राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आज जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 16 उमेदवारांची घोषणा केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि जम्मू आणि काश्मीरचे प्रभारी ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी आज ही यादी जाहीर केली.
पक्षाच्या संसदीय मंडळाने काश्मीर खोऱ्यातील 3 प्रमुख जिल्ह्यांमध्ये निवडणूक लढवण्यासाठी 16 उमेदवारांच्या नावांना मान्यता दिली आहे. हे सर्व उमेदवार घड्याळ या निवडणूक चिन्हावर पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये कोणतीही आघाडी न करता निवडणूक लढवत आहे.
जम्मू-काश्मीर विधानसभेच्या 90 जागांवर तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. या अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात 25 सप्टेंबरला एकूण 26 विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांनी तुमच्या हातात संधी असून जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी मतदान करावे. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये मजबूत सरकार स्थापन करण्यासाठी सहकार्य करुन काश्मीरच्या मतदारांनी मतदानात उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.