LPG Commercial gas cylinder price hike : 2026 च्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. १ जानेवारी २०२६ पासून सरकारने एलपीजी सिलिंडरच्या किमतीमध्ये मोठी वाढ केली आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि हैद्राबाद या प्रमुख शहरांसह देशभरात एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे.
१११ रुपयांची वाढ
व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीमध्ये 111 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. देशातील सर्वात मोठी तेल विपणन कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वेबसाइटनुसार, 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची मुंबईतली किंमत पूर्वी 1531 रुपये 50 पैसे इतकी होती. ती आता वाढून 1642 रुपये 50 पैसे इतकी झाली आहे. दिल्ली, कोलकाता, हैद्राबाद येथेही व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा वापर हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबा आणि अन्य गैर-घरगुती कामांसाठी केला जातो. अशात सिलिंडरच्या किमती वाढल्याने खाण्यासंबंधित व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे. नवीन वर्षात महागाई कमी होण्याची लोकांना अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात महागाई कमी होण्यापेक्षा वाढताना दिसतेय.
घरगुती सिलिंडरच्या किमतीत काहीच बदल नाही
तेल कंपन्यांनुसार, देशातील अन्य मेट्रो शहरांमध्येही व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत इतकीच वाढ झाली आहे. तर १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ८ एप्रिल २०२५ नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
