Odisha New Chief Minster : मोहन चरण माझी ओडिशाचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. माझी हे क्योंनझार मतदारसंघातून निवडून आले आहेत. चौथ्यांदा आमदार झालेले माझी ओडिशातील भाजपाचे आदिवासी नेते आहेत. ओडिशामध्ये भाजपाचं पहिल्यांदाच सरकार आलं आहे. गेली 24 वर्ष राज्यात बिजू जनता दलाचं सरकार होतं.
ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत असलेल्या धर्मेंद्र प्रधान आणि जुएल ओराम या दोन बड्या नेत्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर माझी यांची निवड करण्यात आली आहे. चौथ्यांदा आमदार झालेले 52 वर्षांचे माझी मुख्यमंत्रीपदाचे सर्वात तरुण दावेदार होते. केव्ही सिंह देव आणि पार्वती परिदा या दोन जणांची उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे.
ओडिशा विधानसभेतील 147 पैकी 78 जागा जिंकून भाजपानं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. बिजू जनता दलाला 51 जागांवर विजय मिळवला आहे. तर तिसऱ्या क्रमांकावरच्या काँग्रेस पक्षाला 14 जागा मिळाल्या आहेत. तीन ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आले असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीला 1 जागा मिळाली आहे.
( नक्की वाचा : केंद्र सरकारमधील कॅबिनेट, स्वतंत्र प्रभार आणि राज्यमंत्रींमध्ये काय असतो फरक? वाचा संपूर्ण माहिती )
नवे मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रीमंडळ बुधवारी भुवनेश्वरमधील जनता मैदानात शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या शपथविधी कार्यक्रमासाठी जनता मैदानात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.