लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला जाहीर होणार आहे. त्यानंतर भाजपमध्ये राष्ट्रीय पातळीवर मोठे फेरबदल केले जाणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची अध्यक्षपदाची मुदत 7 जूनला संपत आहे. त्यानंतर भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळेल. त्याची चाचपणी आतापासूनच केली जात आहे. दलित चेहरा नवा राष्ट्रीय अध्यक्ष असू शकतो अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जे.पी नड्डा हे भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतर भाजपमध्ये राष्ट्रीय स्तरावर मोठे फेरबदल पाहायला मिळणार आहेत. नवा अध्यक्ष कोण असावा याची चाचपणी भाजपमध्ये सुरू आहे. नवा अध्यक्ष हा दलित समाजातून असावा असाही एक मतप्रवाह आहे. त्याच बरोबर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिह चौहान, वसुंधराराजे शिंदे यांच्या नावाचाही विचार केला जात असल्याची सुत्रांची माहिती आहे.
हेही वाचा - एग्झिट पोल्समध्ये देशाची गॅरेंटी कुणाला? कोणत्या राज्यात किती जागा, पाहा संपूर्ण यादी
केंद्रात ज्या पद्धतीने संघटनात्मक बदल होणार आहेत त्या दृष्टीने महाराष्ट्रातही मोठे फेरबदल अपेक्षित आहेत. एक नवी टिम महाराष्ट्रात उभारण्याचा भाजपचा विचार आहे. सध्या प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बानवकुळे हे पदावर आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी अन्य कोणाला आणणार की त्यांनाच कायम ठेवले जाणार याबाबतही उत्सुकता आहे. दरम्यान राज्यातले विनोद तावडे यांच्याकडे सध्या केंद्रात सरचिटणिस पदाची जबाबदारी आहे. ही जबाबदारी त्यांच्याकडे कायम राहाणार ही अन्य कोणती जबाबदारी त्यांच्याकडे देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.