उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. सासूच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या जावयावर घाघरा नदीत मगरीने प्राणघातक हल्ला केला. अंत्यसंस्काराचे विधी संपवून नदीच्या पाण्यात हात-पाय धुण्यासाठी गेलेल्या या तरुणाच्या डोक्यालाच मगरीने थेट आपल्या जबड्यात पकडले आणि नदीच्या खोल पाण्यात ओढून नेले. या दुर्दैवी घटनेत तरुणाचा मृत्यू झाला असून परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
अंत्यसंस्काराच्या वेळीच काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडा येथे राहणारे 27 वर्षीय दीपक शर्मा हे आपली पत्नी आणि मुलीसह उत्तर प्रदेशातील गोंडा येथे आपल्या सासरच्या गावी आले होते. त्यांच्या सासू उर्मिला देवी यांचे मंगळवारी कॅन्सरमुळे निधन झाले होते. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सर्व कुटुंबीय सोनौली गावातील घाघरा नदीच्या तटावर गेले होते.
(नक्की वाचा- LPG Cylinder: घरातील सिलेंडर 25 दिवसांच्या आत संपला तर काय कराल? 3 पर्याय ठरतील फायदेशीर)
सासूच्या पार्थिवाला मुखाग्नी दिल्यानंतर आणि अंत्यसंस्काराचे विधी आटोपल्यानंतर दीपक नदीच्या काठावर हात-पाय धुण्यासाठी गेले. ते पाण्यात हात घालण्यासाठी खाली झुकले इतक्यात अचानक नदीतून एका मोठ्या मगरीने काही समजण्याच्या आतच थेट दीपक यांचे डोके आपल्या जबड्यात घट्ट पकडले आणि त्यांना वेगाने नदीच्या आत खेचून नेले.
नातेवाईकांसमोरच घडला थरार
हा भयानक प्रकार तिथे उपस्थित असलेल्या पत्नी, मुलगी आणि इतर नातेवाईकांच्या डोळ्यांदेखत घडला. नदीकाठी एकच आरडा-ओरड आणि गोंधळ उडाला, परंतु पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे आणि मगरीच्या दहशतीमुळे कोणीही काही करू शकले नाही. या घटनेची माहिती तात्काळ स्थानिक उमरीबेगमगंज पोलीस ठाण्याला आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला देण्यात आली.
(नक्की वाचा- Beed News: लेकरं बसमध्ये अन् आई प्रियकरासोबत फरार; खिशात ठेवली चिठ्ठी, तर आजोबांचा प्रश्न ऐकून पोलीस चक्रावले)
SDRF ने शोधला मृतदेह
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गोताखोर आणि एसडीआरएफ (SDRF) च्या पथकाने नदी पात्रात युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू केली. अखेर 21 मे रोजी (गुरुवारी) दीपक यांचा मृतदेह शोधून काढण्यात यश आले. या घटनेमुळे शोककुळ असलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.