Delhi Crime News : दिल्लीत एका क्षुल्लक वादातून एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी रात्री गाझीपूर येथील पेपर मार्केट परिसरात हा प्रकार घडला. ज्यात वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या विकास नावाच्या तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे. तर त्याचा मित्र सुमित गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विकास आणि त्याचा मित्र सुमित हे गाझीपूर येथील पेपर मार्केट परिसरातील एका दारूच्या दुकानाजवळ गाडीत बसले होते. त्यावेळी अचानक एक दुचाकीस्वार त्यांच्या गाडीला घासून गेला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमितने पोलिसांना सांगितले की, विकासने त्या दुचाकीस्वाराला जाब विचारला असता, त्यांच्यात जोरदार वाद सुरू झाला. या शाब्दिक बाचाबाचीने नंतर हिंसक वळण घेतले.
(नक्की वाचा- प्रेयसी बोलत नसल्याच्या नैराश्यातून तरुणाचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न; संगमेश्वरमधील घटना)
मित्रांना बोलावले आणि जीवघेणा हल्ला
वाद वाढत असताना, दुचाकीस्वाराने फोन करून आपल्या मित्रांना घटनास्थळी बोलावले. काही क्षणातच त्याचे किमान सहा मित्र तिथे पोहोचले. या सर्वांनी मिळून विकास आणि सुमितला रॉडने बेदम मारहाण केली. आरोपींनी त्यांना वारंवार चाकूने भोसकले, ज्यामुळे विकासचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
जखमी मित्राची प्रकृती चिंताजनक
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुमितला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
(नक्की वाचा- ठाण्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना वाद पेटला; एका बॅनरवरून दोन्ही गट आमने-सामने)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विकास हा फरिदाबादचा रहिवासी असून, त्याचे लवकरच लग्न होणार होते. विकास आणि सुमित हे दोघे नोएडा येथील एका खासगी विमा कंपनीत काम करत होते. विकास नोएडामध्ये पेईंग गेस्ट म्हणून राहत होता.