होईल. शेतीला क्षेत्राला बळकटी देण्यासाठी औद्योगिक विकास होणेही आवश्यक आहे. शेतीला महत्त्व देणाऱ्या उद्योगाचा आपण जितका विस्तार करू तितके फायद्याचे आहे. आपण डिफेन्स मॅन्युफेक्चरिंग क्षेत्रामध्ये वेगाने काम करत आहोत. आज देशात सुमारे 1 लाख कोटी रुपयांचे डिफेन्स प्रोडक्शन सुरू झाले आहे.
प्रश्न - आता जागतिक स्तरावरील गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक दिसत आहे. पण त्यांना वाटतेय की सर्वांगीण निर्णय तुमच्या बाजूने आणि नवीन सरकारकडून येणे महत्त्वाचे असेल जेणेकरून मोठी गुंतवणूक येऊ शकेल आणि याचे प्रमाणही वाढू शकेल.
PM नरेंद्र मोदी - गुंतवणुकीबाबत केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नीतींबाबत एकसूत्रता असणे आवश्यक आहे. समजा भारत सरकारने धोरण आणले आणि जागतिक स्तरावरील काही उद्योग आले. पण भारत सरकारकडे एक इंचही जमीन नाही, तर काय करणार? यासाठी राज्याचे धोरण देखील जुळले पाहिजे. यासाठी मी एक चळवळ सुरू केली होती. ज्याद्वारे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज संस्था यांचे निर्णय गुंतवणुकीच्या गोष्टींसाठी अनुकूल असावेत, असा यामागील माझा हेतू होता. दरम्यान अजूनही काही अडथळे आहेत. मला राज्यांचा पाठिंबा मिळाला तर खात्री आहे की भारताशिवाय जगातील कोणतीही व्यक्ती अन्य कुठेही जाणार नाही.
प्रश्न - वित्तीय तुटीच्या बाबतीत आपण कडक शिस्तीचे आहात. पण नागरिकांना आनंदी जीवन जगता यावे, यावर आपला अधिक भर आहे. त्यामुळे काही गुंतवणूकदारांना भीती वाटते की वित्तीय तुटीचे काय होईल?
PM नरेंद्र मोदी : माझ्या बाबतीत कोणालाही भीती वाटत नाही. आर्थिक व्यवहारांमध्ये शिस्त असावी, यासाठी मी आग्रही आहे. अन्यथा कोणताही देश कार्य करू शकत नाही. निवडणुकीपूर्वी बजेट सादर केले. प्रत्येकाला वाटले की मोठ्या घोषणा करेन आणि निवडणूक जिंकेन. पण बजेट सादर झाल्यानंतर सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. मला विकासकामांमध्ये खर्च करायचा होता. मला देशाला गरिबीतून मुक्त करायचे आहे. दुसरे म्हणजे कर आकारणी कमी करताच महसूल वाढेल, हे माझे निरीक्षण आहे. आयकर भरणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढत आहे. जीएसटी नोंदणीचीही संख्या वाढत आहे. सरकारच्या बाजूने कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वासही आता लोकांना पटला आहे. .
दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे लोक कल्याणाचा मुद्दा. सामाजिक पायाभूत सुविधांमध्ये लोक कल्याण हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि तुम्ही पाहिले असेल की माझ्या प्रत्येक कामामधील कल्याणकारी योजनांद्वारे नागरिकांना चांगले जीवन जगण्याची खात्री मिळते. चांगले जीवन जगण्याची सवय झाल्यास त्यासाठी ते स्वतःदेखील प्रयत्न करतील. कल्याणकारी योजनांमध्ये मी पौष्टिक आहारावर भर देतो. त्यामुळे लोक देखील पौष्टिक आहाराशी जोडले जातात. माझ्या देशाला निरोगी मुलांची गरज आहे, तेच माझ्या देशाला निरोगी भविष्य देऊ शकतात. त्यामुळे अशा गोष्टींवर मी लक्ष देत आहे.
प्रश्न : तरुणांचाही गुंतवणुकीकडे कल वाढत आहे. यावेळेस निवडणुकीच्या निकालाचा अंदाज आधीच व्यक्त होत असल्याने शेअर मार्केटमध्येही तेजी दिसत होती. त्यावर तुम्ही काय भाष्य कराल?
