
Pahalgam Kashmir Terrorist Attack: प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असते, असं म्हणतात. जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर प्रेम करण्याचा प्रश्नच येत नाही. देशाच्या अखंडता आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी पाकिस्तानशी युद्ध करण्याची वेळ आली तर त्यासाठी भारतीय लष्कर सज्ज आहे. पहलगाममध्ये मारले गेलेल्या 26 जणांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना शासन करण्यासाठी भारत सरकार आणि सैन्य सर्व प्रकारचे उपाय करत आहे. पाकिस्तानवर वार करण्यासाठी 'चाणक्य नीती' चा वापर भारताकडून करण्यात येत आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची नाकेबंदी करण्यासाठी भारतानं कोणते उपाय केले आहेत ते पाहूया...
पाकिस्तानचे हवा पाणी बंद
भारतानं पाकिस्तानसाठी आपले हवाईक्षेत्र पूर्णपणे बंद केले आहे. त्यामुळे पाकिस्तानचे विमानं भारतावरुन जाऊ शकणार नाहीत. भारतानं पाकिस्तानसाठी 23 मे 2025 पर्यंत एअरस्पेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या एअरलाईन्सला मोठा तोटा सहन करावा लागेल. त्यांना आता फिरुन जावं लागे. त्यामुळे विमानाला लागणारा वेळ आणि इंधन वाढणार आहे. त्याचा थेट परिणाम प्रवाशांच्या खिशावर होणार आहे. कारण विमान कंपन्या तिकीटांचे दर वाढवणार हे निश्चित आहे.
( नक्की वाचा : India vs Pakistan : भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान बिथरला, शिमला करार केला स्थगित )
सैन्याला संपूर्ण सूट
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवादाच्या विरोधात अंतिम वार करण्यासाठी तीन्ही सैन्याला फ्री हँड दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याचे दडपण वाढले आहे. पाकिस्ताननं बुधवारी (30 एप्रिल 2025) त्यांच्या ताब्यातील गिलगीट-बाल्टिस्तान भागातील विमानं रद्द केली. भारतीय सैन्य कारवाई करेल या भीतीनं इस्लामाबादनं हा निर्णय घेतला.
पाकिस्तानच्या उधारीवर वार
अर्थमंत्रालय आगामी काही दिवसांमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्याकडून पाकिस्तानला मिळणाऱ्या निधीचा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे. वर्ल्ड बँक, आशियाई विकास बँक (ADB), आंतरराष्ट्रीय नाणे निधी (IMF) या संस्थेच्या अधिकाऱ्यांना लवकरच भारतीय अधिकारी भेटतील. पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या कर्जामध्ये कपात करावी हा मुद्दा यावेळी उपस्थित केला जाईल.
( नक्की वाचा : Pahalgam Terror Attack : पहलगाममधील हल्ल्यात हमासचाही सहभाग! 'रॉ' मधील माजी अधिकाऱ्याचा धक्कादायक दावा )
पाकिस्तानवर जल प्रहार
भारतानं पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानचं पाणी बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला. पाकिस्तान दहशतवाद्यांची साथ सोडत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार भारताकडून स्थगित करण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये 1960 साली हा करार करण्यात आला होता. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये 3 वेळा युद्ध झाले. त्या युद्धाच्या कालावधीमध्येही या कराराची अंमलबजावणी करण्यात येत होती. यावेळी अखेर भारतानं हे ऐतिहासिक पाऊल उचलत पाकिस्तानची कोंडी केली आहे.
अटारी बॉर्डर बंद
भारतानं 1 मे पासून अटारी बॉर्डर बंद केली आहे. भारतामधील पाकिस्तानी नागरिकांना 1 मे 2025 पर्यंत परत जाण्याचे आदेश दिले आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये रस्ते मार्गानं होणाऱ्या व्यापाराचं अटारी-वाघा बॉर्डर हे मोठं केंद्र आहे. भारतानं 2019 साली पाकिस्तानला दिलेला मोस्ट फेव्हर्ड नेशनचा (MFN) दर्जा रद्द केला. त्यानंतरही दोन्हा देशांमध्ये काही वस्तूंची (ताजे फळ, सिमेंट, टोमॅटो इत्यादी) आयात-निर्यात होत होती. आता या सर्वांवर बंदी घालण्यात आली आहे.
पाकिस्तानची नाकेबंदी
भारतानं पाकिस्तानचे राजकीय संबंध ही समाप्त केले आहे. नवी दिल्लीमधील भारताने नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षण/लष्करी, नौदल आणि हवाई सल्लागारांना देश सोडण्यासाठी एक आठवड्यांची मुदत दिली होती. ही मुदत संपली आहे. त्याचबरोबर दोन्ही उच्चायुक्तांनी सेवा सल्लागारांमधील पाच कर्मचाऱ्यांना परत बोलावलं आहे. भारतानं पाकिस्तानमधील उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांची संख्या 55 वरुन 30 करण्याचे आदेश दिले आहेत.
व्हिसा बंद
पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा योजनेच्या अंतर्गत भारतामध्ये प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या सवलतीचा फायदा घेऊन भारतामध्ये आलेल्यांना पाकिस्तानमध्ये परत पाठवण्यात आलं आहे. तसंच काही जणांना अजूनही शोधून परत पाठवलं जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world