Pahalgam Attack : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. या हल्ल्याला जबाबदार असलेल्या पाकिस्तानची कोंडी करण्यास भारतानं सुरुवात केली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची आपल्याला मदत होईल, अशी आशा पाकिस्तानला होती. पण, पाकिस्तानला यामधून फार काही हाती लागणार नाही, असं काँग्रेस खासदार शशी थरुर ( Shashi Tharoor) यांनी सांगितलं आहे. शशी थरुर यांनी संयुक्त राष्ट्रात दीर्घकाळ काम केलं आहे. या अनुभवाच्या आधारावर त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचं विश्लेषण केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शशी थरुर यांनी सांगितलं की, संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत बंद दाराआड काय झालं? याबाबत आत्तापर्यंत फक्त अनौपचारिक माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये नेमकं काय झालं हे अधिकृत वक्तव्यानंतरच स्पष्ट होईल. पण, ही बैठक पाकिस्तानला अपेक्षा होती, तशी झाली नाही. कारण सदस्य देशांनी लष्कर-ए-तोयबा (LeT) या दहशतवादी संघटनेबाबत पाकिस्तानला कठोर प्रश्न विचारले.
थरुर यांनी ANI शी बोलताना सांगितलं की, या प्रकारच्या बंद दाराआड झालेल्या बैठकीत मी देखील यापूर्वी सहभागी झालो आहे. या बैठकीत काय घडलं हे उपस्थित सदस्यांनी दिलेल्या अनौपचारिक माहितीमधूनच स्पष्ट होऊ शकतं. या माहितीनुसार सदस्य देशांनी दहशतवाद आणि लष्कर-ए-तोयबाबाबत चिंता व्यक्त केली आहे.
( नक्की वाचा : Madhuri Dixit : 'पाकिस्ताननं युद्ध जिंकलं तर माधुरी दीक्षितला घेऊन जाईन', मौलानाचं संतापजनक वक्तव्य, Video )
पाकिस्तानसाठी खास घडलं नाही
आपण याबाबत जे काही ऐकलंय त्यानुसार पाकिस्तानसाठी ही बैठक त्यांच्या अपेक्षेनुसार झाली नाही. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत 15 सदस्य असतात. त्या सदस्यांमध्ये पाकिस्तानचा समावेश आहे आणि भारत नाही. त्यामुळे आपला फायदा होईल, असं पाकिस्तानला वाटलं होतं. पण, सदस्य देशांनी पाकिस्तानला अडचणीत आणणारे प्रश्न विचारले.
या बैठकीतून संयुक्त राष्ट्राची सुरक्षा परिषद (UNSC) शांततेसाठी एक आवाहन करणार आणि दहशतवादावर काळजी व्यक्त करेल. मला या परिषदेकडून कोणतीही खास अपेक्षा नाही. या प्रकारच्या औपाचारिक किंवा अनौपचारिक बैठकीतून आपल्याला किंवा पाकिस्तानला प्रभावित करणारं खूप काही घडेल असं मला वाटत नाही. संयुक्त राष्ट्राच्या कामकाजाबाबतचं हे दुखद वास्तव आहे.
पाकिस्तानला चीन वाचवेल!
पाकिस्तान विरुद्धच्या कोणत्याही प्रस्तावाच्या विरोधात चीन नकाराधिकार वापरेल, असं थरुर यांनी सांगितलं. चीन हा UNSC चा स्थायी सदस्य आहे. भारताविरोधातील कोणत्याही प्रस्तावावर अनेक देश आपत्ती व्यक्त करतील आणि नकाराधिकार वापरतील असं थरुर यांनी स्पष्ट केलं.
'मला विश्वास आहे की UNSC पाकिस्तानवर टीका करणारा कोणताही ठराव पास करणार नाही कारण चीन त्याला व्हेटो करेल. ते आमच्यावर टीका करणारा कोणताही ठराव पास करणार नाहीत, कारण अनेक देश त्यावर आक्षेप घेतील आणि कदाचित व्हेटोचा वापर करतील, असं थरुर यावेळी म्हणाले.