PM नरेंद्र मोदी : जितके सामान्य नागरिक या क्षेत्रात येतील तितकी अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. प्रत्येक नागरिकाच्या मनात जोखीम घेण्याची क्षमता वाढली पाहिजे, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरीकडे ज्या दिवशी निवडणुकीचे निकाल येतील, त्या आठवड्यात तुम्हाला भारताच्या शेअर मार्केटमधील प्रोग्रामिंग करणाऱ्या लोकांचीही दमछाक झाल्याचे दिसेल.
प्रश्न - रोजगार निर्मिती झाली नाही, असा विरोधकांचा आरोप आहे. तो रोजगार निर्मिती झाली नाही की त्याचे स्वरुप बदललेय?
PM नरेंद्र मोदी : पहिली गोष्ट म्हणजे इतके काम मनुष्यबळाशिवाय शक्य नाही. मनुष्यबळाची आवश्यकता भासते तेव्हा रोजगाराच्या संधी निर्माण होतात आणि बेरोजगारीबाबत विरोधकांच्या बोलण्यात कोणताही मुद्दा किंवा सत्यता नाही. घराणेशाही असलेल्या पक्षांना या देशातील तरुणांमध्ये झालेला बदल समजू शकलेला नाही, असे माझे मत आहे. उदाहरणार्थ, 2014 पूर्वी फक्त काही शेकडोंच्या संख्येने स्टार्टअप होते, आज लाखो स्टार्टअप आहेत. एक-एक स्टार्टअप कित्येक हुशार तरुण-तरुणींना नोकऱ्या देत आहेत. आज 100 युनिकॉर्न आहेत. 100 युनिकॉर्न म्हणजे सुमारे 8 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय आणि हे व्यवसाय सांभाळणारे लोक 20-22 वर्षांचे आहेत.
देशात आधी जवळपास 70 विमानतळे होती, ती आता जवळपास 150 आहेत. देशात एकूण 600-700 विमाने आहे. आता जवळपास एक हजार विमानांचे ऑर्डर देण्यात आले आहेत. पीएलएमच्या डेटानुसार बेरोजगारी निम्म्यावर पोहोचली आहे. सहा ते सात वर्षात 6 कोटी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या. तर ईपीएफओच्या डेटानुसार, सात वर्षात 6 कोटींहून अधिक नवीन नोंदणी झाल्या आहेत. SKOCH ग्रुपच्या रिपोर्टनुसार मागील दहा वर्षात दरवर्षी पाच कोटींहून अधिक रोजगार निर्माण झाले आहेत. या सर्व गोष्टीवर कागदावरच नाहीत तर समोर दिसतात देखील
प्रश्न - दक्षिण भारत आणि पूर्व भारतात भाजपला मोठं यश मिळेल, असा तुम्ही दावा केला आहे. मात्र दक्षिण भारत आणि पूर्व भारताबाबत तुम्हाला अतिआत्मविश्वास तर नाही ना?
PM नरेंद्र मोदी - मला आत्मविश्वास असेल तरी मी दाखवत नाही. अतिआत्मविश्वासात तर मी जगत नाही. मी योग्य विचार, हिशेब करून जगणारा माणूस आहे. मी मोठा आणि दूरचा विचार करतो, मात्र पाय जमिनीवर ठेवून सगळे करतो. दक्षिण भारत असो, पूर्व भारत असो, उत्तर भारत असो, पश्चिम भारत असो की मध्य भारत देशाच्या जनमाणसाचे हेच मत आहे की हे काम करणारे सरकार आहे. लोकांना आणि देशाला पुढे घेऊन जाणारे आमचे सरकार आहे. लोकांचे भले करणारे सरकार आमचे आहे. आमच्या समस्यांची या सरकारला समज आहे, अशी भावना जनतेची आहे.
आज देशातील कानाकोपऱ्यात भाजप वेगाने पुढे जात आहे. जम्मू काश्मीरमध्येच पाहा, 40 वर्षांनंतर इतकं जास्त मतदान झालं आहे. लोकांचा सरकारवर विश्वास आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजप ऐतिहासिक विजय मिळणार आहे, असा मला विश्वास आहे.
प्रश्न - विरोधीपक्ष लोकशाही वाचवण्याची गॅरेंटी देत आहे. मात्र विरोधी पक्षांतील मतभेद लपून राहिलेले नाहीत. या विरोधी पक्षांच्या सध्याच्या परिस्थितीवर तुमचं मत काय आहे?
