जाहिरात

Operation Numkhor: 'ऑपरेशन नुमखोर'चा धडाका! 15000हून अधिक लक्झरी कार रडारवर; अनेक सेलिब्रिटींचंही कनेक्शन समोर

Operation Numkhor: 'कस्टम विभागाने 'ऑपरेशन नुमखोर' अंतर्गत एका मोठ्या वाहन तस्करीचा पर्दाफाश केला आहे. भूतानच्या मार्गे सुमारे 15,849 आलिशान गाड्या कोणत्याही कर आणि ड्युटीविना भारतात आणून बेकायदेशीरपणे नोंदणीकृत केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Operation Numkhor: 'ऑपरेशन नुमखोर'चा धडाका! 15000हून अधिक लक्झरी कार रडारवर; अनेक सेलिब्रिटींचंही कनेक्शन समोर

कस्टम विभागाने आंतरराष्ट्रीय वाहन तस्करी करणाऱ्या टोळीचा मोठा पर्दाफाश केला आहे. 'ऑपरेशन नुमखोर' (Operation Numkhor) या मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या तपासात तब्बल 15,849 गाड्या बेकायदेशीरपणे भूतानच्या सीमेवरून भारतात आणल्याचे उघड झाले आहे. या तस्करीमुळे सरकारचे शेकडो कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, यामध्ये अनेक सेलिब्रिटींची नावेही संशयाच्या भोवऱ्यात आली आहेत.

'ऑपरेशन नुमखोर' म्हणजे काय?

'नुमखोर' हा भूतानी शब्द असून त्याचा अर्थ 'वाहन' असा होतो. कस्टम विभागाने केरळमधून 35-40 आलिशान गाड्यांच्या तपासापासून ही मोहीम सुरू केली होती, जी आता हजारो गाड्यांपर्यंत पोहोचली आहे.

(नक्की वाचा-  Aurangpura Renamed: छत्रपती संभाजीनगरमधील औरंगपुराचं नाव बदललं; महापालिकेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर)

तस्करांनी सरकारी यंत्रणेला फसवण्यासाठी अत्यंत चाणाक्ष पद्धतींचा वापर केला. अनेक महागड्या गाड्या लष्कराने विकलेल्या जुन्या गाड्या असल्याचे भासवून बनावट 'डिस्पोजल सर्टिफिकेट' सादर करण्यात आले. 'नॅशनल व्हीकल रजिस्ट्री'च्या डिजिटल ऑडिटमध्ये या गाड्यांच्या नोंदी संशयास्पद आढळल्या आणि तस्करीचे बिंग फुटले. परदेशी दूतावास आणि मंत्रालयांची बनावट कागदपत्रे वापरून भरमसाठ कस्टम ड्युटी वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सेलिब्रिटी आणि राज्यांचे कनेक्शन

केरळ आणि दक्षिण भारतातील अनेक मोठ्या चित्रपट कलाकारांनी नियमांना बगल देऊन या आलिशान गाड्या खरेदी केल्याचे समोर आले आहे. अद्याप त्यांची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत. एकट्या आसाममध्ये 464 अशा गाड्यांची नोंदणी झाली आहे, तर केरळमधून 50 हून अधिक गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

(नक्की वाचा-  Pune News: लग्नासाठी बनला 'पोलीस', फ्लेक्स लावत केली चमकोगिरी अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला)

भारत-भूतान सीमा शुल्क बैठक

या तस्करीला आळा घालण्यासाठी केरळमधील मुन्नार येथे भारत आणि भूतानच्या सीमा शुल्क अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक सुरू आहे. यामध्ये सीमेवरील सुरक्षा कडक करणे आणि तांत्रिक माहितीची देवाणघेवाण करण्यावर चर्चा केली जात आहे. जेणेकरून भविष्यात अशा प्रकारे कर चोरी आणि तस्करी रोखता येईल.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com