NEET Failure Success : दरवर्षी लाखो विद्यार्थी डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहतात. यासाठी NEET ची परीक्षा दिली जाते. काही विद्यार्थ्यांचं स्वप्नं पूर्ण होतं तर काहींचा अपेक्षेनुसार निकाल लागत नाही. अशा वेळी काही विद्यार्थी निराश होतात. अनेक विद्यार्थी तर यातून टोकाचं पाऊल उचलतात. मात्र कर्नाटकच्या ऋतूपर्णाच्या कहाणीने या सर्वाला मात दिली आहे. जर तुम्ही पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं नाही तरी जीवन थांबत नाही. MBBS साठी जागा न मिळाल्यानंतर तिने माघार घेतली नाही. तिने नवं काहीतरी शिकण्याचा निर्णय घेतला आणि आज वयाच्या केवळ २० व्या वर्षी रोल्स-रॉयस सारख्या कंपनीत काम करते. तिचं वार्षिक पॅकेज ७२.३ लाख रुपयांपर्यंत पोहोचलं आहे.
डॉक्टर होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं...
ऋतूपर्णाने लहानपणापासून डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. तिने NEET ची तयारीही केली होती. मात्र तिला सरकारी MBBS ची जागा मिळाली नाही. यामुळे तिला मोठा धक्का बसला. मात्र तरीही तिने हार मानली नाही. तिने विचार केला की, जर डॉक्टर होऊ शकले नाही तर कोणत्या दुसऱ्या कामाच नाव मोठं करेन.
रोबोट होण्याचं घेतलं शिक्षण..
एमबीबीएसची जागा न मिळाल्याने ऋतूपर्णाने मेकट्रॉनिक्स, रोबोटिक्स आणि ऑटोमेशनचं शिक्षण घेतलं. अभ्यास करीत असताना नव्या गोष्टी शिकण्यावरही भर दिला. महाविद्यालयात असताना तिने सुपारीचं उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक खास रोबोट तयार केला. यातून तिची मेहनत आणि शिकण्याची आवड स्पष्टपणे दिसून येत होती. ऋतूपर्णा अभ्यासादरम्यान अनेक रोबोटिक्स स्पर्धेत सहभागी झाली. यामध्ये तिला चांगलं यश मिळालं. यादरम्यान तिने अनेक प्रकल्पातही काम केलं. हाच अनुभव तिला पुढे फायद्याचा ठरला. हळूहळू तिचा आत्मविश्वास वाढला.
इंटर्नशिपने बदललं आयुष्य...
महाविद्यालयादरम्यान ऋतूपर्णा रोल्स-रॉयसमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. अभ्यास आणि काम एकत्रित सांभाळणं सोपं नव्हतं. मात्र तिने चांगली मेहनत घेतली. कंपनीलाही तिचं काम आवडलं आणि तिला सुरुवातीला ३९.६ लाख रुपयांच्या नोकरीची ऑफर दिली. यानंतर तिची मेहनत पाहून रक्कम वाढवून ७२.३ लाखांपर्यंत केली. डिसेंबर २०२४ पासून ऋतूपर्णा रोल्स-रॉयसमध्ये रोबोटिक्स सॉफ्टवेयर इंजिनियर म्हणून काम करतात.