PM नरेंद्र मोदी - एवढा मोठा देश तुम्ही ज्याच्या हातात देणार, त्याला तुम्ही ओळखता का? त्याचं नाव तुम्हाला माहीत आहे का? त्यांचा अनुभव, क्षमता याची तुम्हाला माहिती आहे का? या सर्व गोष्टी देशातील जनता तपासून बघते. तुम्ही नाव जाहीर करा किंवा नका करू, लोकांना सगळं कळतं. यामध्ये आमचं पारडं जड आहे. यात मला काही सांगायची गरज नाही, सगळ्यांना हे माहीत आहे. दुसरा विषय, इंडी आघाडीमध्ये फोटोसेशनशिवाय काय दिसते का. इंडी आघाडीच्या पहिल्या फोटोसेशनमध्ये जेवढे चेहरे दिसत होते, तेवढे आता दिसत आहेत का. इंडी आघाडीतील चेहऱ्यांची संख्या आणि दर्जा देखील कमी झाला आहे. लोक येतात फोटो काढतात आणि निघून जातात. त्यांचा काही कॉमन अजेंडा आहे का. निवडणूक प्रचाराची काही स्टटर्जी आहे का, तर नाही. प्रत्येक जण आपआपली डफली वाजवतोय. त्यामुळे यांच्यावर लोकांचा विश्वास बसू शकत नाही.
काँग्रेसचा सर्वात विश्वासू साथीदार कोण आहे तर तो लेफ्ट आहे. भाजप सत्तेतून जायला पाहिजे ही त्यांची इच्छा आहे. त्यांचाच पराभव करण्यासाठी काँग्रेसने केरळमध्ये निवडणूक लढवली. जी भाषा केरळमध्ये प्रचारात वापरली गेली, तशी कुठेच वापरली गेली नाही. इंडी आघाडीतील जास्तीत जास्त नेते जामीनावर बाहेर आहेत. त्यांच्यावरील खटले त्यांच्याच काळातील आहे. या सर्वांना एकत्र बसवलं तर दिसेल हा याचा मुलगा, हा त्याचा मुलगा. म्हणजे असं दिसून येते की हे आपल्या मुलांचं भविष्य सेट करण्यासाठी इंडी आघाडी पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. देशातील मुलांचं भविष्य तिथे कुठे दिसतच नाही. त्यामुळे मला नाही वाटत, ते देशातील लोकांचा विश्वास जिंकू शकतील.
आमच्या दहा वर्षांच्या सरकारचा मजबूत ट्रॅक रेकॉर्ड आहेच. दहशतवाद, देशाची सुरक्षा, विकास, आतंरराष्ट्रीय नीती, या सर्व विषयांवर देशातील जनता तोलून मापून विचार करतो. त्यामुळे देशातील जनतेने विचार पक्का केला आहे. देशाला पुढे न्यायचं असेल तर भाजप आणि एनडीए एक विश्वासू संघटन आणि नेतृत्व आहे. ज्यांना आपण ओळखतो आणि ज्यांचं आपण काम पाहिले आहे. त्यामुळे लोकांना यामध्ये जास्त जोखीम दिसत नाही, सहज समर्थन दिसत आहे.
(नक्की वाचा- सांगलीत कोण जिंकणार? पैज लावली, अंगलट आली; आता 'ते' दोघे अडकणार)
प्रश्न - विरोधकांचा आरोप आहे की जातीय रंग देत भाजपने राजकारण केलं आहे?
PM नरेंद्र मोदी - विरोधकांनी हेच सांगत त्यांचं राजकारण केलं आहे. कधीकधी आम्हीही विचार करायचो की सांभाळून आता सगळं करूया. पण हे सगळं पाहिलं की कळतं की यांनी संविधानाचा अपमान करण्याशिवाय काही केलं नाही. विरोधक धर्माचं आणि जातीचं राजकारण करत आले आहेत. मला कुणी काहीही म्हणो, मी यांच्या पापांचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही. मी घटनांचा आधार घेऊन सगळं सांगेन. माझ्या कामाची पद्धत 'सबका साथ सबका विकास' अशी आहे. तिथे मी बाकी काही पाहत नाही. कोण कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे, कुणाचा नातेवाईक आहे, कोण लाच देतंय, याकडे लक्ष देत नाही. सर्वांना लाभ मिळावा हा आमचा उद्देश असतो. जेव्हा सर्वांना सगळं काही मिळतं ती खरी धर्मनिरपेक्षता आहे. यामुळे सरकारवरचा देखील विश्वास वाढतो.
