100 Years Of RSS: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी महोत्सवात सहभागी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाच्या देशव्यापी योगदानाचा गौरव केला. 1 ऑक्टोबर 2025 रोजी नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी संघ म्हणजे 'अनादी राष्ट्रचेतनेचा पुण्य अवतार' असल्याचे सांगून, सामान्य व्यक्तीला राष्ट्रनिर्माणाशी जोडणाऱ्या 100 वर्षांच्या प्रवासाला सलाम केला.
नक्की वाचा: सरसंघचालकांनी उघड केले अमेरिकेच्या मनातील गुपित; सांगितले, 'भारतावर टॅरिफ का लावला?'
तो योगायोग नव्हता!
पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात दिवंगत स्वयंसेवक विजयकुमार मल्होत्रा यांना श्रद्धांजली वाहून केली. "आज महानवमी आहे आणि उद्या विजयादशमीचा उत्सव आहे. 100 वर्षांपूर्वी विजयादशमीला संघाची स्थापना होणे, हा केवळ योगायोग नव्हता, तर हे राष्ट्रचेतनेचे पुनरुत्थान आहे," असे पंतप्रधानांनी म्हटले.
विशेष नाणे आणि टपाल तिकीटाचे प्रकाशन
या सोहळ्याची सर्वात महत्त्वाची भेट म्हणजे, पंतप्रधान मोदींनी राष्ट्रासाठी संघाचे योगदान दर्शवणारे खास स्मारक टपाल तिकीट आणि नाणे प्रकाशित केले. त्यांनी सांगितले की, या नाण्यावर संघाचे बोधवाक्य 'राष्ट्राय स्वाहा, इदं राष्ट्राय, इदं न मम' अंकित आहे. इतकेच नाही, तर स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय मुद्रेवर भारत मातेची प्रतिमा कोरण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. तसेच, 1963 च्या परेडमध्ये स्वयंसेवकांच्या सहभागाची आठवण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध करण्यात आलेल्या विशेष टपाल तिकिटातून जागवली आहे.
सामान्य लोकांनी मिळून केले असामान्य काम
संघाचे कार्य स्पष्ट करताना पंतप्रधान म्हणाले की, 'व्यक्तिनिर्माण से राष्ट्रनिर्माण' हा संघाचा मार्ग आहे. डॉ. हेडगेवार यांनी सामान्य लोकांना निवडून, त्यांना घडवण्याचे काम केले आणि याच प्रक्रियेमुळे सामान्य लोकांनी मिळून असामान्य काम केले. हीच व्यक्तिनिर्माणाची प्रक्रिया आज संघाच्या प्रत्येक शाखेत सुरू आहे, ज्यामुळे 100 वर्षांच्या प्रवासात संघाला आधार मिळाला. नदी, किनाऱ्यावरील गावांना समृद्ध करते, तशाच पद्धतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशातील प्रत्येक क्षेत्रात आणि समाजाच्या प्रत्येक घटकाला स्पर्श केला आहे.
नक्की वाचा: दिवाळीपूर्वीच मुंबईला 'डबल गिफ्ट'! नवी मुंबई विमानतळ, मेट्रो 3 चा मुहूर्त ठरला
संघाने देशासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करून पंतप्रधान म्हणाले की, स्वातंत्र्यसंग्रामापासून ते 1942 च्या चिमूर आंदोलनापर्यंत अनेक स्वयंसेवकांना त्याग करावा लागला. स्वातंत्र्यानंतर हैदराबाद निजाम अत्याचाराविरोधात किंवा गोवा मुक्तीसंग्रामातही 'राष्ट्र प्रथम' हाच भाव स्वयंसेवकांनी जपला. फाळणीनंतर निर्वासितांची केलेली सेवा असो किंवा 1956 मधील कच्छ (Anjar) येथील भूकंपानंतर तिथल्या मदत, पुनर्वसनापासून पुन्हा उभारणीपर्यंत, स्वयंसेवक नेहमीच सर्वात आधी हजर होते.
संघाने आणि स्वयंसेवकांनी कटुतेला स्थान दिले नाही
पंतप्रधानांनी नमूद केले की, संघावर अनेकदा हल्ले झाले, बंदी घालण्यात आली आणि षडयंत्रे रचली गेली, तरीही स्वयंसेवकांनी कधीही कटुतेला स्थान दिले नाही. महात्मा गांधींनीही वर्ध्यातील शिबिरात संघातील समता, ममता, समरसता आणि समभाव पाहून संघाचे कौतुक केले होते, अशी आठवणही पंतप्रधानांनी सांगितली. शेवटी, पंतप्रधान म्हणाले की, आज देशावर असलेल्या आर्थिक अवलंबित्व आणि भूभागातील बदलाच्या संकटांचा बीमोड आपले सरकार वेगाने करत आहे. पंतप्रधानांनी म्हटले की देशावरील ही संकटे संघाने ओळखली होती आणि त्यासाठी ठोस रोडमॅप बनवला आहे.