PM Modi Speech : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 25% चा टॅरिफ बॉम्ब टाकल्यानंतर, पंतप्रधान मोदींनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. पंतप्रधानांनी वाराणसीतून स्पष्ट केले की, आपण अशाच वस्तू खरेदी करू ज्या बनवण्यासाठी कोणत्याही भारतीयाचे कष्ट लागले असतील. जगाच्या अस्थिर अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले की, आपले शेतकरी, आपले लघु उद्योग, आपल्या तरुणांचा रोजगार, यांचे हित आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. त्यांनी दुकानदारांनाही स्वदेशी वस्तू विकण्याचे आवाहन केले.
स्वदेशी वस्तूंच्या खरेदीवर भर
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, आता आपण अशाच वस्तू खरेदी करू ज्या बनवण्यासाठी कोणत्याही भारतीयाचे कष्ट लागले आहेत. पीएम मोदींचे हे वक्तव्य ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर 25% कर लावण्याच्या निर्णयाला दिलेले उत्तर मानले जात आहे. 53 मिनिटांच्या भाषणाच्या शेवटच्या सहा मिनिटांमध्ये मोदींनी भारताची अर्थव्यवस्था आणि स्वदेशीबद्दल सांगितले.
वाराणसीमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, "आज जेव्हा आपण आर्थिक प्रगतीबद्दल बोलत आहोत, तेव्हा मी तुमचे लक्ष जागतिक परिस्थितीकडे वेधू इच्छितो. आज जगाची अर्थव्यवस्था अनेक शंकांमधून जात आहे. अस्थिरतेचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत, जगातील देश आपापल्या हिताकडे लक्ष देत आहेत."
( नक्की वाचा : US India Tarrif: रशियाकडून खरेदी केल्याची भारताला शिक्षा, 25 टक्के टॅरीफसह दंड वसूल करणार )
भारत तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर
मोदी म्हणाले, "भारत देखील जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे भारतालाही आपल्या आर्थिक हिताबाबत जागरूक राहावे लागेल. आपले शेतकरी, आपले लघुउद्योग, आपल्या तरुणांचा रोजगार, यांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च आहे. सरकार या दिशेने सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पण देशाचे नागरिक म्हणून आपलीही काही कर्तव्ये आहेत. ही गोष्ट फक्त मोदींनीच नाही, तर हिंदुस्तानमधील प्रत्येक व्यक्तीने दिवसाच्या प्रत्येक क्षणी बोलत राहायला हवे."
ते म्हणाले, "कोणताही राजकीय पक्ष असो, कोणताही राजकारणी असो, त्यांनी आपला संकोच सोडून देशहितासाठी देशवासियांमध्ये स्वदेशीच्या संकल्पाची भावना जागृत केली पाहिजे."
'व्होकल फॉर लोकल' वर पंतप्रधानांचा भर
पंतप्रधानांनी सांगितले की, "आपण अशा वस्तू खरेदी करू ज्या बनवण्यासाठी कोणत्याही भारतीयाचे कष्ट लागले आहेत. ती वस्तू भारताच्या लोकांनी बनवली आहे, भारताच्या लोकांच्या कौशल्याने बनली आहे. भारताच्या लोकांच्या घामाने बनली आहे. आपल्याला 'व्होकल फॉर लोकल' हा मंत्र अंगीकारावा लागेल. आपल्या घरात जे काही नवीन सामान येईल, ते स्वदेशीच असेल. ही जबाबदारी प्रत्येक देशवासियांना घ्यावी लागेल." त्यांनी व्यापाऱ्यांनाही स्वदेशी मालच विकण्याची विनंती केली. ते म्हणाले, "स्वदेशी माल विकण्याचा संकल्प घेणे ही देखील देशाची खरी सेवा आहे. आता सणांचे दिवस येत आहेत, त्यानंतर लग्नाचा सिझन आहे. या काळात फक्त स्वदेशी वस्तूच खरेदी केल्या पाहिजेत."