
Navi Mumbai Airport : मुंबई आणि नवी मुंबईकरांसह संपूर्ण राज्याला एक आनंदाची बातमी आहे. अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा आता संपणार आहे! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) आणि मेट्रो 3 या दोन भव्य प्रकल्पांचे लोकार्पण पुढच्या महिन्यात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी हे लोकार्पण होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे.
कसं असेल नवी मुंबई विमानतळ?
मुंबईकरांची वाढती गरज भागवण्यासाठी आणखी एक स्वतंत्र आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याची मागणी सातत्यानं होत होती. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं स्वप्न 1990 च्या दशकापासून पाहण्यात येत होते. ते आता प्रत्यक्षात आले आहे.
हे विमानतळ तब्बल 1,160 हेक्टरवर उभे आहे. पहिल्या टप्प्यात हे विमानतळ दरवर्षी 20 दशलक्ष प्रवाशांना आणि 0.8 दशलक्ष टन मालवाहतुकीला हाताळू शकेल. अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्स आणि सिडको यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा प्रकल्प पूर्ण झाला आहे.
भविष्यात, म्हणजेच 2032 पर्यंत याची क्षमता 90 दशलक्ष प्रवाशांपर्यंत वाढणार आहे! इतकंच नव्हे तर, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि NMIA मिळून मुंबईची एकत्रित क्षमता 145 ते 150 दशलक्ष प्रवाशांपर्यंत जाईल.
( नक्की वाचा : Mumbai Local : मध्य रेल्वेचा मोठा दिलासा! दोन नवी स्टेशन आणि 20 अतिरिक्त लोकल लवकरच सेवेत, वाचा संपूर्ण प्लॅन )
एअर इंडिया एक्सप्रेसने सुरुवातीलाच नवी मुंबई विमानतळावरुन रोजची 20 उड्डाणं होणार असल्यची घोषणा केली. या माध्यमातून देशभरातील 15 पेक्षा जास्त शहरांना हे विमानतळ जोडले जाईल. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील विमानतळाचा ताण यामुळे कमी होणार आहे. तसंच पुणे, रायगड, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील प्रवाशांना देखील यामुळे जवळंच आणि भव्य विमामतळ मिळणार आहे.
हे विमानतळ मेट्रो तसंच जलमार्गानंही जोडलं जाणार आहे. या विमानतळाजवळ एक वॉटर जेटी देखील असेल. त्यामुळे प्रवाशांना जलमार्गानं गेट वे ऑफ इंडिया तसंच अन्य ठिकाणी जाता येईल.
मेट्रो 3 धावणार, प्रवासाची चिंता मिटणार
एकीकडे विमानतळ सुरू होत असतानाच, दुसरीकडे मुंबईच्या अतिशय महत्त्वाच्या मेट्रो 3 मार्गाचेही उद्घाटन होणार आहे. यामुळे वांद्रे, कुलाबा आणि सीप्झला जलद कनेक्टिव्हिटी मिळणार असून मुंबईकरांच्या रोजच्या लोकल प्रवासाला मोठा पर्याय मिळेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world