जाहिरात

NEET paper leak: "100 टक्के ओरिजनल पेपर"; टेलिग्रामवर सुरुय नीट पेपरचा उघड लिलाव, धक्कादायक वास्तव उघड

NEET 2026 paper leak : "100 टक्के ओरिजनल पेपर" टेलिग्राम ग्रुप्सवर सध्या हाच एक मेसेज वणव्यासारखा पसरतोय.

NEET paper leak: "100 टक्के ओरिजनल पेपर"; टेलिग्रामवर सुरुय नीट पेपरचा उघड लिलाव, धक्कादायक वास्तव उघड
NEET 2026 paper leak : टेलिग्राम ग्रुप्सवर सध्या एक मेसेज वणव्यासारखा पसरतोय. (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:

NEET 2026 paper leak : "100 टक्के ओरिजनल पेपर"

टेलिग्राम ग्रुप्सवर सध्या हाच एक मेसेज वणव्यासारखा पसरतोय. 'कन्फर्म सेट' आणि 'थेट प्रवेश' मिळवून देण्याचे दावे करणाऱ्या जाहिरातींच्या महापुरात हा मेसेज प्रामुख्याने हायलाईट केला जात आहे. नीट परीक्षेच्या काही दिवस आधीच पेपर देण्याचे प्रलोभन यातून दिले जात आहे. विशेष म्हणजे, यासाठी केवळ मजकूरच नाही तर अधिकृत वाटतील अशा 'व्हॉईस नोट्स'चाही वापर केला जातोय. "हा पेपर एकदम ओरिजनल आहे," असे सांगून पेपर खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांवर आणि पालकांवर दबाव टाकला जात आहे.

सीबीआयचा देशभरात तपास आणि मोठी कारवाई

नीट 2026 मधील या पेपरफुटीच्या प्रकरणाने देशातील सर्वात मोठ्या परीक्षा घोटाळ्याचे रूप धारण केले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने हा तपास सीबीआयकडे सोपवला. त्यानंतर सीबीआयने देशभरात एकाच वेळी अनेक राज्यांत छापेमारी करत अटकसत्र सुरू केले आहे. यामध्ये कोचिंग क्लास चालक, मध्यस्थ आणि परीक्षा प्रक्रियेतील काही संशयित लोकांचा समावेश आहे. पुण्यातील केमिस्ट्री विषयाचे प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांना या कटातील एक मुख्य दुवा मानले जात असून, नॅशनल टेस्टिंग एजन्सीमधून (NTA) त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

( नक्की वाचा : NEET Paper Leak: बापानं लाखो खर्चून पेपर चोरला, पण पोरगा अभ्यासात ढ! नीट परीक्षेतील सर्वात मोठी 'कॉमेडी' उघड )


विश्वासार्हतेचा बनावट खेळ

विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यासाठी या ग्रुप्सवर पेमेंटचे बनावट स्क्रीनशॉट्स, युपीआय कन्फर्मेशन आणि अर्धवट चॅट्सचे फोटो वारंवार शेअर केले जातात. हा व्यवहार किती सुरक्षित आणि खरा आहे, हे भासवण्यासाठी हे सर्व केले जाते. मात्र, या चढाओढीत एका ग्रुपकडून दुसऱ्या ग्रुपला 'बनावट' ठरवण्याचेही काम सुरू आहे. "आमचाच सोर्स खरा आहे, बाकी सर्व फसवणूक करत आहेत," अशा मेसेजेसमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Latest and Breaking News on NDTV

एनटीएने हे दावे फेटाळून लावले असले, तरी अशा नेटवर्कचे अस्तित्व नाकारता येत नाही. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, हे गुन्हेगार व्हीपीएन (VPN) तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याने त्यांना शोधणे अत्यंत अवघड काम आहे. टेलिग्रामसारखी प्लॅटफॉर्म्स एनक्रिप्टेड असल्याने गुन्हेगारांची खरी ओळख पटवण्यासाठी तपास यंत्रणांना या कंपन्यांच्या प्रतिसादावर अवलंबून राहावे लागत आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या दबावाचा फायदा घेऊन हे जाळे काम करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

( नक्की वाचा : NEET Paper Leak : परीक्षेआधीच वाटला पेपर; लातूरचा प्राध्यापक PV कुलकर्णीने असा रचला होता पेपरफुटीचा प्लॅन )

विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा परीक्षेची भीती

या सर्व गोंधळात प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मात्र मोठे नुकसान होत आहे. दिल्लीतील एका कोचिंग सेंटरमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने सांगितले की, "पहिली परीक्षा सोपी गेली होती, पण आता पुन्हा परीक्षा झाली तर ती कठीण असू शकते. आमची कोणतीही चूक नसताना ही एक प्रकारची सामूहिक शिक्षाच आहे." दरवर्षी अशा अफवा येत असल्याने यंत्रणांनी सोशल मीडियावरील या हालचालींवर कायमस्वरूपी कडक नजर ठेवावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com