देशात शनिदेवाची अनेक मंदिरं आहेत. मात्र मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये शनिदेवाचं एक अनोखं मंदिर आहे. येथे भाविक संकल्प फॉर्म भरून देवाच्या चरणी अर्पण करतात आणि शनिदेवाला आपल्या व्यवसायात भागीदारी करतात. देवाला भागीदार बनवल्याने व्यवसायात वृद्धी होते असं मानलं जातं. आतापर्यंत 1500 हून अधिक भाविकांनी शनिदेवाला आपला व्यावसायिक भागीदार म्हणून घेतलं आहे.
हे मंदिर खरगोन जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 70 किमी अंतरावर आहे. येथील सनवादजवळ मोरघाडी येथे श्री सिद्ध शनी गजानन शक्तीपीठ नावाचे मंदिर अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. मंदिर सुमारे 21वर्षे जुने आहे. येथे देवाची मूर्ती नाही. शनी शिंगणापूरच्या धर्तीवर मोकळ्या आकाशाखाली शीलाच्या रूपात शनिदेव विराजमान आहेत.
शनिदेवाला मिळतो नफ्याचा भाग
अनेकांनी शनिदेवाला आपल्या व्यवसायात भागीदार केलं आहे. त्यामुळे या प्रदेशात त्यांना 'भागीदार शनिदेव' ही म्हटलं जातं. लोक वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा घेऊन देवाच्या दारात येतात आणि व्यवसायातील नफ्याचा काही भाग देवाला अर्पण केला जातो, असं मंदिराचे पुजारी पंडित संदीप बर्वे यांनी सांगितले.
पार्टनरशिपसाठी संकल्प पत्र भरा
मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, महाराष्ट्र यासह अनेक राज्यांतील भाविकांची येथे गर्दी असते. व्यवसायातील प्रगतीसाठी ते शनिदेवाला आपल्या व्यवसायात पार्टनरशिप बनवतात. आतापर्यंत 1500 ते 1600 भाविकांनी शनिदेवाला आपला पार्टनर बनवला आहे. यासाठी एक संकल्प फॉर्म रीतसर भरला जातो. ज्यामध्ये देवाला सहभागी करून घेतले जाते. आजपासून हा व्यवसाय देव तुमच्याकडे सोपवत असल्याचं संकल्प पत्रात लिहिलेलं आहे. या व्यवसायात तुम्ही आणि मी भागीदार राहू असाही या फॉर्ममध्ये उल्लेख आहे.
कोर्टाच्या प्रकरणांमधून मिळेल दिलासा...
भगवान शनिदेवाला नाडी तंत्र आणि न्यायाची देवता देखील मानले जाते. त्यामुळे न्यायालयांशी संबंधित वादग्रस्त प्रकरणांतून दिलासा मिळावा म्हणून लोक येथे येतात. याशिवाय, आरोग्याच्या अडचणींवर तोडग्यासाठी लोक मोठ्या संख्येने देवाकडे येतात. येथे पूजा आणि दान केल्याने सर्व वादात यश मिळते. व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळतो, अशी मान्यता आहे. News18 हिंदींने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.