
मंगेश जोशी, प्रतिनिधी
Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात शनिवारी रात्री सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती झाल्याची घटना घडली असून एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याने प्रेम विवाहाच्या रागातून आपल्या मुलीसह जावयावर गोळीबार केला. जावयाच्या बहिणीच्या लग्नानिमित्त आयोजित हळदीच्या कार्यक्रमात निवृत्त पोलीस अधिकारी किरण मांगले याने आपली मुलगी तृप्ती वाघ आणि जावई अविनाश वाघ या दोघांवर गोळीबार केला. या घटनेत मुलगी तृप्ती वाघ हिचा जागीच मृत्यू झाला असून जावई अविनाश वाघ गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर जमावाने गोळीबार करणाऱ्या निवृत्त सीआरपीएफ अधिकाऱ्याला चांगलाच चोप दिल्याने तोही गंभीर जखमी झाला आहे. हृदयद्रावक म्हणजे वडिलांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेली तृप्ती ही चार महिन्यांची गर्भवती होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चोपडा शहरात नेमकं काय घडलं?
धुळे जिल्ह्यातील शिरपूरमध्ये राहणारी तृप्ती मांगले ही वैद्यकीय शिक्षणानिमित्त पुण्यात असताना तिथल्याच आपल्याच नातेवाईकांमधील अविनाश वाघ याच्याशी तिचे प्रेमसंबंध जुळले. या प्रेमसंबंधातून तृप्तीने अविनाशसोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाला तृप्तीचे वडील किरण मांगले यांचा विरोध होता. मात्र हा विरोध झुगारून तृप्तीने एक वर्षांपूर्वी अविनाशशी लग्न केले. पुण्यातील कोथरूड परिसरात राहणारा अविनाश वाघ आणि तृप्ती या दोघांचा संसार आनंदात सुरू होता. अविनाश वाघ याच्या बहिणीचा चोपडा शहरातील आंबेडकरनगरमध्ये विवाह सोहळा होता आणि या विवाह सोहळ्यासाठी अविनाश व तृप्ती हे दोघेही पुण्यावरून चोपडा येथे आले होते.
तृप्ती व अविनाश हे दोघेही चोपडा येथे आल्याची माहिती तृप्तीचे वडील किरण मांगले यांना मिळाली. चोपडा येथील आंबेडकरनगर परिसरात अविनाशच्या बहिणीचा हळदीचा समारंभ सुरू होता. या समारंभात अविनाश व तृप्ती हे दोघेही जल्लोष साजरा करत असताना किरण मांगले यांनी येऊन थेट आपल्या मुलीवर गोळीबार केला. त्यानंतर जावई अविनाश यावर देखील गोळीबार करून हल्ला चढवला. मुलीला अगदी जवळून गोळी लागल्याने तृप्ती वाघ ही जागीच ठार झाली. तर जावई अविनाश वाघ हा गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर जमावाने सेवानिवृत्त सीआरपीएफ अधिकारी किरण मांगले यास पकडून चोप देत गंभीर जखमी केले.
नक्की वाचा - Sangli News : मुख्याध्यापक निघाला नराधम, आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत घृणास्पद कृत्य
तृप्ती व अविनाश हे जवळचे नातेवाईक मात्र दोन्ही कुटुंबात वैर होते. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी तृप्तीने पुण्यातील डी.वाय.पाटील कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि त्यानंतर अविनाश-तृप्ती यांच्यात संपर्क वाढला आणि त्यातूनच दोघे प्रेमाच्या बंधनात अडकले.
कुटुंबाचा वाद असला तरी अविनाश हा नात्यातीलच असल्याने आपले वडील आपल्या विवाहाला मान्यता देतील असा तृप्तीचा विश्वास होता आणि याबाबत तिने आपल्या वडिलांना सांगितले. मात्र अविनाश याच्या कुटुंबाशी असलेलं वैर तसेच तृप्तीच्या तुलनेत अविनाशच कमी असलेले शिक्षण यामुळे तृप्तीचे वडील किरण मांगले यांनी या विवाहाला कडाडून विरोध केला. मात्र वडिलांचा विरोध झुगारून एक वर्षांपूर्वी तृप्तीने अविनाशसोबत पळून जात पुण्यात विवाह केला. हाच राग गेल्या वर्षभरापासून किरण मांगले याच्या डोक्यात होता. त्यामुळे मुलीला आणि जावयाला संपवण्याचा डाव किरण मांगले यांनी आखला होता. मात्र तो वाट पाहत होता ती योग्य संधीची.
नक्की वाचा - Naxal : नक्षलवाद्यांची गुहा सापडली...मोठं मैदान, खुणाही सापडल्या; छत्तीसगडमधील सर्वात मोठ्या ऑपरेशनला मोठं यश
अविनाशच्या बहिणीचं लग्न चोपडा येथे असल्याची माहिती किरण मांगले यास मिळाली आणि ही संधी साधत किरण मांगले हा धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथून चोपडा येथे आला. शनिवारी हळदीचा कार्यक्रम सुरू असताना त्याच ठिकाणी किरण मांगले यांनी आपल्या मुलीवर-जावयावर बेछूट गोळीबार केला. किरण मांगले हा सीआरपीएफमधील माजी पोलीस अधिकारी असल्याने त्याच्याकडे सर्विस रिव्हॉल्हर होती. यानेच त्याने आपल्या मुलीचा जीव घेतला. हृदयद्रावक म्हणजे मृत तृप्ती चार महिन्यांची गर्भवती होती, अशी माहिती तिची सासू प्रियंका वाघ यांनी दिली. एवढेच नव्हे तर, मागे एकदा किरण मांगले यांनी आपल्या मुलीचा जबरदस्ती गर्भपात केल्याचा आरोप देखील तृप्तीच्या सासूने केला आहे. दरम्यान तृप्ती चार महिन्यांची गर्भवती असल्यामुळे या हल्ल्यात एक नव्हे तर दोन जीव गेले आहेत.
2022 मध्ये चोपडा शहरात प्रेमविवाहाच्या रागातून अल्पवयीन भावाने आपल्या बहिणीचा गळा दाबून तर तिच्या पतीची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्या घटनेनंतर प्रेमविवाहाच्या रागातून सख्ख्या बापाने पोटच्या मुलीची गोळ्या झाडून हत्या केल्याने चोपडा शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये सेवानिवृत्त पोलीस अधिकारी किरण मांगले याच्या विरुद्ध मुलीची हत्या, जावयाची हत्या करण्याचा प्रयत्न, तसेच गोळीबार केल्याचा गुन्हा हा दाखल करण्यात आला असून या घटनेची पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world