विरोधकांनी एससी, एसटी आरक्षणावरही दरोडा टाकला आहे. त्या व्होट बँकेला कसं काही मिळेल, असंच राजकारण विरोधकांचा राहिलं आहे. व्होट जिहादचं ते समर्थन करतात. धर्मनिरपेक्षतेचा मुखवटा घालून हे सगळं जातीचं राजकारण ते करत आहेत. मला त्यांचा हा ढोंगी धर्मनिरपेक्षतेचा बुरखा देशासमोर फाडायचा आहे. सत्तेसाठी हे देशाला तोडू शकतात आणि तुमच्या स्वप्नांना देखील तोडू शकतात.
त्यांचा जाहिरनामा पहिला तर धर्माच्या आधारावर सरकारी कॉन्ट्रॅक्ट देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. एखाद्या पुलाचं काम द्यायचं ठरलं तर त्या क्षेत्राचा अनुभव कुणाकडे आहे, क्षमता कुणाकडे आहे, यंत्रणा कुणाकडे आहे अशा लोकांनी ते बनवलं पाहिजे. मात्र अशी कॉन्ट्रन्ट दिली गेली तर काय होईल आपल्या देशाचं? असा सवाल नरेंद्र मोदींनी उपस्थित केला.
प्रश्न - विरोधकांचा आणखी एक आरोप आहे की भाजपला संविधान बदलण्यासाठी 400 जागा हव्या आहेत?
PM नरेंद्र मोदी - भाजपच्या नेतृत्वातील सरकारकडे 2019 ते 2024 कार्यकाळात 400 जागा आधीच आहेत. एनडीएकडे 360 जागा आहेत. तर एनडीएच्या पलिकडे आम्ही 400 पार आधीपासूनच आहोत. त्यामुळे 400 जागा आणि संविधान बदलणार याचा संबंध जोडणे निव्वळ मुर्खपणा आहे. प्रश्न असा आहे की विरोधक संसद चालूच नये या विचारात आहेत. काँग्रेस पक्षाच्या संविधानाचं काय झालं हे आधी त्यांनी सांगावं. काँग्रेसच्या संविधानाला हे स्वीकारतात का? पुरुषोत्तम दास टंडनजी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले होते. संविधानानुसार ते अध्यक्ष बनले होते. मात्र नेहरुंना ते अध्यक्षपदी नको होते. त्यामुळे त्यांनी ड्रामा करत धमकी दिली की मी कार्यसमितीत राहणार नाही. त्यावेळी एका कुटुंबाला खूश करण्यासाठी संविधानानुसार अध्यक्ष बनलेल्या टंडनजींना राजीनामा द्यावा लागला. सीताराम केसरींसोबतही तेच झालं. त्यानंतर सोनिया गांधी अध्यक्ष बनल्या. त्यामुळे त्यांना संविधानावर बोलण्याचा अधिकार आहे का?
काँग्रेसने कलम 356 चा दुरुपयोग केला. आणीबाणी लादली, त्यावेळी संविधान अक्षरश: कचऱ्यात टाकलं. अशाप्रकारे त्यांनी संविधानाचा अपमान केला. आधी नेहरुजी, नंतर इंदिराजी आणि नंतर पंतप्रधान बनलेल्या राजीवजी हे तर मीडिया नियंत्रणात ठेवण्यासाठी एक कायदा आणत होते. शाहबानोचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल त्यांनी फिरवला आणि संविधानात बदल केला. कारण मतांचं राजकारण त्यांना करायचं होतं. त्यानंतर राहुल गांधी आले. ते तर फक्त खासदार आहेत. त्यांनी तर मंत्रिमंडळाच्या निर्णयाची प्रत पत्रकार परिषदेत फाडली आणि आता हे संविधानाच्या गोष्टी करत आहेत. संविधानाचा अपमान करणारे लोक आज संविधान डोक्यावर घेऊन नाचत आहेत. हे सर्वजण खोटं बोलत आहे.
प्रश्न - शेजारील देशांसोबत चांगले संबंध प्रस्तापित करण्याचं आव्हान आपल्यासमोर आहे?
PM नरेंद्र मोदी - जगात असं कोणतं काम नाही जिथे आव्हाने नाहीत. आमच्या परदेश नितीचा आधार हाच राहिला आहे की शेजारील देशांना प्राधान्य देणे. आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर एक स्थान बनवलं आहे. शेजारील देशांमध्ये स्पर्धाही खूप आहेत. तरीही सर्वांना सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.