जाहिरात

Pune News: लग्नासाठी बनला 'पोलीस', फ्लेक्स लावत केली चमकोगिरी अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Pune Fake Police Case: पुण्यात लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने एका तरुणाने चक्क बनावट पोलीस अधिकारी बनण्याचे धाडस केले. त्याने चक्क फ्लेक्स लावून शहरभर गाजावाजा केला.

Pune News: लग्नासाठी बनला 'पोलीस', फ्लेक्स लावत केली चमकोगिरी अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला

यशपाल सोनकांबळे, पुणे

पुणे शहरात एक अतिशय विचित्र घटना समोर आली आहे. लग्नासाठी चांगली मुलगी मिळावी आणि समाजात वजन वाढावे, यासाठी एका 26 वर्षीय तरुणाने चक्क पोलीस अधिकारी असल्याचे खोटे नाटक रचले. ऋषिकेश राजू जाधव  असे या तरुणाचे नाव असून, त्याच्या या पराक्रमाची सध्या संपूर्ण पुण्यात चर्चा रंगली आहे.

लग्नासाठी 'इम्प्रेशन' मारण्याचा प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेशचे लग्न जमत नव्हते. मुलींच्या घरी प्रभाव पाडण्यासाठी आणि आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी त्याने आपली पुणे शहर पोलीस दलात निवड झाल्याचे खोटे सांगितले. इतकेच नाही तर, त्याने पोलीस वर्दीतील फोटो काढून ते आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर ठेवले आणि "मी पोलीस झालो" असा प्रचार सुरू केला.

नक्की वाचा-  Aurangpura Renamed: छत्रपती संभाजीनगरमधील औरंगपुराचं नाव बदललं; महापालिकेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर)

फ्लेक्स लावले अन् अडकला

ऋषिकेशचा उत्साह एवढ्यावरच थांबला नाही. त्याने स्वतःच्या अभिनंदनाचे मोठे फ्लेक्स नऱ्हे परिसरात लावले. या फ्लेक्सवर तो पोलीस वर्दीत रुबाबदार दिसत होता. मात्र, परिसरातील खऱ्या पोलिसांच्या नजरेत हे फ्लेक्स पडले आणि त्यांना संशय आला. जेव्हा पोलिसांनी अधिकृतपणे या नावाच्या उमेदवाराची चौकशी केली, तेव्हा पुणे पोलीस दलात या नावाची कोणतीही व्यक्ती भरती झाली नसल्याचे उघड झाले.

पोलिसांकडून गुन्हा दाखल

हा सर्व प्रकार केवळ मुलींवर प्रभाव पाडण्यासाठी आणि लग्नाची 'लाईन' लावण्यासाठी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. नऱ्हे पोलीस ठाण्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेत ऋषिकेश जाधव विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 204 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

(नक्की वाचा-  Bhendwal Bhakit: राज्यात पाऊस कसा असेल? राजकीय उलथापालथ होणार? भेंडवळच्या भाकितानं चिंता वाढली)

सोशल मीडियावर चर्चेचा विषय

सोशल मीडियावर देखील या  घटनेची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली. "लग्नासाठी काहीही" म्हणणाऱ्या या तरुणाचा हा फसला गेलेला प्लॅन आता इतरांसाठी एक धडा ठरला आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com