संजय तिवारी, प्रतिनिधी
नुकताच केंद्रीय लोकसेवा परीक्षा 2024 चा निकाल जाहीर झाला आहे. युपीएससी क्रॅक करणं अनेकांचं स्वप्न असतं. त्यासाठी वर्षानुवर्षे मुलं दिवस-रात्र मेहनत करीत असतात. त्यामुळे युपीएससीमध्ये उत्तीर्ण होणं हा क्षण आयुष्यातील सर्वात मौल्यवान क्षणांपैकी एक असतो. या परीक्षेत यशस्वी झालेली यवतमाळ जिल्ह्यातील मोहिनी खंदारे हिच्यासाठी हे यश आयष्यभराचं दु:ख घेऊन आलं आहे. युपीएससीचा निकाल लागल्यानंतर मोहिनी प्रल्हाद खंदारे हिच्या वडिलांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. त्यामुळे मोहिनीच्या यशामुळे आनंदात असलेल्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
युपीएससीमध्ये मोहिनीची 844 रँक
युपीएससी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये मोहिनी प्रल्हाद खंदारे हिने 844 रँक घेऊन यश संपादन केलं आहे. मुलीने प्रशासकीय अधिकारी पदाला गवसणी घातली. त्यामुळे मोहिनीचं संपूर्ण कुटुंब आनंदात होतं. अशातच रविवारी 26 एप्रिल रोजी मोहिनीचे वडील प्रल्हाद खंदारे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. एकीकडे घरात आनंदाचं वातावरण असतानाच दुसरीकडे मुलीच्या वडिलांचं निधन झाल्याने खंदारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नक्की वाचा - Jalgaon Crime : तृप्ती 4 महिन्यांची गर्भवती, बापाने लग्नातच गोळ्या झाडल्या, ऑनर किलींगची भयंकर स्टोरी
महागाव तालुक्यातील वाकद येथील प्रल्हाद खंदारे हे शिक्षकी पेशात होते. ते शिक्षण विभागात शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून सेवानिवृत झाले. ते मुलांच्या शिक्षणासाठी कायम प्रयत्नशील होते. त्यांचा मोठा मुलगा विक्रांत खंदारे जिल्हा न्यायाधीश आणि सून न्यायाधीश आहेत. आता तर त्यांची मुलगी मोहिनी हिने देखील अधिकारी पदाला गवसणी घातली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या युपीएससीच्या परीक्षेच्या निकालात ती 844 वी रँक मिळवून यशस्वी झाली आहे. मुलीच्या उत्तुंग यशाचा वडिलांना अभिमान वाटत होता. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांच्या परिश्रमाचं चीज झालं होतं. त्यांची लेक आता अधिकारी झाली होती. वडिलांनी परिसरात मुलीच्या स्वागताचे बॅनर लावले. इष्ट मित्रांमध्ये पेढे वाटले. रविवारी सकाळी प्रल्हाद खंदारे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि यातच त्यांचे निधन झाले. त्यामुळे महागांव, पुसद, उमरखेड तालुक्यामध्ये शोककळा पसरली आहे. प्रल्हाद खंदारे यांनी घडविलेले विद्यार्थी आणि त्यांच्या नातेवाईकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.